पुरोगामी रमण्यांची बुणगेगिरी !

25 Oct 2020 23:23:51

Uddhav Thackeray_1 &
 
 
 
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्याची धमक नसलेली व्यक्ती घरात बसून मुख्यमंत्री म्हणून ऑनलाईन कारभार करु लागली. त्यानेच राज्याचे वाटोळे झाले नि अनेकांना जीव गमवावा लागला. आज मंदिरे न उघडल्याने उद्धव ठाकरेंचे कौतुक करणार्‍या एकशे चार लाचार साहित्यिकांनी मात्र तेव्हा सारीकडे हाहाकार माजलेला असताना आपल्या लेखण्या नि कागद कुठे सुरळ्या करुन ठेवले होते? 
 
 
 
हिंदुत्वाची शाल भिरकावून देऊन सेक्युलरिझमचा चोळणा घातलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजूनही राज्यातील मंदिरे उघडलेली नाहीत. ‘अनलॉक’च्या विविध टप्प्यांत दारुची दुकाने, बार, हॉटेल्सनाही मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, पण लाखो भक्तांची श्रद्धास्थाने खुली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. दिल्लीत बसलेल्या मालकीणबाई सोनिया गांधी आणि बारामतीचे शरद पवार काकाश्री उगाच नाराज होऊन खाट कुरकुरायला नको, म्हणूनच उद्धव ठाकरेंनी देवी-देवतांना कडी-कोयंड्यात बंद करुन ठेवले. पण मुख्यमंत्र्यांच्या या हिंदूद्रोही निर्णयावर हिंदूंना, हिंदू अस्मिता-प्रतीकांना सातत्याने विरोध करण्यात, हीन लेखण्यात भूषण मानणारे पुरोगामी रमणे चांगलेच खूश झाले. राज्यपालांनी दबाव आणला तरीही आणि भाजपने मंदिरांची कुलुपे काढण्यासाठी आंदोलन केले तरीही उद्धव ठाकरे सेक्युलरिझमवर ठाम राहिले, म्हणून राज्यातील निवडक साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले, आभार मानले. मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणार्‍यांत भालचंद्र नेमाडे, जयंत पवार, मुक्ता दाभोळकर, मिलिंद मुरुगकर, नीरजा, रंगनाथ पठारे, शांता गोखले, विश्वास उटगी यांच्यासह एकशे चार लाचारांचा समावेश होता.
 
 
उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची स्तुती करताना ही लेखकमंडळी इतकी वाहवत गेली की, आता हातचे पेन मोडून सरकारी अनुदान लाटून मुख्यमंत्र्यांनाच ‘सेक्युलररत्ना’चा पुरस्कार देतात की काय, असे वाटले. अर्थातच लाळघोटेपणा करणार नाही, ती ही बुणगी साहित्यिक जमात कसली? गेली कित्येक वर्षे स्वतःचा स्वार्थ जपत शरद पवारांच्या घरी पाळीव राहिलेल्या या लोकांनी तिथेही गोंडा घोळण्याशिवाय काय केले होते? पण मध्ये भाजपचे सरकार आले नि यांच्या सुरळीत चाललेल्या करामती एकाएकी थांबल्या. पण पुढे बेईमानी करुन सत्तांतर झाले नि महाभकास आघाडीची विचित्र राजवट राज्यात सुरु झाली, त्याचाही सर्वाधिक आनंद याच एकशेचार लाचारांना झाला असेल. कारण इतकी वर्षे ज्यांच्या घरी पाणी भरले, त्यांच्याच जीवावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. परिणामी भाजपच्या राज्यात आपल्या ढोंगी पुरोगामित्वाचा नि कथित सेक्युलरिझमचा बाजार उठल्याने कमालीची नाराज झालेली ही मंडळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांच्याही वळचणीला गेली. अर्थात, तसे केले तरच सवलतींची, पुरस्कारांची, अनुदानाची खिरापत पदरात पडणार नि त्यावर हे रमणे पोसले जाणार! आताचा पत्रप्रपंच त्यासाठीच!
 
 
मात्र, सेक्युलरिझम आणि राज्यघटना, जनकल्याणाची आठवण काढणारे हे एकशे चार लाचार इतके दिवस कुठल्या बिळात लपून बसले होते? देशावर कोरोनाचे संकट कोसळले पण सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला, मराठीजनांना बसला. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्याची धमक नसलेली व्यक्ती घरात बसून मुख्यमंत्री म्हणून ऑनलाईन कारभार करु लागली. त्यानेच राज्याचे वाटोळे झाले नि डॉक्टर, पोलिसांसह कितीतरी सामान्य व्यक्तींना जीव गमवावा लागला. उपचाराविना, रुग्वाहिकेविना राज्यातली जनता तर मेलीच, पण पोलीस कर्मचारी नि पत्रकारांनाही प्राणास मुकावे लागले. आज मंदिरे उघडल्यामुळे लोकांना कोरोना होईल, म्हणून विरोध करणारे लेखकराव, तेव्हा कुठे झोपले होते? तेव्हा का त्यांना राज्यातल्या जनतेची कणव वाटली नाही नि त्यातल्या एखाद्याला राजा तू चुकलास, असे म्हणण्याची इच्छा झाली नाही? कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग ’ चक्रीवादळाने धडक दिली, विदर्भातील अनेक जिल्हे पुराखाली गेले, आताही राज्यातल्या कित्येक ठिकाणी अवकाळी-अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली, राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या बांधावर खते आणि बियाणे तर नेले नाही पण मृत्युला नेले. तेव्हाही सारीकडे हाहाकार माजलेला असताना एकशे चार लाचारांनी आपल्या लेखण्या नि कागद कुठे सुरळ्या करुन ठेवले होते? तेव्हा यातल्या एकालाही आपल्याच मराठी बांधवांसाठी सरकारला जाब का विचारावासा वाटला नाही?
 
 
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाखाली सारे काही उद्ध्वस्त होत असताना, या मूठभर साहित्यिकांना कौतुक कसले तर मंदिरे न उघडल्याचे! पण सुसंस्कृत नि सभ्य बोरुबहाद्दरांना दारुच्या दुकानातून, बारमधून कोरोनाचा प्रसार होईल, याची भीती वाटत नाही. किंवा स्वतःला चढलेली पुरोगामित्व नि सेक्युलरिझमची झिंग दारुची दुकाने, बार उघडले तरच दाखवता येते, असा त्यांचा समज असावा. राज्यपालांच्या उल्लेखासह चाय-बिस्कुटवाल्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून विरोधी पक्ष म्हणजे भाजपलाही बोल लावले. एकशे चार लाचारांचा हा प्रकार पहिल्यापासूनचाच, राजसत्ता सोयीची नसली की कांगावा करायचा, भाजपद्वेषाचा कंडू शमवायचा आणि राजसत्ता सोयीची असली तरीही भाजपद्वेषाच्याच गुळण्या मारायच्या. म्हणूनच लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठीचा उपयोग आक्षेपार्ह असून तो भाविकांसाठीच धोकादायक ठरेल, अशी भाकिते या पुरोगामी-सेक्युलरी ज्योतिषांनी वर्तवली. मात्र, मंदिरे खुली करा, ही काही एका समाजाची वा फक्त भाजपसाठीची मागणी नाही, तर मंदिरांमुळे अनेकांना रोजगार मिळतो. गेले सात महिने मंदिरे बंद आहेत, त्यामुळे फुलशेती करणारा शेतकरी, हार-फूल विक्रेते, प्रसाद विक्रेते, दूध विक्रेते, वस्त्र विक्रिते नि त्याच्याशी संबंधित असेच कितीतरी व्यावसायिक पार डबघाईला गेले. त्यांचा रोजगार वाचावा, त्यांचे घरदार चालावे, यासाठीच मंदिरे उघडण्याची मागणी, तेही ‘अनलॉक’ प्रक्रियेत केली जात आहे. एरवी रोजगार आणि नोकर्‍या नाहीत, म्हणून आरडाओरडा करणार्‍यांना मात्र, ते दिसत नाही, इथे ते दुटप्पीपणाच करतात.
 
 
सामान्य माणसाचे सोडाच, साहित्यिक तर समाजाकडे अधिक चौकस नजरेने पाहतो, असे म्हणतात. पण आपले पत्रावळ्यावाले साहित्यिक चौकसपणे नव्हे भोचकपणेच पाहत असावेत आणि म्हणूनच त्यांना मंदिरांवर अवलंबून असणार्‍यांचा रोजगार दिसला नाही नि त्यांनी मंदिरे बंद ठेवणार्‍या उद्धव ठाकरेंना थेट शाबासकी देऊन टाकली. अर्थात, त्यांच्या कौतुकवर्षावाने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा फार काही सुवर्णांकित होईल असे नव्हे. आपल्याच कर्तबगारीने भुईला भार झालेल्या या महाविकास आघाडीच्या विसर्जनासाठी जनताही आतुरतेने वाट पाहत आहेच. ती वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी हे सरकार आणि आताच्या पुरोगामी रमण्यांचेही विसर्जन होईलच म्हणा. हो, तोपर्यंत काय तो पत्रापत्रीचा आणि संस्कृतमधील, उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः।
 
 
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः॥ श्लोकाप्रमाणे स्तुती करण्याचा खेळ तेवढा चालू द्या.
 
 
Powered By Sangraha 9.0