ब्रेझनेव्ह राजवटीतली एक सुरस कथा

24 Oct 2020 21:59:56

vividha_1  H x



गागारिन हा तरबेज वैमानिकच नव्हे, तर अनुभवी अंतराळवीर होता. एखाद्या नवशिक्या वैमानिकाप्रमाणे त्याने वेदर बलून किंवा ढगावर विमान ठोकलं, हे कुणाला पटणार?


युरी गागारिन हे नाव आठतंय? आधुनिक काळात अवकाशात जाणारा आणि अवकाशयानातून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मनुष्यप्राणी. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं. नवनवीन अतिसंहारक अस्त्रं आणि शस्त्रं बनवण्याबरोबरच त्यांच्यात अंतराळ संशोधनाचीही जोरदार स्पर्धा सुरू झाली. त्यात प्रथम नुसतंच दूरसंचालित अवकाशयान, मग अवकाशयान प्रथम कोण उडवतो, याबद्दल खूपच तीव्र स्पर्धा सुरू झाली. ती अखेर सोव्हिएत रशियाने जिंकली. १९ एप्रिल १९६१ या दिवशी युरी गागारिन या रशियन अंतराळवीराने पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर, अवकाशात झेप घेतली. एवढंच नव्हे, तर अवकाशातून पृथ्वीला एक प्रदक्षिणादेखील घातली. आधुनिक काळात पहिला मानव अंतराळात पोहोचला. यातले ‘आधुनिक काळात’ हे शब्द अलीकडे अधनंमधनं योजण्यात येतात. १९६१चा काळ वेगळा होता. त्या काळात पाश्चिमात्त्य वैज्ञानिकांच्या डोळ्यांवर विज्ञानातल्या यशाची प्रचंड धुंदी होती. आपण निसर्गाची, सृष्टीची सर्व रहस्ये जाणली आहेत किंवा जाणण्याच्या मार्गावर आहोत, असा (जादा) आत्मविश्वास त्यांच्या ठायी निर्माण झाला होता. त्यामुळेच ‘अंतराळात पोहोचणारा पहिला मानव’ अशीच शब्दयोजना त्यावेळी केली गेली होती. आता मात्र त्यात ‘आधुनिक काळातला’ हे शब्द जोडले जातात. पाश्चिमात्त्य वैज्ञानिक हे मोकळ्या मनाचे असल्यामुळे, प्राचीन काळात कदाचित मानव अंतराळात गेला असण्याची शक्यता आहे, हे वास्तव ते सहजपणे स्वीकारतात. रॉबर्ट ओपेनहायमर या मूळ जर्मन अणुशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने नेवाडा वाळवंटात पहिली अणुचाचणी केली. तेव्हासुद्धा याचा उल्लेख करताना ‘आधुनिक काळातला’ पहिला अणुस्फोट असा केला जातो. तर ते कसंही असो. जगभर प्रचंड जल्लोष झाला. पहिला मानव अंतराळात पोहोचणं हा अवकाश विज्ञानाच्या प्रगतीचा मोठाच टप्पा होता. सोव्हिएत रशियात तर दिवाळीच साजरी झाली. त्यात अमेरिकेचं नाक कापून हा विजय मिळवल्याचा आनंद जास्त होता. भारतात तर विचारूच नका!
पंडित नेहरूंची लोकशाही समाजवादी राजवट सुरू होती. भारत-रशिया राजकीय मधुचंद्र भलताच जोरात होता. त्यामुळे तत्कालीन भारतीय प्रचारमाध्यमांनी युरी गागारिनची आणि त्याहीपेक्षा सोव्हिएत रशियाच्या वैज्ञानिक प्रगतीची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली होती. अंतराळातून पृथ्वीवर परतल्यावर खुद्द गागारिनवरही अर्थातच अभिनंदनाचा, कौतुकाचा वर्षाव झाला. युरी गागारिन हा अगदी सर्वसामान्य घरातला होता. त्याचे आईवडील शेतकरी होते. तो स्वतः प्राथमिक शिक्षण पूर्ण करून एका लोखंड उत्पादन कारखान्यात घिसाडी म्हणून कामाला लागला होता. पण, त्याने जिद्दीने रात्रशाळेत जाऊन शिक्षण चालू ठेवलं. पुढे १९५५साली त्याने सैनिक वायुदलाच्या विमानोड्डाण शाळेत प्रवेशासाठी अर्ज केला. त्याच्या तांत्रिक कौशल्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नि गागारिन वैमानिक बनला. पुढे या तांत्रिक कौशल्यामुळे आणि कमी उंचीमुळेच त्याची अवकाशयानाचा चालक म्हणून निवड झाली. अवकाशयानाचं कॉकपिट फारच छोटं असल्यामुळे तिथे सहजतेने हालचाली करण्यासाठी बेताच्या उंचीचा वैमानिक हवा होता. ही अट गागारिनच्या पथ्यावर पडली.
पहिला अंतराळवीर म्हणून झालेल्या कौतुकाचा भर ओसरल्यावर गागारिनचं दैनंदिन सैनिकी जीवन सुरू राहिलं. २७ मार्च, १९६८ या दिवशी युरी गागारिन आणि त्याचा सहकारी ब्लादिवीर सेरुजिन यांनी नेहमीप्रमाणे मॉस्कोतल्या सैनिकी विमानतळावरून ‘मिग-१५’ या विमानातून सरावासाठीचे उड्डाण केलं आणि ते त्यांचं शेवटचं उड्डाण ठरलं. बघणार्‍यांना असं दृश्य दिसलं की, एक विमान नाक खाली करून अत्यंत वेगाने जमिनीकडे सूर मारतं आहे. काही मिनिटांतच विमान कोसळलं आणि गागारिन व सेरुजिन ठार झाले. सोव्हिएत रशियाने राष्ट्रीय शोक मनवला. संपूर्ण लष्करी इतमामाने गागारिन व सेरुजिनच्या अवशेषांचं दफन करण्यात आलं. गझाट्स्क या गागारिनच्या मूळ गावाला त्याच्या सन्मानार्थ गागारिन हेच नाव देण्यात आलं. एका सामान्य शेतकरी कुटुंबातला सामान्य घिसाडी कामगार आपल्या वैयक्तिक कर्तबगारीमुळे व सर्वसामान्यांना उत्तेजन देणार्‍या सोव्हिएत राज्यव्यवस्थेमुळे राष्ट्रीय नायक बनला, असा गागारिनचा गौरव पुन्हा एकदा करण्यात आला. गागारिनच्या मृत्यूला अपघात, असं अधिकृत सरकारी सूत्रांनी म्हटलं तरी अफवा आणि कहाण्या यांना ऊत आलाच. खुद्द रशियात प्रचारमाध्यमांवर कडक साम्यवादी निर्बंध असले, तरी बातम्या झिरपत-झिरपत बाहेर पोहोचायच्या थोड्याच राहतात! गागारिनच्या विमान अपघाताबद्दल अधिकृत सोव्हिएत शोध समितीच्या अहवालात म्हटलं होतं की, बहुधा हवामान खात्याचा एखादा फुगा (वेदर बलून) किंवा एखादा ढग यांच्याशी विमानाची टक्कर झाली असावी. हा खुलासा अत्यंत हास्यास्पद होता. गागारिन हा तरबेज वैमानिकच नव्हे, तर अनुभवी अंतराळवीर होता. एखाद्या नवशिक्या वैमानिकाप्रमाणे त्याने वेदर बलून किंवा ढगावर विमान ठोकलं, हे कुणाला पटणार?
लोकांनी काढलेला सर्वात पहिला निष्कर्ष असा की, गागारिनला प्रसिद्धी पेलवली नाही. तो भयंकर प्यायला लागला. या विमान उड्डाणाच्या वेळी गागारिन आणि सेरुजिन दोघेही तर्र होते. त्यांनी उड्डाण केलं खरं, पण नंतर त्यांचा ताबा सुटला. दुसरा निष्कर्ष असा की, ब्लादिमीर सेरुजिनला गागारिनच्या लोकप्रियतेचा मत्सर वाटत होता. म्हणून त्याने दोघांचाही निकाल लावला. तिसरा निष्कर्ष असा की, तत्कालीन सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह यांनीच हा बनाव घडवून आणला. कारण, कुणीही परदेशी पाहुणा आला की, तो साहजिकच गागारिनला भेटायची इच्छा व्यक्त करायचा. गागारिन दारुच्या नशेत त्या पाहुण्याशी वाटेल ते बडबडायचा. ब्रेझनेव्ह आणि एकंदरच उपस्थित सरकारी मंडळींची स्थिती फार विचित्र व्हायची. त्यामुळे ब्रेझनेव्हने प्रकरण एकदम निकालीच काढून टाकलं. या निष्कर्षातले दोन उपनिष्कर्ष असे की, गागारिन त्या अपघातात मेला नाही. त्याच्या चेहर्‍यावर प्लास्टिक सर्जरी करून त्याला कायम विजनवासात पाठवण्यात आलं किंवा अनामिक वेडा म्हणून त्याला एका वेड्यांच्या हॉस्पिटलात डांबून टाकण्यात आलं नि तिथे तो १९९०पर्यंत जीवंत होता. ब्रेझनेव्ह आणि सोव्हिएत गुप्तहेर खातं यांच्या एकंदर सुरस नि चमत्कारिक लीला पाहता, यातलं काहीही घडलेलं असण्याची शक्यता आहे. चौथा निष्कर्ष असा की, पृथ्वीवरील मानवाने अंतराळात प्रवेश केला, हे सहन न होऊन परग्रहावरील अतिप्रगत मानवसदृश लोकांनी गागारिनच्या विमानाच्या वाटेत, ढगासारखं दिसणारं काहीतरी यान आणलं. गागारिन व सेरुजिन यांना आपल्या यानात खेचून घेतलं. म्हणजेच त्यांचं अपहरण केलं नि रिकामं विमान खाली ढकलून दिलं. या नि अशा विविध निष्कर्षांवर त्यावेळेस खूप काथ्याकूट झाला होता. काही काळाने विषय मागे पडला. विशेषतः १९६९ साली अमेरिकेने चंद्रावर मानव उतरवून सोव्हिएत रशियाला एक जोरदार धक्का दिल्यामुळे गागारिन आणि त्याचा पराक्रम फक्त इतिहासातच उरले.
आता युरी गागारिनच्या गूढ मृत्यूला सुमारे ५३ वर्षे होत आली असताना इगोर कुझनेत्सॉव या विमानोड्डाण अभियंत्याने पुन्हा एकदा हा विषय बाहेर काढला आहे. कुझनेत्सॉव आणि इतर ३०तज्ज्ञ मंडळींनी या प्रकरणाची नव्याने कसून छाननी केली. त्यांना असं आढळलं की, गागारिनच्या विमानाचं कॉकपिट पूर्णपणे हवाबंद झालं नव्हतं. एक व्हेंटिलेशन पॅनल म्हणजे हवेसाठी असलेला झरोका किंचित उघडा राहिला होता. खुद्द गागारिन आणि सेरुजिनच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांचं विमान खूपच उंचीवर पोहोचलं होतं. आता ते तातडीने कमी उंचीवर आणणं आवश्यक होतं. गागारिन आणि सेरुजिन हे दोघेही तरबेज वैमानिक होते. सेकंदाला १४५ मीटर्स या वेगाने त्यांनी विमान खाली घ्यायला सुरुवात केली. पण, त्यांच्या ‘मिग-१५’ विमानाला हा वेग झेपला नाही आणि ते नाक खाली करून एकदम कोसळलंच. हा वेग एवढा तीव्र होता की, कुझनेत्सॉवच्या मते मानवी शरीर त्या वेगाला टिकूच शकलं नसतं. म्हणजे त्या वेगाचा परिणाम म्हणून त्या दोघांची रक्ताभिसरण प्रक्रिया बंद पडून त्यांचे जीव अगोदरच गेले आणि मग विमान कोसळलं.कुझनेत्सॉव व त्याच्या शोधगटाने पुतीन सरकारकडे मागणी केली आहे की, गागारिन मृत्यू प्रकरणाची सरकारी तज्ज्ञांनी पुन्हा एकदा छाननी करावी व सत्य काय आहे, ते जनतेला सांगावं. पुतीन सरकारने ही मागणी फेटाळून लावताना म्हटलं आहे की, तत्कालीन शोध समितीचा अहवाल आमच्या दृष्टीने समाधानकारक आहे. तेव्हा पुन्हा छाननी करण्याची गरज नाही.पुतीन सरकारचा कारभार एकंदरीत बराच पारदर्शी असला तरी तो युरोप-अमेरिकेइतका पारदर्शी कसा होऊ शकेल? स्वतः पुतीनसुद्धा एकेकाळचे केजीबी प्रमुख आहेत. लोकांना काय, उद्या ते लेनिन आणि स्टॅलिनच्या मृत्यूचीसुद्धा पुन्हा छाननी करण्याची मागणी करतील! त्यांचेही मृत्यू संशयास्पदच होते.
Powered By Sangraha 9.0