एखाद्या उद्योजिकेने बालसंगोपनासाठी उद्योगातून विश्रांती घेतली की, तिचं पुनरागमन कठीण असतं. मात्र, हा समज खोटा ठरवत शुभदा यांनी घरातच प्रशिक्षण वर्गाचा सेटअप उभारला आणि घरातूनच कार्यालय व प्रशिक्षण सुरु केले. मुलांना निव्वळ गणकतंत्र न शिकवता संस्कारक्षम पिढी घडविण्याकडे ‘किड्स इंटेलिजन्स’चा कल आहे.
तिच्या आयुष्यातला तो सर्वात मोठा आणि बाका प्रसंग. डोहाळे जेवण अगदी आनंदात झाले होते. मात्र, गर्भारकाळातील काही गुंतागुंतीमुळे आई किंवा बाळ अगदी इथपर्यंत वेळ येऊन ठेपली होती. तिचा भला मोठ्ठा आधार असलेले तिचे बाबा या प्रसंगाने इतके हादरले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जवळच्या नातेवाईकांनी तिला व्यवसायातून काही वर्षे विश्रांती घेण्यास सांगितले. तिने विश्रांती घेतली, पण अगदी स्वल्पविरामासारखी. यावेळेस आई देवीसारखी तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली. सुदैवाने शुभदा नीट प्रसुत झाली. एका गोड कन्येला तिने जन्म दिला. हार न मानता काही महिन्यांमध्ये पुन्हा व्यवसाय सुरु केला. आज तिच्या व्यवसायाच्या कक्षा तब्बल नऊ देशांमध्ये विस्तारलेल्या आहेत. स्त्रिला देवीचं रुप का म्हणतात, हे तिच्या आणि तिच्या सहवासातील स्त्रियांच्या संघर्षातून उमजतं. सरस्वतीचं रुप असलेल्या शिक्षण क्षेत्रात ती ‘किड्स इंटेलिजन्स’ नावाने स्वत:ची व्यावसायिक संस्था चालवते. ही कथा आहे या संस्थेच्या संचालिका शुभदा भावे यांची. शुभदा यांचा जन्म डहाणूचा. तिचे बाबा अशोक धनू शिक्षक होते, तर आई गृहिणी. आजी देवाघरी गेल्यानंतर लहान शुभदा आई-बाबांसोबत माहिमला आल्या.
माहिमच्याच सरस्वती मंदिरात त्यांचं दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण झालं. जवळच्या लोकमान्य विद्यामंदिरात त्यांनी अकरावी-बारावी पूर्ण केली. शुभदाला मानसशास्त्र विषयात स्वारस्य होते. त्याकाळात संगणकयुग जोमात होतं. संगणक क्षेत्रातील कारकिर्दीस भविष्य आहे हे त्यांच्या बाबांना उमजलेलं. त्यांनी संगणक अभियांत्रिकी विषयात पदविका मिळवावी असे त्यांना वाटले. म्हणून मुंबई सेंट्रलच्या बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून माहिती-तंत्रज्ञान विषयामध्ये त्यांनी अर्धवेळ बीएस्सी पदवी प्राप्त केली. पुढे एमएस्सी करण्याचा विचार होताच. मात्र, आई-बाबांवर त्याचा आर्थिक ताण नको म्हणून त्या एका खासगी बँकेत बँक ऑफिसमध्ये नोकरी करु लागल्या. एकीकडे नोकरी अन् दुसरीकडे शिक्षण चालूच होतं. मात्र, या नोकरीत त्या रमल्या नाहीत. तिथे नवीन काही शिकण्यासारखं वा नवीन काहीतरी करण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांनी ती नोकरी सोडली. त्याच दरम्यान महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांना बीसीएच्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग शिकवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आणखी काही महाविद्यालयांमध्येसुद्धा शुभदा यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. दरम्यान, तिने प्रणिक हिलिंग, रेकी, न्युरो लिंग्विस्टीक प्रोग्राम आदी विषयासंदर्भात काही कोर्सेससुद्धा शिकून घेतले.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना एक गोष्ट जाणवली की, खर्या अर्थाने विद्यार्थ्यांवर बालवयात शैक्षणिक संस्कार होणे आवश्यक आहे. मुले लहानपणी शाळेत जाण्यास घाबरतात. कारण, ती गणित विषयाला घाबरत असतात आणि लहान मुलंच काय, आपण मोठेसुद्धा घाबरतोच की गणिताला. कारण, लहानपणापासून गणित म्हणजे अवघड विषय हे समीकरणच जणू बनून गेलंय. याला छेद देण्यासाठी शुभदा यांनी २००९ साली ‘किड्स इंटेलिजन्स’ या शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. या संस्थेच्या माध्यमातून पाच वर्षांवरील विद्यार्थ्यांना ‘अबॅकस’ या गणितातील तंत्राशी अवगत केले जाते. अरबी गणक प्रणाली अस्तित्वात येण्याच्या काही शतके अगोदरपासून ‘अबॅकस’ ही गणक प्रणाली युरोप, चीन आणि रशियामध्ये कार्यरत होती. हे एक मोजण्याचे साधन असून गणक प्रणाली सहजसोपी होऊन जाते. लहानपणीच ही शास्त्रोक्त पद्धत मुलांना अवगत झाली तर मुले गणित या विषयात चमकदार कामगिरी करु शकतात, असे शुभदा भावे सांगतात. आईकडून घेतलेले सात हजार रुपये आणि स्वत:च्या जवळील बचतीचे ३८ हजार रुपये असे एकूण ४७ हजार रुपये गुंतवून शुभदा भावेंनी ‘अबॅकस’ प्रशिक्षण वर्ग सुरु केले. पहिल्याच तुकडीमध्ये ५ ते १४वर्षे वयोगटातील फक्त सात मुले होती. या सात मुलांना शिकवताना जाणवले की, त्यांच्या पालकांना जर पालकत्वाच्या काही बाबी समजावून सांगितल्या तर या मुलांचे संगोपन नीट होईल. ही मुले फुलतील, बहरतील. त्या दृष्टीने त्यांनी पालकत्वाच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन पालकांचे समुपदेशन करण्यासदेखील सुरुवात केली. अशा या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे ‘किड्स इंटेलिजन्स’ची ख्याती वाढली. परिणामी, विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढली. सुमारे ७० विद्यार्थी संख्या झाली होती.
या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्यांनी काही शिक्षकांची नियुक्ती केली. मात्र पालकांनी शुभदांना सांगितले की, त्या जितकं प्रभावीपणे मुलांना शिकवतात तितक्या प्रभावी इतर शिक्षक शिकवत नाही. यावेळेस शुभदांना कळले की, शिकवणे ही एक कला आहे. निव्वळ विषय समजावला म्हणजे शिक्षक असं ते नसून विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्याला विषय कळेल अशा पद्धतीने शिकवलं जाणे म्हणजे शिकवणं होय. आता अशाप्रकारे मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. त्याकरिता शुभदांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शुभदा भावे यांचा विवाह यशोधन भावे या तरुणाशी संपन्न झाला. उद्योजिका सून म्हणून शुभदा यांच्या सासूबाई रेखा भावे या त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. ‘तू तुझा व्यवसाय सांभाळ, मी घर सांभाळेन. मी असेपर्यंत तू घराची काळजी करु नकोस,’ असं त्या शुभदाला म्हणायच्या. रेखा भावेंना आजारपणातील उपचारासाठी वेळोवेळी दवाखान्यात जावे लागे. मात्र आपला आजारपण आपल्या सुनेच्या व्यवसायात अडथळा येणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. २०१३दरम्यान त्यांचे निधन झाले. शुभदांचा एक मोठा आधार निखळला.
२०१६ दरम्यान घडलेली घटना त्यांच्या एकूणच कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. त्या गर्भवती असताना प्रसुतीसंदर्भात काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या. बाळ किंवा आई इथपर्यंत गंभीर समस्या निर्माण झाली होती. शुभदाचे बाबा, अशोकरावांचा शुभदावर विशेष जीव होता. आपल्या मुलीचं कसं होणार, या मानसिक त्राणाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. शुभदा यांच्यासाठीसुद्धा हा मोठा आघात होता. सुदैवाने सारं सुरळीत पार पडलं आणि त्यांनी ‘अभिज्ञा’ या गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. दरम्यान, या सगळ्याचा व्यवसायावर परिणाम झाला. जवळच्या नातेवाईकांनी व्यवसायातून काही वर्षे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मानून शुभदाने विश्रांती घेतली. एखाद्या उद्योजिकेने बालसंगोपनासाठी उद्योगातून विश्रांती घेतली की, तिचं पुनरागमन कठीण असतं. मात्र, हा समज खोटा ठरवत शुभदा यांनी घरातच प्रशिक्षण वर्गाचा सेटअप उभारला आणि घरातूनच कार्यालय व प्रशिक्षण सुरु केले.
मुलांना निव्वळ गणकतंत्र न शिकवता संस्कारक्षम पिढी घडविण्याकडे ‘किड्स इंटेलिजन्स’चा कल आहे. त्यासाठी मुलांना ध्यानधारणा शिकवली जाते. याचाच परिणाम म्हणून एक ‘स्पेशल चाईल्ड’ असलेली विद्यार्थिनी आज सराईतपणे गणिते सोडविते. सध्या २०० हून अधिक विद्यार्थी ‘किड्स इंटेलिजन्स’मध्ये शिकत आहेत. ‘किड्स इंटेलिजन्स’चे २० प्रशिक्षित शिक्षक त्यांना प्रशिक्षण देतात. ज्या व्यक्तीस मग ती पुरुष असो वा स्त्री, तिला जर वाटत असेल की तिला मुलांना उत्तमरीत्या शिकवू शकते तर अशांना शुभदा भावे ‘एक्सपर्ट अबॅकस टीचर्स ट्रेनिंग’च्या माध्यमातून शिक्षक म्हणून घडवितात. हे शिक्षक निव्वळ भारतातीलच नव्हे, तर अमेरिका, इंग्लंड, दुबई, सौदी अरेबिया, कॅनडा, सिंगापूर आणि स्कॉटलंड या देशातील विद्यार्थ्यांना ‘किड्स इंटेलिजन्स’च्या माध्यमातून ‘अबॅकस’चे धडे देत आहेत. शिक्षण क्षेत्रातील हे एकप्रकारे उद्योजक निर्माण करण्याचे काम शुभदा भावे करत आहेत. आई, बहीण, सासूबाई आणि सहकारी या स्त्रीशक्तीशिवाय हा उद्योजकीय प्रवास शक्य नव्हता, हे प्रांजळपणे शुभदा भावे मान्य करतात. आपल्या समाजातील अनेक महिलांना शैक्षणिक क्षेत्रातील उद्योजिका म्हणून घडविण्याचा त्यांचा मानस आहे. विद्येची देवता म्हणून सरस्वती देवीचे पूजन केले जाते. शुभदा भावे खर्या अर्थाने सरस्वती कन्या आहेत