थरूरनीती

21 Oct 2020 22:18:17

Shashi_1  H x W


शशी थरूर यांच्या वक्तव्याने राजकीय नीतिमत्तेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विदेशात आपण एका देशाचे प्रतिनिधित्व करतो याचे भान ठेवायला पाहिजे. सत्ताधारी-विरोधी पक्ष हा देशांतर्गत प्रश्न आहे. विदेशात आम्ही सर्व एक आहोत, एका देशाचे घटक आहोत, ही प्रतिमा निर्माण करायला पाहिजे.
 
 
विन्स्टन चर्चिल यांच्या जीवनातील हा किस्सा आहे. महायुद्ध सुरू होण्यापूर्वी हे अमेरिकेत प्रवासाला गेले होते. तेव्हा ते विरोधी बाकावर बसत असत. नेव्हिल चेंबरलिन तेव्हा पंतप्रधान होते. त्यांच्यावर ते खूप टीका करत असत. पत्रकारांनी चर्चिल यांना ब्रिटनच्या अंतर्गत राजकारणाबद्दल प्रश्न विचारले. चर्चिलने उत्तर दिले. “मी, 'His Majesties' शासनाचा विरोधी पक्षनेता आहे. माझ्या सरकारवर मला जी टीका करायची आहे. ती मी देशात करेन. देशाबाहेर जाऊन माझ्या सरकारवर टीका करणार नाही, तुम्ही दुसरे प्रश्न विचारा.”
 
 
शशी थरूर काँग्रेसचे नेते आहेत. विरोधी बाकावर बसणारे आहेत. राजपुत्र राहुल गांधींचे मित्र आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानातील लाहोर येथे ’Think Fest' (विचारवंतांची परिषद) झाली. या परिषदेला उद्देशून शशी थरूर यांनी काही विचार मांडले, ते ऐकल्यानंतर मला चर्चिलच्या वरील किश्श्याची आठवण झाली. पाकिस्तान आपले शत्रूराष्ट्र आहे. पाकिस्तानबद्दल कळवळा असणारे अनेक बुद्धिजीवी भारतात आहेत. काँग्रेसमध्येही आहेत. शशी थरूर, मणिशंकर अय्यर हे त्यातील आहेत. लाहोरच्या विचारवंतांच्या परिषदेला उद्देशून शशी थरूर यांनी जे वक्तव्य केले, त्यात मोदी शासनावर आरोप केले. मोदींवर आरोप करण्याची जागा लाहोर नाही, दिल्ली आहे.
 
 
लाहोरमध्ये आरोप करताना शशी थरूर म्हणतात, “कोरोना व्हायरसचा प्रश्न मोदी शासनाने हाताळताना चुका केलेल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाविषयी राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यात सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या. रोगराई वाढेल, आर्थिक विकासाला खीळ बसेल, याची कल्पना दिली होती. मोदी सरकारचा कारभार चांगला आहे असा डांगोरा पिटला जातो, त्या मागचे रहस्य समजत नाही. मुस्लीम समुदायाविषयी पूर्वग्रहदूषित आहे. या रोगराईच्या काळात त्यांच्याबद्दल दूरभावना ठेवण्यात आली, त्यांना योग्य ती वागणूक देण्यात आली नाही.”
 
 
शशी थरूर हेच जर भारतात म्हणाले असते, तर त्यावर विशेष चर्चा करण्याचे कारण नव्हते. राहुल गांधी उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखे सल्ले देत फिरतच असतात, हे जनतेला माहीत आहे. दिल्लीत ‘तबलिगी’ जमातीने कोरोना व्हायरस पसरविण्यास कशी मदत केली होती, हे लोक जाणून आहेत. शाहीनबागेत मुस्लीम महिलांना पुढे करून कट्टरपंथीयांनी जो गोंधळ घातला, तोही देशाने पाहिलेला आहे. याच मंडळींनी दिल्लीत दंगल घडवून आणली, तिचादेखील अनुभव देशाने घेतलेला आहे. यासाठी शशी थरूर यांचे वक्तव्य जर भारतात झाले असते, तर तो राजकीय विनोदाचा भाग म्हणून लोकांनी सोडूनही दिला असता.
 
 
त्यांचे वक्तव्य पाकिस्तानात झाले आहे. मोदी शासनावर बोलण्याची जागा पाकिस्तान नाही. त्यामुळे शशी थरूर यांचे वक्तव्य कमालीचे आक्षेपार्ह झालेले आहे. अशी वक्तव्ये आली की, त्यावर राजकीय टीकाही होणारच. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “पाकिस्तानच्या व्यासपीठावरून भारताविरुद्ध काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता अशी वक्तव्य करतो, यावर विश्वास ठेवणेदेखील कठीण आहे.” पात्रा पुढे म्हणतात की, “राहुल गांधी यांना पाकिस्तानमधून निवडणूक लढवायची आहे का? राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानमध्ये ‘हिरो’ झालेले आहेत.”
 
 
शशी थरूर यांनी आतापर्यंत तीन बायका केलेल्या आहेत. शेवटच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला. शेवटची पत्नी हयात असताना एका पाकिस्तानी महिलेशी त्यांचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण व्हायचे, अशा बातम्या आल्या. शशी थरूर यांची दुसरी बाजू अशी की, ते चांगले लेखक आहेत. त्यांच्या नावावर अनेक वाचनीय पुस्तके आहेत. ती सर्व इंग्रजी भाषेत आहेत. या पुस्तकातून ते विचार करणारे आहेत आणि ते विचार मांडणारे लेखक आहेत, हे जाणवते. काँग्रेसमध्ये स्वतंत्रपणे विचार करणारी माणसे एकूणच कमी आहेत, त्यात थरूर यांचे स्थान वरचे समजले पाहिजे.
 
 
विचारवंत जेव्हा राजकारणात जातो, तेव्हा स्वतंत्र आणि परखड विचार मांडण्याची अपेक्षा असते. भाटगिरी करणारे विचार जर तो मांडू लागला, तर विचारवंत म्हणून त्याचे मूल्य रसातळाला जाऊ लागते. शशी थरूर हे राहुल गांधींचे भाट झालेले आहेत. काँग्रेस पक्षात राहायचे तर ही भाटगिरी आवश्यक असते. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा किती हुशार आहेत आणि देशापुढील प्रश्न त्यांना मोदींपेक्षा किती अधिक समजतात, हे थरूर यांना सांगायचे आहे. बौद्धिक क्षमतेचा विचार केला, तर शशी थरूर हे राहुल गांधींपेक्षा अनेक पटीने बुद्धिमान आहेत आणि राहुल गांधींपेक्षा शतपटीने विचार देणारे आहेत. पण, ते राजपुत्र नाहीत म्हणून त्यांना भाटगिरी करावी लागते.
 
 
शशी थरूर हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, असा त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या वैवाहिक जीवनाची वर माहिती दिली आहे. अनेक बायका करणार्‍यांना आपल्याकडे ‘स्त्रीलंपट’ म्हणतात. शशी थरूर यांना काय म्हणायचे आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे. पण, ते म्हणतील की, ‘हा माझ्या खासगी जीवनाचा प्रश्न आहे. सार्वजनिक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही.’ पुरोगामी आणि सेक्युलिरस्ट माणसांचा हा आवडता सिद्धांत आहे. सार्वजनिक आणि खासगी असे काही जीवन नसते. जीवन हे एकच असते आणि ते पूर्णपणे पारदर्शी असावे लागते. ‘माझ्या खासगी आयुष्यात मी काय करतो, याच्याशी तुम्हाला काय करायचे?’ अशी म्हणण्याची आपल्याकडे प्रथा नाही. आपल्या देशाची ती मूल्य परंपरा नाही. श्रीरामाचे खासगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य एका खुल्या पुस्तकासारखे होते. तीच गोष्ट महात्मा गांधींची आहे. हा आदर्श जपायचा की, शशी थरूरचा आदर्श ठेवायचा, हे काँग्रेसने ठरवायचे.
 
 
शशी थरूरच्या समर्थनार्थ काँग्रेसमधले अभिषेक मनू सिंघवी हे पुढे आले. ते पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. अभिषेक मनू सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. सिंघवी वकील असल्यामुळे वकिली युक्तिवाद करण्यात ते पटाईत आहेत, ते म्हणतात की, “काँग्रेसच्या नेत्यांचे असे काही वक्तव्य आले की, त्याची विकृत स्वरूपात मांडणी करणे ही भाजपची सवय आहे. बांगलादेश दरडोई उत्पन्नात भारताला मागे टाकेल, असे जर मी बोललो तर मी ढाक्यातून निवडणूक लढवावी, भारतातून नव्हे, असे भाजप मला सुनावेल.” सिंघवी यांनी ‘जुमलेबाजी’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. “भाजप मूळ मुद्द्याला बगल देऊन चर्चा भलतीकडे वळविण्यात वाक्बगार आहे. कानांनी क्षणभर ऐकायला आणि डोळ्यांनी क्षणभर बघायला अशा गोष्टी बर्‍या वाटतात. पण, त्यांचा प्रभाव गेल्यानंतर त्यातील फोलपणा उघड होतो.” अभिषेक मनू सिंघवी यांचे हे वक्तव्य पक्षाचा प्रवक्ता म्हणून लगेचच येणे आणि प्रतिवाद करणे चांगले आहे. राजकीय चर्चेच्या जीवंतपणाचे हे लक्षण आहे.
 
 
अभिषेक सिंघवी यांनी वकिली खाक्यांना धरून युक्तिवाद केला आहे. मूळ मुद्दा शशी थरूर जे बोलले ते चांगले की वाईट, असा नसून बोलण्यासाठी जी जागा आणि व्यासपीठ निवडले, ती योग्य की अयोग्य, असा आहे. शत्रू राष्ट्राच्या भूमीवर जाऊन आपल्या देशातील शासनाची बदनामी करणे, ही राजकीय अनैतिकता आहे. ही चांगली की वाईट, याचा वकिली युक्तिवाद सिंघवी यांनी केलेला नाही. कारण, तो त्यांना सोयीचा नाही. त्यामुळे ‘भाजप जुमलेबाजी करतो,’ असे विधान त्यांनी केले.
 
 
शशी थरूर यांच्या वक्तव्याने राजकीय नीतिमत्तेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाची उणीधुणी काढणे आणि त्यांच्या राज्यकारभारावर टीका करणे अपेक्षित असते. सत्तेचा गुणधर्म अनियंत्रित होण्याचा असतो. अनियंत्रित सत्ता व्यक्ती आणि समाजाला दुःख देणारी होते. विरोधी पक्षाचे काम सत्तेवर अंकुश ठेवण्याचे असते. हे काम देशांतर्गत राजकारण करताना सर्वशक्तीनीशी करावयाचे असते. विदेशात मात्र आपण एका देशाचे प्रतिनिधित्व करतो याचे भान ठेवायला पाहिजे. सत्ताधारी-विरोधी पक्ष हा देशांतर्गत प्रश्न आहे. विदेशात आम्ही सर्व एक आहोत, एका देशाचे घटक आहोत, ही प्रतिमा निर्माण करायला पाहिजे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, रशिया इत्यादी देशातील विरोधी पक्षनेते विदेशी व्यासपीठावर जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारी वक्तव्य कधीच देत नाहीत. शशी थरूर आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी हा पाठ गिरवायला पाहिजे.
 
 
आणखी एक तेवढाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, आपण सर्वांनी २४ तास देशभक्त असले पाहिजे. स्वतंत्र देशातील देशभक्ती म्हणजे देशातील शासन आणि शासकीय यंत्रणा ही माझी आहे, अशी भावना असणे आवश्यक आहे. त्याच्या उणिवा दाखवणे हे कर्तव्य असते, तोदेखील देशभक्तीचा एक भाग असतो. परंतु, या गोष्टी विदेशी व्यासपीठावर करणे, तेही शत्रू राष्ट्राच्या व्यासपीठावर करणे, याला ‘देशभक्ती’ म्हणता येत नाही. ही थरूरनीती राजकीय अनीती आहे आणि तिचा धिक्कार करावा, तेवढा कमीच आहे.
Powered By Sangraha 9.0