स्टॅन स्वामीला अटक केल्याबद्दल माओवाद्यांसह विविध ख्रिस्ती, मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना त्याचा पुळका आला आहे. स्टॅन स्वामी या फादरने काही गैरकृत्य केले, असे या मंडळींना वाटतच नाही! त्यामुळे या फादरच्या सुटकेसाठी देशाच्या विविध भागांमध्ये मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत.
पुण्यामध्ये डिसेंबर २०१७ मध्ये झालेली एल्गार परिषद आणि त्या पाठोपाठ भीमा-कोरेगाववरून राज्यात घडलेला हिंसाचार, या सर्व प्रकरणाचा तपास करीत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फादर स्टॅन स्वामी या ख्रिस्ती धर्मगुरूस काही दिवसांपूर्वी अटक केली. फादरच्या पांढर्या झग्याखाली स्टॅन स्वामी हा अनेक बेकायदेशीर कारवाया करण्यात गुंतला असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आढळून आले. बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या संघटनेचा सदस्य म्हणून स्टॅन स्वामी कार्यरत होता. स्टॅन स्वामी या फादरचे वय ८३ वर्षांचे असल्याने एवढ्या वयस्कर व्यक्तीस अटक केल्याबद्दल माओवाद्यांसह विविध ख्रिस्ती, मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना स्टॅन स्वामी याचा पुळका आला आहे. स्टॅन स्वामी या फादरने काही गैरकृत्य केले, असे या मंडळींना वाटतच नाही! त्यामुळे या फादरच्या सुटकेसाठी देशाच्या विविध भागांमध्ये मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत. माओवादी संघटनेचा सक्रिय सदस्य असलेला, फादर स्टॅन स्वामी याचा माओवाद्यांच्या विविध मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आढळून आले. तसेच माओवाद्यांच्या कारवाया करण्यासाठी स्टॅन स्वामी यास पैशांचा पुरवठा होत असल्याची माहिती ‘एनआयए’च्या हाती लागली आहे. माओवाद्यांशी संबंधित ‘परसेक्युटेड प्रीझनर्स सॉलिडॅरिटी कमिटी’ चा निमंत्रक म्हणून हा फादर कार्य करीत होता. फादर स्टॅन स्वामी हा सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, अरुण फेरेरा, हनी बाबू, शोम सेन, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, आनंद तेलतुंबडे या माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्याचे ‘एनआयए’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पण, मार्क्सवाद्यांशी संबंध असल्यावरून आपणास यामध्ये विनाकारण गुंतविण्यात आले असल्याचे या फादरचे म्हणणे आहे. जे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी आदिवासी, दलित आदींच्या हक्काच्या बाजूने आणि देशातील सत्ताधार्यांच्या विरोधात उभे राहतात, त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप या फादरने एका निवेदनाद्वारे केला आहे. देशद्रोही कृत्ये करायची आणि त्या प्रकरणी अटक केल्यानंतर कांगावा करायचा, यालाच ‘चोराच्या उलट्या बोंबा’ नाही तर काय म्हणायचे?
या माओवादी फादरची सुटका करण्यात यावी, यासाठी शनिवारी कोलकातामध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला ममता बॅनर्जी यांच्या सरकारने परवानगी दिली होती, हे काही वेगळे सांगायलाच नको! ममता बॅनर्जी यांना केवळ भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या निदर्शनांचे, कार्यक्रमांचे वावडे! भाजपशी त्यांचा नेहमीच उभा दावा! असो. तर कोलकातामध्ये शनिवारी जो मोर्चा काढण्यात आला होता, त्यात सहभागी झालेल्यांनी या ज्येसुईट धर्मगुरूंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्र सरकारने स्टॅन स्वामी यांची सुटका न केल्यास सर्व अल्पसंख्याक एकत्र येतील आणि ते सरकारविरुद्ध आंदोलन करतील, असा इशारा नाखोडा मशिदीच्या इमामाने यावेळी दिला. एखाद्या भावावर अन्याय होत असेल तर अन्य भाऊ बघ्याची भूमिका घेणार नाहीत, असा इशारा मौलाना शफिक कास्मी याने यावेळी दिला. स्टॅन स्वामी याच्या सुटकेसाठी मुस्लीम समाजही ख्रिस्ती समाजासमवेत उभा राहिल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. पण, या मोर्चात सहभागी झालेले कोणीच स्टॅन स्वामी याच्यावर ‘एनआयए’ने जे गंभीर आरोप केले आहेत, त्या आरोपांविषयी ‘ब्र’ काढायला तयार नाही. ‘एनआयए’ला स्टॅन स्वामी याच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे, अन्य काही माहिती मिळाल्याने त्या आधारे त्यास अटक करण्यात आली. त्याचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आली. पण, त्याबद्दल या सर्वांचे मौन!
देशद्रोही कारवाया करणार्या व्यक्तीस जी अटक झाली ती योग्यच, असे यापैकी कोणी म्हणत नाही. या मोर्चापुढे बोलताना, आर्चबिशप रेव्हरंड डिसूझा यांनी, “फादर स्वामी यांस त्वरित सोडावे,” अशी मागणी केली. “फादर स्वामी एकटे नसून त्यांच्या मागे आम्ही सर्व आहोत, हे दाखवून देण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत,” असे ते म्हणाले. फादर स्टॅन स्वामी यास गेल्या ८ ऑक्टोबर रोजी रांची येथे अटक करण्यात आली आणि त्यास मुंबईस हलविण्यात आले. स्टॅन स्वामी यास येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या फादरवर जे आरोप ‘एनआयए’ने ठेवले आहेत, त्याचा निर्णय काय होतो ते पाहण्याचीही तयारी या ख्रिस्ती आणि मुस्लीम नेत्यांची नाही. स्टॅन स्वामी निर्दोष असल्याचा या सर्वांचा दावा असल्याने त्याच्या सुटकेची मागणी ते करीत आहेत. पण, केंद्र सरकार किंवा ‘एनआयए’ अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता, भीमा-कोरेगाव हिंसाचाराला जे जबाबदार आहेत, त्यांना कठोर शासन दिल्यावाचून राहणार नाही. फादरचे वय 83 असल्याने त्याचा विचार करून सुटका केली जावी, अशी मागणी केली जात आहे. पण, देशात फूट पाडण्याचे, समाजा-समाजात तेढ निर्माण करून देशात अराजकाची परिस्थिती निर्माण करण्याचे कारस्थान रचणार्यांना त्यावेळी आपल्या वयाची आठवण झाली नाही का?
कमलनाथ यांच्या निषेधार्थ मौन व्रत!
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ सत्ता गेल्यापासून बेताल बडबड करीत सुटल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीची धामधूम त्या राज्यात सुरू आहे. ग्वाल्हेरच्या डाबरा शहरात आयोजित प्रचारसभेत कमलनाथ यांची जीभ पार घसरली. त्या मतदारसंघात उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवार विद्यमान मंत्री इम्रतीदेवी यांच्याबद्दल कमलनाथ यांनी आक्षेपार्ह विधान केले. “या मतदारसंघात उभा असलेला आमचा उमेदवार एक ‘साधी व्यक्ती’ आहे, तर विरोधी उमेदवार ‘आयटम’ आहेत,” असे भरसभेत कमलनाथ म्हणाले. कमलनाथ यांच्या या विकृत मनोवृत्तीचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कमलनाथ यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने मध्य प्रदेशमध्ये ‘मौन व्रत’ कार्यक्रमाचे आयोजन करून कमलनाथ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. “कमलनाथ यांनी, असे वक्तव्य करून केवळ इम्रतीदेवी यांचा अवमान केला नाही, तर ग्वाल्हेर-चंबळ भागातील प्रत्येक भगिनीचा अपमान केला आहे,” अशी टीका मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. कमलनाथ यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आदी विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला. गेल्या वर्षी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी निष्ठावान असलेल्या इम्रतीदेवी आणि अन्य २१ आमदारांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्या राज्यातील विधानसभेच्या २८ जागांसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमलनाथ यांची जीभ घसरली आणि त्यांनी काँग्रेसची ‘संस्कृती’ काय आहे, ते आपल्या वर्तनाने दाखवून दिले!