नवी दिल्ली : इंडिगो (Indigo) मध्ये स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामराला पत्रकाराशी गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात छळण्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली आहे.
इंडिगोच्या ‘6E 5317’ फ्लाइटमध्ये कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. तसेच कुणालने याबद्दल एक व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट झाल्यानंतर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियातून कुणालवर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली. त्यानंतर इंडिगो (Indigo) ने या प्रकरणाची दखल घेत त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्याची कारवाई केली. कुणाल कामराची वर्तवणूक स्वीकारण्यासारखी नाही, असे इंडिगो एअरलाईन्सने स्पष्ट केले. एअर इंडिया (Air India) ने सुद्धा कुणाल कामरा (Kunal Kamra) वर कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कुणाल कामरावर बंदी घालण्यात आली आहे.
कुणाल कामराच्या या वर्तवणुकीची केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardip singh Puri) यांनी सुद्धा दखल घेतली. विमान प्रवासात प्रवाशांना त्रास देणे योग्य नाही. असा प्रकार प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकतो. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. पण इतर एअरलाईन्सनेही कुणालवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणीच पुरी यांनी केली.