राजकीय हस्तक्षेपाचा ‘सोरोस प्रयोग’

27 Jan 2020 21:33:20
SOROS_1  H x W:


आधुनिक राष्ट्रवादाचे आकलन हिटलरच्या राष्ट्रवादातून केले जात असल्याने होत असलेल्या चुका या सगळ्या मंडळींना जनमानसापासून दूर नेतात. अमान्य असला तरी राजकीय हस्तक्षेपाचा हा ‘सोरोस प्रयोग’ अभ्यासला गेला पाहिजे.



अत्यंत शानदार पद्धतीने नुकताच आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला. भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणारा १५ ऑगस्ट, तर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाणारा २६ जानेवारी हे दोन दिवस वेगळे का? या प्रश्नाचे उत्तर, १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, तर २६ जानेवारीला आपण घटना स्वीकारली इतके सोपे नाही. या दोन राष्ट्रीय अभिव्यक्ती आहेत. धर्मसत्ता, राजसत्ता ते लोकशाही राज्यव्यवस्था हे समूह संचालनाच्या मानवी प्रवासातले महत्त्वाचे घटक आहेत. टोळ्यांकडून संसदेपर्यंतच्या प्रवासात आज आपण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींपर्यंत आलो आहोत. ज्या राष्ट्रांमध्ये दिखाव्याची का होईना लोकशाही आहे, त्या राष्ट्रातसुद्धा आज लोकप्रतिनिधी नेमले जातात. भारत व अमेरिका हे सुदृढ लोकशाही असलेले देश मानले जातात. लोकशाही ही नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया, तर प्रजासत्ताक हे निवडून आलेल्या सरकारने कसे काम करावे, हे सांगणारे नियमन. कायदा व घटना हा त्याचा महत्त्वाचा भाग. कायदा करून देश चालणार असेल, अशा समजुतीत राहायचे असेल तर ‘मॅग्ना कार्टा’ ते भारतात गांधी-नेहरू परिवाराने प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून रुजविलेली आपली मुळे अशा पद्धतीने याकडे पाहायला लागेल. भारतात रुळलेली लोकशाही आणि ज्या युरोपातून ती आपल्याकडे आली, त्या युरोपात सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडी या वेधक मानाव्या अशा आहेत.



‘गुंतवणूक’ विषयातले बडे नाव म्हणजे जॉर्ज सोरोस. सोरोस हे गुंतवणूक क्षेत्रातले मोठे नाव असले, तरी सोरोस यांची सामाजिक-राजकीय मते आहेत. आपल्या मतावर ते ठाम असतात. आपल्या मतांसाठी लढाव्या लागणाऱ्या सर्वच प्रकारच्या लढायांमध्ये आपल्या आर्थिक ताकदीसह उतरण्याची त्यांची तयारी असते. अभिमत निर्मिती व त्या आधारावर नक्की केली जाणारी धोरणे, ही आजच्या काळातील नवी लढाई आहे. आपल्याकडे ती अद्याप तिच्या शुद्ध स्वरूपात पोहोचलेली नसली तरी भविष्यात ती आपल्याकडेही येणारच आहे. माध्यमे हे त्यांचे मुख्य प्रभावक्षेत्र आहे आणि त्यांच्या माध्यमातून अभिमत दामटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपल्याकडे ही पद्धत रुढ होत नाही, कारण काही मुद्द्यांच्या आधारावर न चालता मोदी-शाह यांच्या द्वेषाच्या इंधनावर ती चालते. त्यामुळे त्यात काही तर्कसुसंगती नसते आणि पर्यायही उभे राहात नाहीत. त्यामुळे पर्यायांची भाषा करणारे त्यांच्या तुटपुंज्या पर्यायांसोबतच हवेत विरून जातात.



जॉर्ज सोरोस स्वत:ला ‘मानवतावाद’ आणि ‘लोकशाहीचे रक्षणकर्ते’ समजतात. त्यांच्या लेखी आज लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशहाच सत्तेच्या केंद्रस्थानी येऊ लागले आहेत आणि प्रबोधनानेच त्यांचा विरोध केला जाऊ शकतो. सोरोस इतक्यातच थांबत नाहीत. अमेरिकेच्या निवडणुकीत त्यांनी क्लिंटन आणि ओबामा यांना घसघशीत आर्थिक मदत केली होती. परवा दावोस येथे बोलताना सोरोस यांनी आपण विद्यापीठांमध्ये वैचारिक घुसळणूक करण्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रूपये खर्च करणार असल्याचे सांगितले. ट्रम्प, मोदी आणि जिनपिन यांच्यावर त्यांनी टीकाही केली आणि हे लोक भविष्यातील हुकूमशहा असू शकतात, असेही सांगितले. बाकीच्यांचे माहीत नाही, पण भारतीय परिप्रेक्ष्यात आपल्याकडे इंदिरा गांधींनी असा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी मतपेट्यांच्या माध्यमातून त्यांना घरचा रस्ता दाखविला होता, हे सोरोस विसरले आहेत. युरोपातले सामाजिक राजकीय वातावरण हे नेहमी ‘प्रोपोगंडा’ पद्धतीने चालते. सोरोस त्याच पद्धतीचा अवलंब करीत आहेत. दोन मानव समूहातील संघर्ष हा युरोपियन समाजातील विचारवंतांसाठी मोठ्या आव्हानाचा मुद्दा राहिला आहे.



नव्या शतकाची मूल्ये ही या संघर्षातूनच निर्माण झाली आहेत. सोरोस स्वत: एका ज्यू कुटुंबात जन्मले आहेत. विस्थापितांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले आहे. मात्र, आजच्या संदर्भातले अर्थ त्यांना वाटेल, तशा पद्धतीने लावता येणार नाहीत. धर्मनिरपेक्षतेचे मूल्य युरोपात चर्च आणि राजसत्तेच्या संघर्षातून आले. सेमेटिक धर्मांनी निर्माण करून ठेवलेले संघर्ष हे जागतिक डोकेदुखीचे कारण आहेत. सोरोसना यावर काही भाष्य करावेसे वाटत नाही. मानवतेचे जागतिक मूल्य सर्वमान्यच, मात्र त्याच्या आधारावर युरोपियन नेतृत्वांनी स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी करून घेतला. हिलरी आणि ओबामा यांना अमेरिकन जनतेने नाकारले, याचे कारण हेच आहे. राष्ट्रवादाचा उदय हे नवे जागतिक लक्षण, हे जुने विचारवंत हिटलरच्या संदर्भातूनच पाहात राहतात. आपल्या समोरच्या ज्या समस्या आहेत, त्याचा विचार न करता जागतिक मूल्यांची पोपटपंची कुणालाही परवडणारी नाही.



सोरोस यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी हंगेरियन लोकसभेने सोरोसविरोधी विधेयक आणले होते. तिथल्या लोकांचे म्हणणे होते, मानवतावादाच्या दृष्टीने हंगेरीत बोलाविल्या जाणाऱ्या  विस्थापितांमुळे हंगेरीच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतो. सोरोस अशा प्रकारच्या बौद्धिक करामतींना भरपूर अर्थसाहाय्य करतात. मात्र, त्यांचे वास्तवातले परिणाम काय होऊ शकतात, याची त्यांना कल्पनाच येत नाही. मुळात त्यांचा व्यवसाय हा गुंतवणुकीचा. त्यांना यातून जे काही मिळते, त्यासमोर कोणतेही उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधांपेक्षा कमीच असते. पर्यायाने जमिनीवरील तथ्यांशी त्यांचे काही देणेघेणे नाही. स्थानिक हंगेरियन मंडळींनी त्यांच्यावर जे आरोप केले होते, ते मजेशीर असले तरी विचार करायला लावणारे होते. स्वस्त कामगारांसाठी हे सारे केले जाते, असा त्यांचा आरोप होता. युरोपच्या इस्लामीकरणाला सोरोसच जबाबदार असल्याचे काहींनी म्हटले होते. आजच्या जगातील सर्वात मोठी समस्या ही दहशतवादाची आहे. दहशतवादाला आर्थिक पुरवठा करणाऱ्या देशांशी विचारवंत आणि गुंतवणूकदार म्हणून ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची कुणाचीही तयारी नाही. आता विद्यापीठातील चळवळींना मानवतेच्या मूल्यांसाठी झगडायला लावणे, हा सोरोस यांचा उद्देश आहे. राजकारण हा कुठल्याही चळवळीतला कधीही अस्पृश्य न राहिलेला घटक. सोरोस यांच्या चळवळीतूनही काही राजकीय कल समोर आले आहेत. आधुनिक राष्ट्रवादाचे आकलन हिटलरच्या राष्ट्रवादातून केले जात असल्याने होत असलेल्या चुका या सगळ्या मंडळींना जनमानसापासून दूर नेतात. अमान्य असला तरी राजकीय हस्तक्षेपाचा हा ‘सोरोस प्रयोग’ अभ्यासला गेला पाहिजे.
Powered By Sangraha 9.0