भारतामधून १३० वर्षांनंतर 'क्लिक बीटल'च्या नव्या प्रजातीचा उलगडा

27 Jan 2020 20:03:29
tiger_1  H x W:
 
 

कोकणातील राजापूर तालुक्यामधून शोध

मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतामधून १३० वर्षांनंतर ढाल किड्याच्या (बीटल) नव्या प्रजातीचा शोध लावण्यात वन्यजीव संशोधकांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे संशोधकांना ही प्रजात कोकणातील राजापूर तालुक्यात आढळून आली आहे. 'क्लिक बीटल' वर्गातील या प्रजातीचे नामकरण 'लॅम्प्रोस्पेफस सल्कॅटस' असे करण्यात आले असून जगात या पोटजातीत केवळ एकच प्रजात आढळते.
 
 
 
tiger_1  H x W:
 
 
भारतात कीटकशास्त्रामध्ये अजूनही फारसे संशोधनाचे काम झालेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कीटकशास्त्रात रस असणारी एक फळी निर्माण झालेली आहे. परिणामी कीटकांच्या काही प्रजातींचा उलगडा होण्यास मदत झाली आहे. जगात बीटलच्या 'लॅम्प्रोस्पेफस' पोटजातीमध्ये केवळ एकच प्रजात अस्तिवात होती. तिचा शोध भारतातील हिमालयातून १८८८ साली लावण्यात आला होता. आता जवळपास १३० वर्षांनी या पोटजातीत एका नव्या प्रजातीचा समावेश झाला आहे. कोकणातील राजापूर तालुक्यातून 'लॅम्प्रोस्पेफस सल्कॅटस' या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. सोमय्या महाविद्यालयाचे जीवशास्त्र व कीटकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डाॅ. अमोल पटवर्धन आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) साहाय्यक संचालक (प्राकृतिक इतिहास विभाग) राहुल खोत यांनी या प्रजातीचा उलगडा केला आहे. रविवारी प्रकाशित झालेल्या 'जर्नल आॅफ थ्रेट्रेंड टॅक्सा' या संशोधन पत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
राजापूर तालुक्यात बकाळे गावात २०१२ साली सड्यांवर काम करत असताना या बीटल प्रजातीची मादी आढळल्याची माहिती 'बीएनएचएस'चे राहुल खोत यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. एका झाडावर असलेल्या या बीटलचे चकाकणारे रंग आकर्षिणारे होते. त्यामुळे या मादीचे नमुने गोळा करुन आकारशास्त्राचे आधारे तिची तपासणी करण्यात आली. या प्रजातीवर सात वर्ष अभ्यास करुन नोव्हेंबर, २०१८ मध्ये यासंदर्भातील शोधनिबंध 'जर्नल आॅफ थ्रेट्रेंड टॅक्सा'ला पाठविल्याचे त्यांनी सांगितले. भारतात कीटकशास्त्रात फारसा अभ्यास झालेला नसल्याने त्यासंदर्भातील माहिती विखुरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या नव्या प्रजातीची तपासणी करण्यासाठी आम्हाला परदेशातील काही संग्रहालयाकडून बीटलच्या नमुन्यांचे छायाचित्र मागावावे लागल्याचे डाॅ. अमोल पटवर्धन यांनी सांगितले. नव्याने उलगडण्यात आलेली ही प्रजात लॅम्प्रोस्पेफस पोटजातीमधील जगातील दुसरीच प्रजात असल्याचे, ते म्हणाले.
 
 
 
'क्लिक बीटल' म्हणजे ?
नव्याने शोधण्यात आलेली 'लॅम्प्रोस्पेफस सल्कॅटस' ही प्रजात 'क्लिक बीटल' वर्गात मोडते. बऱ्याचदा ढाल किडे जमिनीवर पालथे पडल्यानंतर त्यांना पुन्हा सरळ होता येत नाही. अशा वेळी त्यांची शिकार होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, 'क्लिक बीटल' वर्गातील ढाल किड्यांच्या गळ्याजवळ स्प्रिंगसारखा एक अवयव असतो. हे किडे जमिनीवर पालथे पडल्यावर हा अवयव आवळला जाऊन वेगाने स्प्रिंगसारखा उडतो. या झटक्यामुळे हे कीडे मूळ अवस्थेत येतात. म्हणून त्यांना 'क्लिक बीटल' म्हटले जाते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0