संपूर्ण देशातच हिंदुत्वाचे वातावरण असताना राज ठाकरेंनी तरी त्यातून वेगळे का राहावे? शिवसेना आपल्या आचरटपणामुळे जे अवकाश रिते करेल, ते व्यापायला कुणीतरी लागणारच आहे.
गेल्या वर्षी निरनिराळ्या कारणांमुळे गाजलेला एक सिनेमा म्हणजे 'बाजीराव मस्तानी.' सिनेमा म्हणून मूल्यमापन सध्या बाजूला ठेवूया, पण बाजीराव साकारणारा रणवीर सिंग सिनेमाच्या पहिल्याच प्रवेशात म्हणतो, "छत्रपती शिवाजी महाराज का सपना संपूर्ण हिंदू समाज." दुसरे उदाहरण घ्यायचे तर सध्या सिनेमागृहात जोरदार चालणारा 'तान्हाजी.' ज्यात तान्हाजी साकारणारा अजय देवगण मुघलांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना म्हणतो की, "तुम जीकर भी क्या करोगे, मरे तो जय श्री राम भी नही कह सकते."
ही दोन उदाहरणे हिंदी सिनेमातली आहेत. त्याच हिंदी सिनेमातली, जिथे 'मुघल-ए-आजम' ते रझिया सुल्ताना सारख्या ऐतिहासिक सिनेमांचा ढोल वाजविला जातो. अशा तथाकथित सेक्युलर वातावरणात वर उल्लेखलेल्या सिनेमांची निर्मिती होते, अशा पटकथा आणि संवाद लिहिले जातात. ही कशाची नांदी आहे? ही नांदी आहे हिंदुत्वच या देशाचा श्वास असल्याच्या आत्मभानाची! सिनेमा हा समाजातील चालू घडामोडींचा आरसा मानला जातो. या देशातल्या निरनिराळ्या घटकांना त्यांच्या हिंदुत्वाची जाणीव होत असेल आणि त्याची अभिव्यक्ती जर सिनेमातही उमटत असेल, तर सहजच मानले पाहिजे. आता जर सिनेमात हे घडत असेल तर राजकारण तरी यापासून कसे अलिप्त राहावे?
राज ठाकरे आपल्या पहिल्या अधिवेशनात काय बोलणार याचे कुतूहल संपूर्ण देशात असताना, त्यांनी हाती घेतलेले हिंदुत्वाचे मुद्दे हे त्यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारेच होते. हिंदुत्वाची भाषा बोलणाऱ्या शिवसेनेचे हजार गुन्हे हिंदू समाजाने माफ केले आहेत. राज ठाकरे तर आता कुठे हिंदुत्वाची भाषा बोलायला लागले आहेत. तेव्हा त्यांना जे काही बोलायचे आहे, ज्या काही भूमिका घ्यायच्या आहेत, त्या घेऊ दिल्या पाहिजेत. पुढे काय घडते ते येणारा काळच ठरवेल. राज ठाकरेंनी जे राजकीय अवकाश व्यापायचे ठरविले आहे, ते राज ठाकरे व्यापून उरतात का, हे पाहाणे मोठे रंजक ठरेल. पण, ज्या कारणाने त्यांना या अवकाशात राजकीय संधी दिसते, ती मात्र समजून घ्यावी लागेल. मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरणापासून ते रामजन्मभूमीपर्यंत आणि गुजरातमध्ये गोध्राकांडाला दिल्या गेलेल्या सडेतोड उत्तरापासून ते जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यापर्यंत, या देशातल्या हिंदुत्वाला एक राजकीय आशय आहे. तो ज्यांनी आणला, ते बिनचेहऱ्याचे लोक आजही आपले ध्येय समोर ठेवून कार्यरत आहेत. मात्र, ज्यांना त्याची फळे मिळाली, ती राजकीय मंडळी मात्र सर्वश्रुत आहेत.
लोकशाही स्वीकारलेल्या देशात असे असणे काही वावगे नाही. मात्र, त्यात नवीन भर पडत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. महाराष्ट्राच्या संदर्भात तर हा मुद्दा लगेचच लागू होणार आहे. इतरांना 'सुल्तानाची फौज' लावून संबोधणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख सध्या मुख्यमंत्री बनून धर्म आणि सत्ता यांची गफलत कशी केली, याची गणिते सोडविण्यात व्यस्त आहेत. अशा आक्रमक हिंदुत्वाची म्हणून जी जागा शिवसेनाप्रमुखांनी 'हिंदुहृदयसम्राट' होऊन व्यापली, ती आता रिक्त आहे. ही तेजस्वी पोकळी भाजपने भरावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, 'एक से भले दो' या उक्तीनुसार राज ठाकरेसुद्धा जर का तिचे भागीदार होत असतील, तर त्याचे काय वावगे? परवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेबाबत जो गौप्यस्फोट केला, त्यावर विश्वास ठेवला तर यापुढे हिंदुत्वाच्याच अजेंड्यावर सोबत येणारा पक्ष सहयोगी म्हणून सोबत घेण्याच्या निर्णयावर पोहोचावे लागेल. राजकारणात भावना चालत नाहीत. तिथे अपेक्षा असतात आणि अपरिहार्यता. शिवसेनेने हिंदूंच्या अपेक्षा आणि भाजपच्या अपरिहार्यता यांचा पुरेपूर फायदा घेतला. सध्या जो राजकीय संकर महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यातून जो काही प्राणी जन्माला येणार आहे, त्याची फळे शिवसेनेला भोगावीच लागणार आहेत.
शेवटी मुद्दा उरतो तो राज ठाकरेंचा. त्यांनी आपल्या भाषणात जे मुद्दे उपस्थित केले, ते मुद्दे त्यांनी खरोखरच लावून धरले होते. मात्र, ज्या भाडोत्री विचारवंतांच्या आधारावर त्यांनी सुरुवातीला आपल्या पक्षाची वाटचाल केली व केवळ मराठीच्या मुद्द्याच्या आधारावर पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला, त्याचे परिणाम त्यांना पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचा पक्ष एकखांबी होता व यापुढेही तो तसाच राहील. मात्र, यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांना दैवत मानून राज ठाकरेंनी आपला प्रवास सुरू केला होता, त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही असेच मध्यंतर आले होते. मराठीचा मुद्दा चालेनासा झाला होता आणि शिवसेनेची वाढ एका टप्प्याच्या पुढे होत नव्हती. त्याचवेळी बाळासाहेबांनी हिंदुत्वाची वाट धरली. आपल्या स्वभावानुसार त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची अभिव्यक्ती स्वीकारली. राज ठाकरेही आज तशाच वळणावर येऊन उभे आहेत. ते जे काही करतील, त्याला बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासाचेच प्रतिबिंब म्हणावे लागेल. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, या देशात हिंदुत्वाचे वातावरण आहे आणि त्याचा त्रास होणारे मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत.
हा भेद देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकापासून सुरू झालेला नाही. मुसलमानांना असुरक्षित ठेवून ज्यांना आपल्या पोळ्या भाजत राहायच्या आहेत, त्यांनी सुरू केलेला हा खेळ आहे. रस्त्यावर उतरलेल्या कुठल्याही मुसलमानाला आपण या कायद्याविषयी विचारले तर तो काहीच सांगू शकत नाही. 'तुम्हाला या देशातून हकलून देणार,' अशी कंडी त्यांच्यात पिकविण्यात आली आहे. आता तर या सगळ्याचा स्तर गलिच्छपणाकडे झुकला आहे आणि त्याचे लहान लहान व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येऊन थडकत आहेत. राज ठाकरे या सगळ्याचा कसा लाभ घेतात, ते येणारा काळच ठरवेल. कारण, त्यांच्याकडून अफाट अपेक्षा ठेवलेल्या त्यांच्या अनुयायांच्या पदरातही काही काळ अपेक्षाभंग पडला आहे. मात्र, राजकारणात काहीही घडू शकते. त्यांचा मोर्चा जोरदार असेल यात शंका नाही, मात्र या मोर्चाचे प्रदीर्घ राजकारणात ते रूपांतर करू शकतात का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल.