खवले मांजर तस्करीचे कोकण कनेक्शन ; पंधरा दिवसांत चार खवले मांजर ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


 
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्येच कोकणपट्ट्यामधून चार खवले मांजरांच्या तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत. यामधील तीन प्रकरणे नवी मुंबईतून आणि एक प्रकरण सावंतवाडीमधून उघड झाले आहे. खवले मांजर या प्राण्याची जगामध्ये सर्वात जास्त तस्करी होते. त्यामुळे या प्राण्याच्या तस्करीचे कोकण कनेक्शन पुन्हा एकदा उजेडात येणे चिंतेची बाब असल्याचे मत कोकणातील वन्यजीव संशोधकांनी मांडले आहे.

 

tiger_1  H x W: 
 

जगामध्ये खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आहेत. त्यामध्ये भारतीय उपखंडात चायनीज आणि भारतीय खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. या प्राण्याच्या अंगावरील खवल्यांना वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यामध्ये भारतीय खवले मांजराचा अधिवास आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोकणातून सातत्याने या प्राण्याच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये चार खवले मांजराच्या तस्करीची गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणांमधून अटक केलेल्या अठरा आरोपींनी कोकणामधून या चारही प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून पकडले आहे.

 
 

नवी मुंबईतील खांदेश्वर पोलिसांना ७ जानेवारी रोजी आसूडगाव येथून एका इसमाकडून खवले मांजर ताब्यात घेतले. आरोपी कल्पेश गणपत जाधवकडे ३० लीटर मापाच्या रिकामी प्लास्टिकच्या ड्रममध्ये साडेसात किलो वजनाचे खवले मांजर आढळले. आरोपी जाधव हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचा रहिवाशी आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेतून खवल्या मांजराच्या तस्करीचा आणखी एक प्रकार नवी मुंबई-कळंबोली पोलिसांनी १४ जानेवारी रोजी उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी सातजणांच्या मुसक्या आवळल्या. रमेश दाते (३८), सुनील दाते (४२), मुकेश मोहिते (३२), उमेश पवार (३२, सर्व रा. पुणे), पांडुरंग चव्हाण (३५) व विजय मोरे (३५, दोघेही रत्नागिरी), भगवान माने (२२, रा. महाबळेश्वर) या आरोपींकडून साडेसात किलो वजनाचे खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपींनी कातकरी समाजाकडून खवले मांजर पुरवले गेल्याची माहिती पोलिसांना दिली.

 

tiger_1  H x W: 
 

सावंतवाडी वनविभाग आणि गु्न्हे अन्वेषण विभागाने १४ जानेवारी रोजी वेंगुर्ले-बेळगाव महामार्गावरून सात जणांना खवले मांजरासह ताब्यात घेतले. सावंतवाडी तालु्क्यातील आंबेगावच्या जंगलातून या खवले मांजराला पकडून हे आरोपी त्याला कोल्हापूर येथे विकण्यास घेऊन जात होते, तर नवी मुंबई पोलिसांनी १५ जानेवारी रोजी ठाणे वनविभाग आणि 'रॉ' या प्राणीप्रेमी संस्थेच्या मदतीने वाशी सेक्टर १७ मधून तीन जणांना खवले मांजरासह अटक केली. आरोपी कृष्णा चौगुले (३०), नाना वाघमारे (३९) आणि मंगेश वाघमारे (२५) यांनी रोह्यामध्ये या प्राण्याला पकडल्याचे सांगितले. या खवले मांजराची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती 'रॉ' चे प्रमुख आणि ठाण्याचे वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.

 
 

चिंतेचा विषय

चिपळूणची 'सह्याद्री निसर्ग मित्र' ही संस्था २०१६ पासून कोकणात खवले मांजरावर अभ्यास करत आहे. याअंतर्गत ते खवले मांजराच्या बिळांचा मागोवा घेऊन त्याभोवती कॅमेरा ट्रॅप बसवतात. त्याव्दारे या प्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. ज्येष्ठ वन्यजीव संशोधक आणि या संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांच्या मते, पंधरा दिवसांत चार खवले मांजराची तस्करी उघड होणे आणि त्यांचा संबंध कोकणाशी असणे, ही चिंतेची बाब आहे. कोकणातील गावांमध्ये सुरू असलेल्या सर्वेक्षणामधून खवले मांजरांचे बीळ शिकारीच्या अनुषंगाने खणल्याची बाब आमच्या निदर्शनास येत आहे. यासंदर्भात वनविभागाने अशा गावांना भेट देऊन प्राथमिक स्वरूपात पंचनामे केल्यास लोकांवर वचक बसेल. तसेच तस्करीच्या माध्यमामधून पकडण्यात आलेल्या खवले मांजराच्या गुणसूत्रांची (डीएनए) चाचणी केल्यास त्याचे मूळ शोधण्यास मदत होईल, असे काटदरे यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, खवले मांजरांची विक्री किंमत न छापण्याचे आवाहन काटदरे यांनी माध्यमांना केले आहे.

 
 शिकारीसाठी खोदण्यात आलेले खवले मांजराचे बीळ

tiger_1  H x W:







@@AUTHORINFO_V1@@