मुंबई : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावाने पुस्तिका छापून-प्रसारित करुन अपप्रचाराचा उद्योग सध्या व्हॉट्सअॅप, ई-मेलसह विविध समाजमाध्यमांतून सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘नया भारतीय संविधान’ या नावाने हिंदी भाषेतील ही पुस्तिका असून डॉ. मोहनजी भागवत यांनी ती लिहिल्याचे खोटारडेपणाने सांगितले जात आहे. सध्याचे भारतीय संविधान बदलून केवळ उच्चवर्णीयांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणारे नवे संविधान लागू करण्याची योजना असल्याची माहिती या पुस्तिकेच्या माध्यमातून प्रचारित केली जात आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्गांवर अन्याय करण्यासाठी नवे संविधान वापरले जाईल, अशा आशयाचे संदेशही या पुस्तिकेच्या आधारावरुन पसरवले जात आहेत.
सदर पुस्तिकेच्या शेवटी नागरिकांना नव्या संविधानाविषयी आपल्या सूचना वा सल्ला पाठवावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली येथे दि.१५ मार्च २०२० पर्यंत सूचना स्विकारल्या जातील, असे त्यात म्हटलेले आहे. तचेस त्याची एक प्रत रा. स्व. संघ कार्यालय, नागपूर, महाराष्ट्र येथे पाठवावी लागेल, असेही लिहिले आहे. इतकेच नव्हे तर उत्कृष्ट सूचनांना १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, सदर पुस्तिका कोणी छापली, त्या प्रकाशन-प्रकाशकाचे नाव, पत्ता, आवृत्ती वा अन्य कुठलीही माहिती कोणत्याही पानावर दिलेली नाही. मात्र, कायदेशीररित्या कोणतेही पुस्तक छापले जात असेल तर त्यात प्रकाशन-प्रकाशकाचे नाव, आयएसबीएन वा नोंदणीक्रमांक असणे गरजेचे आहे. या पुस्तिकेवर मात्र तशी कोणतीही माहिती नसल्याने केवळ बुद्धीभेद करण्यासाठी व विशिष्ट समाजाला भडकवण्यासाठीच ही पुस्तिका प्रसारित करण्यात येत असल्याचे जाणवते.