पाकिस्तानचा 'कबुल'नामा; 'अलकायदा'चे प्रशिक्षण पाकिस्तानातच

24 Sep 2019 14:43:58



नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादाविरुद्ध आणखी एक खुलासा केला आहे. 'अल कायदा'सारख्या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानातच प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी कबुली त्यांनी दिली आहे. अमेरिकन थिंक टॅंक 'काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स'मध्ये (सीएफआर) बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

 

११ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या हल्ल्यापूर्वी 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि 'आयएसआय'ने प्रशिक्षण दिले होते. मात्र वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटनांबाबतचे धोरण बदलले. परंतु पाकिस्तानी लष्कराने त्यांची भूमिका बदलली नाही, असे इम्रान खान यांनी सांगितले. तसेच ओसामा बिन लादेनला ऐबटाबादमध्ये अमेरिकेकडून मारण्यात आले. या घटनेची चौकशीही आम्ही केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

'अल कायदा' आणि त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनबाबत पाकिस्तानने गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा कबुलीजबाब दिला आहे. यापूर्वी इम्रान यांनी लादेन पाकिस्तानात असल्याचे कबूल केले होते. याबाबत पाकमधील गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'ने 'सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी'ला माहिती दिली होती.

Powered By Sangraha 9.0