सरीसृप जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या क्रमांकावर

20 Sep 2019 18:18:30


 

 जैवविविधता सक्षम असूनही संशोधन दुर्लक्षित


मुंबई (अक्षय मांडवकर) - 'द रेपटाईल डाटाबेस' यांच्या हवाल्यानुसार सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर आहे. भारतात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ एवढी आहे. १,०७८ संख्येसह आॅस्ट्रेलिया पहिल्या क्रमाकांवर आहे. भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने पहिल्या पाच देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असला, तरी सरपटणाऱ्या जीवांबाबत अपुऱ्या संशोधनामुळे देशाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये उभयसृपशास्त्र संशोधनात रस असणारी तरुण संशोधकांची फळी तयार झाल्याने ही संख्या वाढणार असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

 

 
 

गेल्या दशकभरात भारतात उभयसृपशास्त्र संशोधनाला चालना मिळाली आहे. मात्र, या संशोधकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. 'द रेपटाईल डाटाबेस' या संकेतस्थळावर जगभरात अस्तिवात असलेल्या आणि नव्याने शोध लावलेल्या सरपटणाऱ्या जीवांची नोंद केली जाते. त्यांच्या हवाल्यानुसार सरीसृपांच्या संख्येच्या दृष्टीने भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. या यादीत आॅस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ मेस्किको, ब्राझिल व इंडोनेशिया या देशांचा क्रमांक लागतो. या देशांमध्ये सरपटणाऱ्या जीवांची संख्या अनुक्रमे १,०७८ ( आॅस्ट्रेलिया), ९५७ (मेस्किको), ८१४ (ब्राझिल) व ७५५ (इंडोनेशिया) आहे. भारतात ही संख्या ६८९ आहे. यांमध्ये मगर, पाल, सरडे, साप आणि कासवांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास या पाच देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. इंडोनेशिया (१,९०४,५६९ चौ.किमी) व मेस्किको (१,९७२,५५० चौ.किमी) देशापेक्षा भारताचे भौगोलिक क्षेत्र (३,२८७,२६३ चौ.किमी) दुप्पट आहे. असे असले तरी या दोन्ही देशात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या भारतापेक्षा अधिक आहे. कारण, गेल्या कित्येक वर्षांत देशात सरीसृप संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्याने ही संख्या वाढू शकली नाही.

 

 
 

मात्र, सरपटणाऱ्या जीवांच्या संख्येत येत्या काही वर्षात भर पडून भारत प्रथम क्रमांकावर येण्याची शक्यता ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना वर्तवली. देशाचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून जैवविविधता उत्तम आहे. मात्र, उभयसृपशास्त्राविषयी काम करणारी फार मोजकचे संशोधक असून त्यामधील तरुण संशोधकांनी गेल्या काही वर्षांत जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताचे उभयसृपशास्त्राचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे गिरी यांनी सांगितले. याचा पुरावा म्हणजे या तरुण संशोधकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये कासव व सापाची प्रत्येकी एक आणि पालीच्या आठ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. उभयसृपांच्या प्रजातीचे ५० ते ६० टक्केच वर्गीकरणाचे काम झाल्याने अजूनही या गटात नव्या प्रजातींचा उलगडा होत आहे. आजही केवळ बाहेरील निरीक्षणाच्या आधारावर सरीसृपवर्गातील प्रजाती नव्याने दिसत असल्याने येत्या कालावधीत नक्कीच भारताच्या सरपटणाऱ्या जीवांच्या संख्येत भर पडेल, असे तरुण उभयसृपशास्त्रज्ञ अक्षय खांडेकर यांनी सांगितले.

 
Powered By Sangraha 9.0