पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार

11 Sep 2019 13:52:16



मुझफ्फराबाद
: पाकव्याप्त कश्मीरमध्ये शनिवारी स्थनिक लोकांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराच्या निषेधार्ध रस्त्यावर उतरत आंदोलन केले. परंतु शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने या नागरिकांवर गोळीबार करत लाठीचार्ज केला. पाकिस्तानी सैन्य आणि निदर्शनकर्ते यांच्यात हाणामारीनंतर अनेक निदर्शक गंभीररित्या जखमी झाले आहेत. स्वातंत्र्याची मागणी करत असणाऱ्या या आंदोलनकर्त्यांपैकी २२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.


पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असणाऱ्या मुझफ्फराबादपासून ८० किलोमीटर अंतरावर तात्रिंनोट या गावातील नागरिकांनी स्वातंत्र्याची मागणी करत निदर्शने केली. यानंतर त्या भागातील फोन व इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस ताहीर कुरेशी सांगतात
, "शनिवारी सुरू झालेले हे आंदोलन सोमवारीही सुरूच आहे, म्हणून आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला."


पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याच्या वाढत्या उपस्थितीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून लष्कराविरोधात व पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत आहेत.
'पाकिस्तानी फौजांनो काश्मीर खाली करा', 'ही भूमी आमची आहे ,आम्ही यासाठी लढा उभारू' अशा घोषणा करत निदर्शनकर्ते पाकिस्तानी सैन्यावर राग व्यक्त करत आहेत.


मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजकिया म्हणाले
, "पाकिस्तानने लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे. एलओसीच्या दहा किमीच्या परिघात मोहरमच्या नावावर इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा बंद करण्यात आली आहे."

Powered By Sangraha 9.0