नवी मुंबई : ‘आयुषमान भारत योजना’ हे नाव आयुषमान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या संकल्पनेतून मिळाले असल्याची माहिती वर्ल्ड आयुष एक्सोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव यादव यांनी दिली. नवी मुंबईत सुरू असलेल्या वर्ल्ड आयुष एक्सो २०१९ व आरोग्य या संमेलनादरम्यान ते बोलत होते. देशातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि सुदृढ राहवा आणि आयुर्वेदातील सर्व पॅथींना एकत्रित आणण्याच्या हेतूने सुरू आयुष मंत्रालयाची स्थापना झाली. या अंतर्गत मोदी सरकारची महत्वकांशी योजना असलेल्या आयुषमान भारतची घोषणा करण्यात आली. या महत्वकांशी योजनेचे नाव केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या संकल्पनेतून देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या वर्ल्ड आयुष एक्स्पोनिमित्त सुरू आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाला आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, निसर्गोपचार, सिद्ध (आयुष) या सर्व पॅथींना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम संमेलनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आयुर्वेदीक औषधोपचार आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी योग शिबिर, मान्यवरांतर्फे परिसंवाद, आरोग्य चिकित्सा शिबिर, औषधी वनस्पतींचे प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी भरगोस प्रतिसाद दिला. सिडको एग्झिबिशन सेंटरमधील सर्व सभागृहांमध्ये विविध पॅथींमधील त़ज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.