'ज्यांनी आयुष्यात निवडणूक लढली नाही त्यांनी 'ईव्हीएम'बद्दल बोलू नये'

02 Aug 2019 15:28:21


 


'ईव्हीएम'वरून रान उठवणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीस शेलारांचा टोला

 
 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेपूर्वी 'ईव्हीएम'चा मुद्दा घेऊन आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर भाष्य करु नये,” अशा शब्दांत शेलार यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे. राज्यातल आगामी विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा (ईव्हीएम) वापर करण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी हे विधान केले आहे.

 

जे ईव्हीएमद्वारे निवडून आले त्यांनी आधी राजीनामा द्यावा

ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधीपक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद आम्ही पाहिली आहे. यावर माझी प्राथमिक प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, पत्रकार परिषद घेण्याआधी जे या ईव्हीएमद्वारेच निवडून आले आहेत त्याविरोधी पक्षातल्या बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी आधी राजीनामे द्या. तसेच ज्यांनी आयुष्यात निवडणूक लढवलीच नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलूच नये,” असा टोला लगावत खरपूस समाचार त्यांनी घेतला.

 

विरोधकांना जनाधारच नाही

विरोधकांकडे जनाधार राहिला नाही, लोकांनी त्यांना नाकारले आहे. त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. ते ईव्हीएमवर टीका करीत आहेत. आधी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. भाजपा आणि शिवसेनेविरोधात एकत्र येऊन ते तोंडावर पडले आहेत. आपल्या निवडणूक आयोग नावाच्या संविधानिक यंत्रणेचे जगात कौतूक होत असताना त्यावर हे अविश्वास निर्माण करीत आहेत,” अशा शब्दांत शेलार यांनी विरोधकांना झापले.

 

ईव्हीएमचा मुद्दा करण्यापेक्षा जनतेत मिसळा सहानुभूती मिळेल : फडणवीसांचा टोला

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज यांना त्यांच्याच शैलीत चिमटा काढला आहे. ईव्हीएमचा मुद्दा करण्याऐवजी जनतेत मिसळा, त्यांची कामे करा, यावेळी आम्ही कामे करू शकलो नाही. भविष्यात आम्ही ही कामे करू, असे सांगा किमान सहानुभूती तरी मिळेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि विरोधकांना काढला आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त वर्ध्यात ते बोलत होते.

 
Powered By Sangraha 9.0