काश्मिरात ईद उत्साहात साजरी;अजित डोवल यांची हवाई पाहणी

12 Aug 2019 19:03:47

 
 
नवी दिल्ली : संचारबंदी उठवल्यावर पहिल्यांदाच काश्मीरवासियांनी उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात ईद साजरी केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी काश्मीर खोऱ्यात हवाई पाहणीद्वारे काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. हवाई पाहणी नंतर डोवल श्रीनगरच्या गल्लोगल्लीत तसेच काश्मीरच्या संवेदनशील परिसरात फिरले आणि स्थानिकांशी चर्चाही केली.
 
 

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी उठविल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी आज काश्मीर पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी अचानक लाल चौक, पुलवामा आमि बेलगाममध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या या भागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सौरा, पंपोर आणि हजरतबल या परिसरातही पाहणी केली. सौरामध्ये नेहमीच भारताविरोधात निदर्शने व्हायची, त्या परिसराची पाहणी करून डोवल यांनी नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी अवंतीपुरा जिल्ह्यालाही भेट दिली. यावेळी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बकऱ्यांची विक्री करणाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.

 
 

आज श्रीनगरमध्ये बकरी ईद शांततेत पार पडली. सुमारे ६२ हजार लोकांनी येथील वेगवेगळ्या मशिंदींमध्ये नमाज पठन केले. ईद निमित्त अनंतनाग, बारामूला, बडगाम आणि बांदीपूर येथील नागरिकांनी मिठाईंचे वाटप केले. पोलीस प्रमुख दिलबाग सिंग आणि आर्मीच्या कमांडर्सनीही काश्मीर खोऱ्याच्या विविध भागात जाऊन पाहणी केली. सर्वत्र ईदचा उत्साह असून आज जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. काश्मीरमध्ये शांतता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0