मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका

04 Jul 2019 17:47:04


 


पावसाच्या तडाख्यामुळे वन्यजीव जखमी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेले तीन दिवस मुंबई आणि आसपासच्या शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका वन्यजीवांनाही बसला आहे. 'राॅ' या प्राणिप्रेमी संस्थेने तीन दिवसांमध्ये मुंबई, ठाणे व नवी मुंबई भागातून ४० हून अधिक वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षित असलेल्या भारतीय अजगर, कोल्हा, रोहित (फ्लेमिंगो) आणि सापांच्या विविध प्रजातींचा समावेश आहे. या सर्व प्राण्यांवर उपचार सुरु असून उपचाराअंती त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात येणार आहे.

 
 

 
 
 

सोमवार-मंगळवारी बरसलेल्या मुसळधार पावसाचा त्रास मुंबईकरांप्रमाणे मु्क्या वन्यजीवांनाही सहन करावा लागला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये प्राणिप्रेमी संस्थांनी शहराच्या विविध भागांमधून जखमी अवस्थेतील वन्यजीवांना ताब्यात घेतले आहे. जोरदार पावसाचा तडाखा पक्ष्यांना अधिक बसतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या संख्येने जखमी पक्षी आढळून येतात. तसेच सापांसारखे सरपटणारे जीव देखील हरितक्षेत्राजवळील नागरी वस्त्यांमध्ये आसऱ्याला येतात. या जीवांमुळे नागरिकांना उद्भवणारा धोका लक्षात घेता, प्राणिप्रेमी संस्थांकडून या प्राण्यांना ताब्यात घेतले जाते. शहरातील 'राॅ' प्राणिप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या तीन दिवसात ४० हून अधिक वन्यप्राण्यांना जीवदान दिले आहे. खास करुन 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ला लागून असलेल्या पवई, मुलुंड आणि कांजुरमार्ग या विभांगामधून मोठ्या संख्येने जखमी जीवांना बचावण्यात आल्याची माहिती 'राॅ'चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.

 
 
 
 

 

'राॅ'च्या कार्यकर्त्यांनी पावसामुळे जखमी झालेल्या घार (७), फ्लेमिंगो(२), घुबड (१), गायबगळा (१), मैना (१) आणि रंगीत करकोचा (१) या पक्ष्यांना उपचाराकरिता ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईत स्थलांतर केलेल्या दोन फ्लेमिंगो पक्ष्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यांना अंधेरी आणि जुहू येथील पाणथळ क्षेत्रामधून वाचविल्याचे शर्मा यांनी सांगितले. बुधवारी नवी मुंबईतील एका नागरी वस्तीत मुसळधार पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एक कोल्हा आसऱ्याला आला होता. या कोल्ह्याला वाचवून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका केल्याची माहिती शर्मा यांनी दिली. नवी मुंबईतील कांदळवन क्षेत्रामध्ये कोल्ह्याचे वास्तव्य आहे. त्यामुळे वरचेवर त्यांचे दर्शन येथील नागरी वसाहतीत होत असते. याशिवाय गेल्या तीन दिवसांमध्ये साप आणि अजगरासारख्या सरपटणाऱ्या जीवही आढळून आले आहेत. यामध्ये भारतीय क्रोबा (२), किलबॅक (३), रॅट स्नेक (२), रस्सल वायपर (१), किलबॅक वाॅटर स्नेक (२) या सापांचा समावेश आहे. या सर्व प्राण्यांवर ठाण्यातील 'एसपीसीए' आणि पशुवैद्यक डाॅ. रिना देव यांच्या दवाखान्यात उपाचार सुरु असल्याचे शर्मा म्हणाले.
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
Powered By Sangraha 9.0