महाराष्ट्रात ३१२ वाघांचे वास्तव्य ; चार वर्षात व्याघ्र संख्येत ६४ टक्क्यांची वाढ

29 Jul 2019 10:43:42


 


राज्य शासनाच्या व्याघ्र संवर्धन मोहिमेचे फलित


मुंबई (अक्षय मांडवकर ) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय व्याघ्र गणनेचे चौथे (२०१८) अंदाजपत्र सोमवारी सकाळी जाहीर केले. त्यानुसार देशात २९६७ वाघांचा अधिवास आहे. या अहवालानुसार व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने मुसंडी मारली असून राज्यात  ३१२ वाघांचा आश्रय असल्याचे समोर आले आहे. २०१४ साली राज्यात  वाघांची संख्या १९० होती. जी आता ६४ टक्क्यांनी वाढली आहे. वन विभागाच्या व्याघ्र संवर्धन मोहिमेचे हे फलित आहे. 

 
 

 


भारतात वाघांचे आश्रयस्थान टिकवून ठेवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेरीस यश मिळाले आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय व्याघ्र गणनेचे अंदाजपत्र पंतप्रधानांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. त्यानुसार गेल्या चार वर्षात देशामधील वाघांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या चार वर्षांमध्ये काही वाघ संशयास्पद गायब किंवा मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे वाघांच्या अधिवासाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अहवालानुसार महाराष्ट्रात ३१२ वाघ नांदत असल्याचे उघड झाले आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ नांदत होते. म्हणजेच त्यामध्ये चार वर्षांनी १२२ वाघांची भर पडली आहे. राज्य वन विभागाच्या वतीने व्याघ्र संवर्धनासाठी निरनिराळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 'इ-सर्वेलन्स'च्या माध्यमातून वाघांवर नजर ठेवण्याचा विचारही वन विभाग करत आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर मध्यप्रदेश (५२६) असून त्यानंतर कर्नाटक (५२४) आणि उत्तराखंड  (४४२) राज्याचा क्रमांक लागत आहे. 

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0