दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |
 

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील लेखक, विचारवंत आणि महत्वाचे नेते तसेच दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक राजा ढाले यांचे मंगळवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आंबेडकरी चळवळीसाठी झटणारा नेता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. नामदेव ढसाळ, कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने त्यांनी दलित पॅंथर चळवळीची स्थापना केली. त्यापूर्वी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाच्या प्रमुखपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला होता.

 

राजा ढाले यांच्या जाण्यामुळे आंबेडकरी चळवळ, बौद्ध साहित्यविश्वाचे मोठे नुकसान झाल्याची भावना साहित्यक्षेत्र आणि चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईत विक्रोळीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला विक्रोळी येथील निवासस्थानातून सुरुवात होईल व दादर चैत्यभूमी येथील स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर १९९९ मध्ये त्यांनी लोकसभा उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला.

 

केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. आंबेडकरी जनतेवर त्यांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पॅंथरचा महानायक हरपला, अशी शोकभावना त्यांनी व्यक्त केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@