संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्करराव मुंडले यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |


 


ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्करराव मुंडले यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ठाणे येथील त्यांच्या मुलीच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भास्करराव मुंडले यांनी देहदान करण्याचे संकल्पपत्र भरले असल्याने त्यांचे पार्थिव कळवा येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.

 

भास्करराव मुंडले यांचे संपूर्ण नाव भास्कर हरी मुंडले असे होते. ते बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. मुंबई महानगर सहकार्यवाहपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. मुंबई महापालिकेच्या जल व्यवस्थापन कक्षामध्ये ते अधिकारी होते. महापालिकेतील काम संपले की संघकार्यासाठी ते आपला सर्व वेळ देत असत. अत्यंत मृदूभाषी असलेले भास्करराव त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडली जावी, यासाठी आग्रही असत. मुंबई महानगरामध्ये संघकार्याचा विस्तार करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. विश्व हिंदू परिषदेशी संबंधित विविध न्यासांचे काम त्यांनी पाहिले होते.

 

विश्व हिंदू परिषदेने शीव येथील हनुमान टेकडीवर जे शिवकल्याण केंद्र उभारले आहे त्या केंद्राची उभारणी करण्यामध्ये भास्करराव मुंडले यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना ‘मिसा’खाली अटक करुन पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुन्हा संघकार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर विहिंपच्या नेतृत्वाखाली झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

 

अलीकडील काही वर्षे आजारी असल्याने त्यांना दैनंदिन संघशाखेमध्ये जाणे जमत नसे, मात्र आठवड्यातून एकदा ते आग्रहाने शाखेवर जात असत. विविध संघकार्यकर्त्यांशी आणि संघपरिवारातील माता-भगिनींशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांची ख्यालीखुशाली ते जाणून घेत असत. दिवसभरात नित्यनियमाने अनेक संघकार्यकर्त्यांशी ते आत्मियतेने संवाद साधत असत. आपल्या या हातोटीने त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांना संघकार्यास प्रवृत्त केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@