मुंबईत इमारत कोसळून १२ ठार : ५०जण अडकल्याची भिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |


 


मुंबई : दक्षिण मुंबईतील डोंगरी येथे तांडेल स्ट्रीट या भागात केसरबाई इमारत कोसळून मोठी जिवितहानी झाली आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत १२ जण ठार झाले आहेत. या दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली ४० ते ५० रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.



 

 

डोंगरी भागातील तांडेल स्ट्रीटवरील अब्दूल हमीद दर्गा येथील केसरबाई ही चार मजली इमारत सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी कोसळली. संपूर्ण चार मजली इमारत कोसळल्याने १२ जण ठार झाले आहेत. इमारतीखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे. या घटनेनंतर या भागात मोठी खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे.


 

 

मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू करण्यात आलं असून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अत्यंत चिंचोळ्या भागात ही इमारत असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, ही इमारत म्हाडाची असून ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं. या दुर्घटनेनंतर महापालिकेने या इमारतीच्या आजूबाजूच्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम सुरू केले आहे. या भागातील बंदोबस्तही मजबूत करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दिलेल्या प्रतिक्रीयेत ही इमारत शंभर वर्षे जुनी असून तिचा  धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नसल्याचे म्हटले आहे. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता. तसेच विकासकाने काम वेळत केले की नाही याची चौकशी केली जाईल. सद्यस्थितीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहीती त्यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@