बन्ने गुरुजींची शाळा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |



हू, काय रे? बोल की, कुणाच्या वर्गात जाणार? कोण आवडलं तुला?” माझे बाबा आणि २१ नं. शाळेचे हेडमास्तर दोघेही एकामागून एक माझ्याकडे पाहात थोड्याफार समजावणीच्या सुरात मला विचारत होते. माझ्यासमोर दोन व्यक्ती होत्या. त्यातली एक धुरकट केसांची कदाचित मेंदी लावत असावी, घार्‍या आणि भेदक बोक्यासारख्या डोळ्यांची, चेहर्‍यावर धूसर देवीचे व्रण, बळकट बांधा आणि माझ्याकडे अविचल रोखलेली नजर, अशी. मीच नजर चोरली. दुसरी व्यक्ती किरकोळ बांध्याची, गांधी टोपी, सदरा, पायजमा घातलेली, पायात धनगरी चामडी वहाणा, ठेंगणी आणि शांतपणे माझ्याकडे बघणारी. मी या व्यक्तीला मात्र नखशिखांत न्याहाळून घेतलं होतं. परत आवाज आला, “हं, हे निंबाळकर सर घारे डोळे आणि हे बन्ने गुरुजी गांधी टोपी, बोल.. बोल आता पटकन...

माझी निवड त्या वयाला अनुसरून अत्यंत नैसर्गिकच होती... बन्ने गुरुजी!!

जुलै-ऑगस्ट १९७७ चं वर्ष होतं, बाबांची नुकतीच इचलकरंजीला बदली झाली होती. चांगल्या शाळांमधले बरेचसे प्रवेश संपले होते. बाबांनी मला मग नगरपालिकेच्या २१ नं. शाळेत आणून उभं केलं होतं. आधीची शाळा आदर्श शिक्षण मंदिर’, किल्ला भाग, मिरज! तशा त्या अतिशय संस्कारित, सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित शाळेमधून डायरेक्ट शाळा नं २१.

मला मोठा धक्काच होता. इयत्ता दुसरी आणि तुकडी ’, ’आदर्श शिक्षणमध्ये मुली पण होत्या. इथं फक्त मुलंच. शाळेची इमारत वर्णन करण्यायोग्यच होती. शाळाम्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी आकृती आणि ही इमारत यांचा काडीचाही संबंध नव्हता. जुन्याकाळी दुकानांना फळकुटे असत, तसं आमच्या शाळेचं दार होतं. दार उघडल्यावर आत काहीच नाही. फक्त भिंतीलाच काळं केलेला फळा, आणि एक मोडक्या पायांची खुर्ची... थोडक्यात, ‘आदर्श शिक्षणच्या चकचकीत, छान छान, डेस्कबेंच-टेबलच्या इस्त्रीदार शाळेतून मी डायरेक्ट गोणपाटावर आलो होतो. शाळा रीतसर सुरू झालीच होती, मीच दोन महिने उशिरा शाळेत आलो होतो. पण, हळूहळू लक्षात येऊ लागलं की, त्याने फारसं काही बिघडणार नव्हतं. कारण, पटसंख्या ६० असूनही जेमतेम ८-१० पोरंच शाळेत हजर असायची. दररोज सकाळी ७.३० ला शाळा भरत असे. भरत म्हणजे वेळ ती होती, भरत ती नंतर कितीही वेळाने असे. म्हणजे मी शाळेत वेळेत हजर झाल्यावर पटसंख्या ८-१० असायची, ती नंतर हळूहळू 2-3 तासांनी शाळा संपेपर्यंत ४०-४५ वर जायची आणि ही गम्मत रोजचीच होती. आम्ही ८-१० जण शाळेत आल्यावर बन्ने गुरुजी प्रार्थना घेत असत. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा...मी सोडून बाकी सर्व पोरं माधवाच्या ऐवजी महादेवाम्हणायची. ते कधीच बन्ने गुरुजींना खटकलं नाही. नंतर गुरुजी हजेरी घेत असत. हजर असलो की जय हिंदम्हणायची पद्धत होती. मग बन्ने गुरुजी २-२ जणांचे गट पाडायचे आणि आम्ही जी पोरं शाळेत आलेली नाहीत, त्यांना आणायला बाहेर पडत असू. गुर्जी, मी आणायला जाऊ का संज्या गुरवाला? भासक्याला घेऊन जातू सोबत.” “गुर्जी, संत्या वडार झोपला हुता, आणू का वडून त्याला ?” असा गलका सुरू असायचा. मग बन्ने गुर्जी तू जा...तू जा...असं म्हणून सगळ्यांना पाठवून देत. क्षणार्धात असा भरलेला वर्ग रिकामा होऊन जात असे. मग आमचे विविध गट विविध दिशांना पांगून पोरं गोळा करत वस्त्यांमधून फिरत असत. कुणी झोपलेलं असे, कुणाच्या पोटात दुखत असे, कुणाला कसंतरीच होत असे... काय काय कारणं! काही काही ठिकाणी झोपलेली मंडळी उठून आंघोळ करून तयार होईपर्यंत आम्हाला चहा आणि शिळी पोळी यांचा नाश्ता मिळत असे. कधी कधी तेल-तिखट शिळा भातही मिळे. मग या गोळा केलेल्या पोरांच्या सामुदायिक वराती आई-बापांसकट शाळेकडे येत. आम्हाला दाद न देणारी काही कलाकार मंडळी होती, या मंडळींना त्यांच्या आया अक्षरश: फरफटत शाळेत आणत असत. ही कलाकार मंडळी रोड शोकरण्यात एकदम पटाईत होती. शाळेसमोरच्या चौकात आल्यावर त्यांच्यातील कलाकार एकदम जागा होई. मग रडारड, आदळ-आपट, शिवीगाळ, मारपीट, लोळालोळी होऊन शेवटी हातपाय झाडून ऋतुमानांनुसार खंडीभर धुरळा किंवा चिखल उडवूनच हे कलाकार वर्गात शिरत. हा रोज नित्यनेमाने होणारा रोड शोबघायला त्या भागातले सजग नागरिक आवर्जून हजर असत. मग या वराती आणि कलाकार मंडळी वर्गात स्थानापन्न झाल्यावर बन्ने गुरुजींचा वैयक्तिक मारपिटीचा तास सुरू होई. त्यांच्याकडे त्यांच्या एका अतिशय घनिष्ठ सुतार मित्राकडून तयार करून घेतलेली गुळगुळीत लाकडी छडी होती. तिला ते कडकलक्ष्मीम्हणत. तिचा प्रसाद मग या मंडळींना मिळे. रोजच हा प्रकार असल्याने कोडगेपणाहा अत्यंत महत्त्वाचा गुण या मंडळींत दिसून येई. त्यातूनच ती कडकलक्ष्मीपळविण्याचा प्रकार सारखाच घडे. परंतु, बन्ने गुरुजी डझनावारी छड्या बनवून घेत असावेत. नेहमी त्यांच्याकडे तासलेली छडी असायचीच.

एरवी बन्ने गुरुजी खूप प्रेमळ होते. भाषा, गणित, शास्त्र, इतिहास-नागरिकशास्त्र इत्यादी विषय ते जेव्हा केव्हा वेळ मिळेल, तेव्हा खरोखर मन लावून शिकवत. त्यावेळी मात्र त्यांच्यात सगळ्यांबाबत दयाबुद्धी कणव दाटून येई. मुलांना कळेपर्यंत ते न रागावता शिकवत. मी एकटाच कुलकर्णीअसल्याने असावे, पण माझ्याकडे पाहण्याचा सर्व वर्गाचा आणि बन्ने गुरुजींचा एक वेगळाच दृष्टिकोन होता. सगळेच जरा दबकून असत. सगळा वर्गच निम्न सामाजिक स्तरातला होता. बर्‍याच पोरांकडे जेमतेम एकच गणवेशाचा जोड होता. बर्‍याचदा फाटकाच... चप्पल नाहीच... पुढेपुढे मी पण चप्पल घालणे सोडून दिले. या पोरांची घरे पण यथातथाच. एकाचं घर तर पाईपमध्ये होतं. त्याला थेंब थेंब लघवीचा आजार होता. चड्डी नेहमी ओलीच असायची. बाकीची पोरं त्याला टुपुक टुपुकम्हणून चिडवायची. मला पहिल्यांदा किळस येत असे, नंतर मला त्याची दया येऊ लागली. अठरापगड जातींची, अत्यंत गरीब घरातली मुलं माझ्या वर्गात होती. त्यांचं खडतर आयुष्य मी तेव्हाच जवळून पाहिलं. बन्ने गुरुजींना या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. त्यांचे वर्गावर खूप प्रेम होते. या अशा वर्गात पहिलं यायला मला काय कष्ट पडणार? पण, त्यामुळे माझ्यावर गुरुजींचा विशेष जीव होता. प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली की, खुश होऊन लाडातच येत असत आणि मग जवळ घेऊन चावा घेत. तेव्हा त्यांच्या मिशरीने घासलेल्या दातांचा वास येई आणि दाढी टोचे. भली गम्मत होती. रागावले की मात्र पोराला खुर्चीत बसून दोन पायांमध्ये पकडत आणि ढोल-ताशे बडवल्यासारखे बडवत. त्यांच्या बडवण्यामुळे भर वर्गात दोन तीनदा पोरांची पचनसंस्था मोकळीहोण्याचा प्रसंगही घडला होता.

आमच्या वर्गाला वायुविजननावाचा काही प्रकारच नव्हता. फक्त दार. खिडकी नाही. त्यामुळे दार उघडे ठेवावेच लागे. मग नैसर्गिकपणे एखाददुसरं पोर परस्पर वर्गातून पळून जाई. मग जातूय कुटं.. उद्या यीलच की, उद्याच धुतो त्याला,” अशी बन्ने गुरुजींची प्रतिक्रिया असे. दुसरी-तिसरीतच माझ्यावर असे धुवाधुवीचे संस्कार झाले. हा बन्ने गुरुजींचा संस्कार वर्ग पुढे चौथीपर्यंत चालू होता. चौथीत असताना आमची पुणे-आळंदी-देहू सिंहगड अशी तीन दिवसांची सहल गेली होती. आताच्या शाळा दहावीपर्यंत पुण्यातल्या पुण्यातच सहली काढतात. बन्ने गुरुजींवर विश्वास टाकून निर्धास्तपणे पोरांना सहलीला पाठवणारी पालक मंडळीपण त्यावेळी होती. आतासारखी, प्रत्येक चौकात कुठपर्यंत आलाय,’ असं विचारणारी नव्हती. चौथीत असताना गुरुजींची मला शिष्यवृत्तीला बसविण्याची भयंकर इच्छा होती. त्यांची इच्छा मी काही फलद्रूप होऊ दिली नाही, त्याचा त्यांना खूप कमीपणा वाटे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला मी सुरूंग लावल्याचे त्यांना आवडले नाही. पण, मला कधी त्यांनी अंतर दिले नाही. अगदी डबा खाताना रोज ते मला सोबत बसवत असत. बाकीची पोरं पण असायचीच. बहुतेक वेळा त्यांच्या डब्यात शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा, भाकरी, गवारीची भाजी, कांदा असा मेन्यू असे. कपडे नेहमी स्वच्छच असत. सायकलीवर टांग टाकून हळूहळू शाळेत येत असत. त्या तीन वर्षांत त्यांनी मला खूप जीव लावला होता. घरी पण येऊन बाबांशी चर्चा करत.

पुढे मी हायस्कूलला गेलो. दहावी झाली. इचलकरंजीवरून सातारला बदली झाली. नंतर पुण्याला आलो, कृषी महाविद्यालयातून बाहेर पडलो. व्यवस्थापन शास्त्रात पदवी मिळवली. या पूर्ण कालावधीमध्ये जवळजवळ सोळा वर्षे गेली. बन्ने गुरुजी कुठे असतात, याचा काही तपास नव्हता. एकदा अचानक कार्यक्रमानिमित्त इचलकरंजीला माझे जाणे झाले. तेव्हा गुरुजींना भेटायची मला तीव्र इच्छा झाली. एका मित्राला त्यांना शोधून काढायला सांगितलं. त्यांना निरोपही दिला की, मी इचलकरंजीत आहे असा. मला बाहेर पडणं शक्य नव्हतं. पण, मी आल्याचं कळताच बन्ने गुरुजी त्या कार्यक्रमात मला भेटायला आले. त्यांनी मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता, ते आता माझ्या छातीला लागत होते. मीच पळत जाऊन माझी ओळख त्यांना सांगितली आणि खाली वाकून नमस्कार केला. बन्ने गुरुजींनी हरीऽऽऽश.....असा जोरात हंबरडाच फोडून घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून रडायला लागले.

त्या प्रेमळ मिठीचे वळअजूनही माझ्या अंगावर तसेच आहेत आणि त्या घळघळ ओघळणार्‍या अश्रूंचा कोमट स्पर्शदेखील तसाच अजूनही ताजाच आहे. ती आत्मीयता, तो जिव्हाळा, तो शिक्षा करण्याचा-मारण्याचा हक्क, हे त्यावेळच्या गुरुजींमध्ये असणारे अत्यावश्यक गुण आता पूर्णपणे हरवले आहेत, हे प्रकर्षाने जाणवतं आणि आत्ताची शालेय पिढी किती महत्त्वाच्या संस्कारांना मुकतेय, असं वाटत राहातं.

 

हरीश कुलकर्णी

९४२२७१७१८१

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@