व्यर्थ न हो बलिदान...

07 Jun 2019 19:08:35



लाखो लोकांपर्यंत जवानांच्या बलिदानाचा, त्यागाचा संदेश पोहोचविण्यात धोनी यशस्वी झालाय आणि तेही एकही शब्द न बोलता... आपल्या कृतीतून धोनीने देशातील प्रत्येकाच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलवलाय..


सबसे पहले मैं अल्ला ताला का शुक्र अदा करना चाहता हूँ... पाकिस्तान क्रिकेटची मॅच असली की कोणत्याही विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानच्या मुस्लीम क्रिकेटर्सच्या उत्तराची सुरुवात ही अशी असते... खेळातही धर्माच्या प्रदर्शनाचा हा अट्टाहास का?, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कधी पडला नाही पण, याच आयसीसीने नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) धोनीच्या ग्लोव्हजवरील पॅरा मिलिटरीचं बोधचिन्ह हटविण्याची विनंती केलीय. खरंतर वर्ल्डकपमध्ये सहभागी टीम आणि खेळाडूंसाठी आयसीसीने कठोर नियमावली जारी केलेली असते. खेळाडूंची वेशभूषा आणि इतर क्रीडा साहित्य यावर लोगो छापण्याचेही काटेकोर नियम आहेत. जर धोनीने या नियमांचे उल्लंघन केले असते तर त्याला थेट आयसीसी दंडही ठोठावू शकली असती आणि लोगो वापरण्यास मनाई करू शकली असती पण तसे न करता त्यांनी बीसीसीआयला विनंती केलीय की, तुम्ही धोनीला ग्लोव्हजवरील बोधचिन्ह हटविण्यास सांगावे. अर्थात केंद्रात राष्ट्रभक्तीने प्रेरित मोदी सरकार असल्यामुळे बीसीसीआयनेही ही विनंती धुडकावून लावली आहे. माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर ट्वीट करून धोनीला जाहीर पाठिंबा दिलाय.

 

मुख्य मुद्दा आहे ते म्हणजे, धोनीच्या ग्लोव्हजवरील बॅच नेमका आहे तरी कशाचा? धोनीला देशातील राखीव दलाच्या पॅरामिलिटरीचं मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. पॅरामिलिटरीचा तो थोडक्यात ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. या पॅरामिलिटरीचं जे बोधचिन्ह आहे, ते धोनीच्या ग्लोव्हजवर छापलं गेल्याने हा सारा वाद निर्माण झाला आहे. या बोधचिन्हात एक खंजीर आहे, ज्याच्या मुठीवर दोन पंख असून तळाशी त्यावर बलिदान हे शब्द कोरले गेले आहेत. पॅरामिलिटरीतील जवानाच्या वर्दीवरील उजव्या खिशावर हा बॅच नेमप्लेटच्या खाली लावला जातो. या बॅचचा मथितार्थ असा आहे की, ‘तुम्ही आपले जीवन देशाच्या रक्षणासाठी समर्पित करत आहात.’ देशाच्या जवानांच्या प्रति श्रद्धा दाखविण्यासाठी धोनीने या आधीही रांची येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये मिलिटरी कॅप संघास परिधान करण्यास दिली होती आणि तेही पूर्वपरवानगी काढून. आयसीसीच्या नियमानुसार क्रिकेटच्या मैदानावर धर्म, जात अथवा राजकीय भावनांना चिथावणी देणारं कृत्य अथवा प्रदर्शन करण्यास बंदी आहे. याआधी इंग्लंडच्या मोईन खानने क्रिकेट मॅच खेळताना ‘सेव्ह गाझा... सेव्ह पॅलेस्टाईन’ असा उल्लेख असलेले रिस्ट बँड वापरले होते. २०१४ साली भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये त्याने हे कृत्य केलं होतं. मोईन हा पाकिस्तानी वंशाचा असला तरी त्याच्याकडे आता इंग्लंडचे नागरिकत्व आहे. त्यावेळीही इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्यामागे भक्कमपणे उभे राहिले होते पण, अखेर आयसीसीने त्याला मनाई केली होती. त्यावेळचे मॅच रेफ्री डेव्हिड बू यांनी उर्वरित मॅचमध्ये त्याला तो रिस्ट बँड वापरण्यास परवानगी नाकारली होती.

 

धोनीच्या या लोगोमध्ये बलिदान हे शब्द नाहीत. त्यामुळे नियमानुसार ग्लोव्हजवर तो दोन लोगो वापरू शकतो. तांत्रिकदृष्ट्या त्याला रोखणं आयसीसीला अवघड जाईल. आयसीसी यावर काय निर्णय घेते, हे कळेलच पण यामुळे धोनीचा प्रामाणिक उद्देश साध्य झालाय. गेल्या एका दिवसात बलिदान बॅच म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने झुंबड उडाली आहे. लाखो लोकांपर्यंत जवानांच्या बलिदानाचा, त्यागाचा संदेश पोहोचविण्यात धोनी यशस्वी झालाय आणि तेही एकही शब्द न बोलता... आपल्या कृतीतून धोनीने देशातील प्रत्येकाच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलवलाय... जणू जवानांना आपल्या कृतीतून त्यांने संदेशच दिलाय... व्यर्थ न हो बलिदान... जय हिंद...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0