‘मोगरा फुलला’ ही तुमच्या-आमच्या आयुष्यातील सरळसाधी गोष्ट आहे - स्वप्नील जोशी

13 Jun 2019 13:14:36



मोगरा फुलला१४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

स्वप्नील जोशीचा चित्रपट म्हणूनही मोगरा फुललाबद्दल रसिकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले ट्रेलर, टीझर आणि पोस्टर्सना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्राबणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स) च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार निर्मित मराठी चित्रपट मोगरा फुलला१४ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे तसेच श्राबणी देवधर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी स्वप्नील जोशी सांगतो, ‘मोगरा फुललामधील माझ्या सुनील कुलकर्णी या व्यक्तिरेखेची आई साकारली आहे नीना कुळकर्णी यांनी. नीना कुळकर्णी आणि मी १४ वर्षानी पुन्हा एकत्र काम करतोय. या कौटुंबिक कथेतील आईला तिचे पती लवकर गेल्यावर आधार मिळतो तो तिच्या या धाकट्या मुलाचा. सुनीलची पत्नी आली तर त्यांच्यातील या प्रेमाचे वाटे होतील, अशी भीती तिला सतत वाटते. याच भीतीपोटी ती त्याला सांगून आलेल्या मुलींमध्ये दोष काढते आणि त्यांना नकार देते. पण सुनील आपल्या आईचे मन मोडायला धजावत नाही. ही तुमच्या-आमच्या आयुष्यातील सरळसाधी गोष्ट आहे.


या चित्रपटाची गाणी अभिषेक खणकारनी लिहिली असून रोहित राऊतने ती संगीतबद्ध केली आहेत. शंकर महादेवन, रोहित राऊत, बेला शेंडे, जसराज जोशी यांनी ती गायली आहेत. चित्रपटात स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, यांशिवाय सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नाळीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट निर्मिती आणि वितरणातील अग्रणी कंपनी पॅनोरमा स्टुडिओजने चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0