पश्चिम बंगालची लढाई अधिकच कडवी असेल - पूनम महाजन

14 May 2019 14:43:58

 प्रियांका शर्माला जामीन मिळवून देण्यात भाजपला यश


"देशातल्या प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि पश्चिम बंगाल मधील तरुणांना जर हा अधिकार दिला नाही तर ते व्यक्त होण्यास कायमच घाबरतील" असे भाजपच्या युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले. प्रियांका शर्मा यांना मिळालेल्या जामिनाविषयी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. ज्या युवांना घेऊन आपण न्यू इंडियाचे स्वप्न पाहत आहोत अशा देशातील युवा नागरिकांना विचार करण्याचे, व्यक्त होण्याचे स्वतंत्र आपल्या संविधानाने दिले आहे आणि ते अबाधित ठेवण्यासाठी युवा मोर्चा अशाच प्रकारे लढत राहील आणि या लढाईचा शेवट पश्चिम बंगाल
मधील अराजकता संपवल्यावरच होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.


 

प्रियांका शर्मा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता अटक केले. अटक केल्यानंतर देखील न्यायालयाच्या प्रक्रियांचे पालन न करता प्रियांका शर्मा यांना १४ दिवसाच्या जेलची शिक्षा सुनावण्यात आली. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर आज या प्रकारणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून प्रियांका शर्मा यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती ऍडव्होकेट मधुकर देसाई यांनी दिली आहे.


मेट गाला २०१९ मध्ये प्रियांका चोप्राने केलेल्या वेषभूषेमध्ये छेडछाड करून प्रियांका चोप्राच्या ऐवजी ममता बॅनर्जींचा चेहरा लावून हा फोटो प्रियांका शर्मा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला असा आरोप प्रियांका शर्मा यांच्यावर करण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या फोटोमध्ये छेडछाड करणे हा अपराध असून ममता बॅनर्जींचा अपमान आहे. हा फक्त ममतांचा अपमान नाही तर बंगालच्या संस्कृतीचा अपमान असल्याचे ममता बॅनर्जी यांचे वकील हाजरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0