पॅथॉलॉजी लॅबची दुकानदारी

13 May 2019 19:51:37



मुंबईकर हा घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. मुंबईचे जनजीवनच धाकधुकीचे. अशा परिस्थितीत एकदा आजार जडल्यास त्याचे तत्काळ निदान करण्याची घाई रुग्णांना असते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या लवकर करण्यासाठी खासगी पॅथॉलॉजी लॅबचा आधार घेतला जातो. अनेकदा डॉक्टर चिठ्या देऊन पॅथॉलॉजी लॅब सुचवतातही. त्यामुळे रुग्णांनाही निदान चाचण्यांची खात्री महत्त्वाची वाटू लागते. मात्र, ज्या पॅथॉलॉजी लॅबमधून आपण चाचण्या केल्या, त्या अधिकृत आहेत का? याची अनेकदा माहितीच नसते. पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोणत्याही आजाराचे निदान केले जाते. रक्त, थुंकी, लघवी, जंतुसंसर्गापासून विविध व्याधींची चाचणी खासगी लॅबमधून करण्याचे सल्ले डॉक्टरांकडून दिले जातात. जलदगतीने आजारांचे निदान होते. त्यामुळे खासगी पॅथॉलॉजी लॅबचा पर्याय स्वीकारला जातो. मुंबईत अशा लॅब वाढू लागल्या आहेत. मात्र, ज्या लॅबमध्ये चाचणी केली जाते, त्या अधिकृत आहेत का? याची सखोल शहानिशा केली जात नसल्याने पॅथॉलॉजी लॅबमालकांचे फावले आहे. पॅथॉलॉजी लॅबमध्ये मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट असणे बंधनकारक असतानाही मुंबई, नवी मुंबई ते पनवेलपर्यंत सुरू असलेल्या शेकडो पॅथॉलॉजी लॅबनी नियम धाब्यावर बसवले आहेत. अनेकदा चुकीचे निदान होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची असतो. वारंवार याबाबत तक्रारी केल्या जातात. परंतु, ना राज्य शासन दखल घेत ना महापालिका. त्यामुळे अशा लॅबचा धंदा तेजीत सुरू आहे. मुंबईत तर बेकायदा लॅबचे पेव फुटले आहे. 'महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट' या संघटनेने मुंबईतील सर्व पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाच्या आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अद्याप सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे अधिकृत पॅथॉलॉजी लॅब नेमक्या कोणत्या, हेच कळायला मार्ग नाही. खासगी लॅबधारक याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतात. त्यामुळे पॅथॉलॉजी लॅब संदर्भातचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, इथे प्रश्न हा मुंबईकरांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या स्वास्थ्याचा आहे. तेव्हा, प्रशासनाने कुठलीही चालढकल न करता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

 

कारवाईला मुहूर्त कधी ?

 

मुंबईत सुमारे पाच हजार लॅब आहेत. या प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट असणे बंधनकारक आहे. न्यायालयाने तसे शासनाला आणि महापालिकेच्या आरोग्य खात्याला आदेश दिले आहेत. तरीही डी.एम.एल.टी पदविकाधारक किंवा अन्य लॅबतंत्रज्ञ स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत. महापालिका रुग्णालयाच्या परिसरात असो किंवा खासगी, प्रत्येक ठिकाणी लॅब दिसतात. मुंबईत अशा सातशेहून अधिक ठिकाणी अशा अवैध पॅथॉलॉजी लॅब चालवल्या जात आहेत. आजारांच्या निदानाबाबत रुग्ण चिंतेत असतात. बेकायदा लॅबचालकांनी याचा गैरफायदा घेण्यासाठी दुकाने थाटली आहेत. या माध्यमातून वर्षोनुवर्षं सर्वसामान्यांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे. परंतु, बेकायदा लॅबचालकांवर कारवाई करण्यास ना पालिका धजावत ना राज्य शासन. शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या आर्थिक हितसंंबंधांमुळे कारवाई होत नाही, असा आरोप संघटना करतात. यात तथ्य असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तसदी प्रशासन घेईल का, हा प्रश्न आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकर साथीच्या आजारांमुळे हैराण होतात. सामान्य सर्दी-खोकल्यापासून मलेरिया, डेंग्यूने मुंबईकरांच्या डोक्याला ताप होतो. यावेळी वैद्यकीय चाचण्या करून घ्यायला डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र, त्या कशा करतात, त्या करण्याची योग्य पद्धत कोणती, याची कोणतीही शास्त्रीय माहिती रुग्णांना नसते. काही पॅथॉलॉजी लॅबनी एमडी डॉक्टरांशी संधान साधून त्यांच्या संगनमताने रुग्णांची चाचणी करून देणार्‍या कोर्‍या कागदपत्रांवर आधीच सह्या घेऊन ठेवल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. चुकीचे निदान झाल्यास रुग्णांच्या जीवालाही धोका असतो. अनेकदा असे प्रकार घडतात. मात्र, तक्रार करणे अनेकजण टाळतात. शिवाय तक्रार कुणाकडे करावी, रुग्णांच्या उपचारासाठी झालेल्या खर्चामुळे भुर्दंड सहन करावा लागल्याने या फंदातच कोणी पडत नाही. अशा लॅबचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असले तरी शहरी भागातही वाढते आहे. रुग्णालय आणि सुविधांवर कोट्यवधींची आर्थिक तरतूद केली जाते. मात्र, तरीही योग्यरित्या रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. विविध चाचण्या उपलब्ध असल्याचे ढोल वाजवले जातात. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांची ससेहोलपट सुरू असते. अनेक रुग्णांची फसगत होत असतानाही अशा चाचण्या घेणार्‍या लॅबवर कारवाई का केली नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0