'स्ट्रॉग रूम' फुटेज मागणी संदर्भात न्यायालयाचा पटोलेंना दणका

08 Apr 2019 17:07:48



नागपूर : नागपूर शहर काँग्रेस समितीसह नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नाना पटोले यांनी 'स्ट्रॉग रूम'मध्ये ठेवलेल्या ईव्हीएमचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, यावर नागपूर उच्च न्यायालयाने शनिवारी पटोले यांची मागणी फेटाळून लावत 'स्ट्राँग रुम'मधील सीसीटीव्हीचे फुटेज सध्याच्या परिस्थितीत मिळणार नाही, असे सांगितले आहे.

 

नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी ४ हजार १८४ ईव्हीएम वापरल्या जाणार आहेत. या ईव्हीएम सहा स्ट्राँग रुम्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. २५ मार्च ते २८ मार्चपर्यंत ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी संपल्यानंतर व द्वितीयस्तरीय तपासणी सुरू असताना एका व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे दक्षिण नागपूर व मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुम्समधील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला होता. त्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही करत स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र, सद्यपरिस्थिती ते फुटेज देता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर नागपूर शहर काँग्रेस समितीने शनिवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

सर्व सहाही स्ट्रॉग रूममधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. संबंधित स्ट्राँग रुम्समधील सर्व वेळेतील व्हिडिओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. परंतु, ते पटोले यांना देता येणार नाही, असे आज जिल्हा प्रशासनाकडून न्यायालयाला सांगितले गेले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणामध्ये वादात शिरण्यास नकार देऊन वरीलप्रमाणे आदेश दिला. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी मतदान केंद्रावर ५० मॉकपोल पेक्षा जास्त वेळी मॉक पोल घ्यावे. काँग्रेसच्या या मागणीला ही जिल्हा प्रशासनाने तांत्रिक कारणांनी विरोध दर्शविला आणि तसे करणे शक्य होणार नाही, असे न्यायालयात सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0