नॅशनल पार्कमध्ये 'वाघाटी'चा मृत्यू

03 Apr 2019 22:30:48


 



जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात

 
 

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद असणाऱ्या 'वाघाटी' या मांजरामधील (रस्टी स्पॉटेड कॅट) 'सुंदरम्' या नर मांजराचा मंगळवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीच्या वाढीसाठी उद्यानातर्फे प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे मांजर इथे आणण्यात आले होते. 

 

मार्जार कुळात समावेश असणाऱ्या वाघाटीला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्या सात वर्षांपासून या मांजरांचा प्रजनन प्रकल्प इथे सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत वाघाटीचा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. यासाठी तज्ज्ञ समितीच्या नेमणुकीबरोबरीनेच जागतिक पातळीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. याअंतर्गत जानेवारी महिन्यात युनाइटेड किंडम येथील या विषयातील तज्ज्ञ नेव्हिले बुक यांना प्रचारण करुन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या सल्लांप्रमाणे सध्या राष्ट्रीय उद्यानात या मांजरांसाठी नवीन पिंजरे उभारण्याचे काम सुरू आहे.

 

तुंगारेश्वर अभयारण्यात २००५ साली बेवारस अवस्थेत सापडलेले वाघाटी (जिचे नाव अंजली ठेवण्यात आले) राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या सचिन नामक नर मांजर आणि अंजलीमध्ये घडलेल्या यशस्वी प्रजननामुळे त्यांना पुढे पिल्ले झाली. शिवाय सातारा जिल्ह्य़ात २००९ साली सापडलेल्या वेदिका नामक मादी मांजरालाही राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. २०१३ साली सुरू करण्यात आलेल्या प्रजनन प्रकल्पामध्ये अंजली आणि वेदिका यांच्यासह त्यांच्या सत्यम, शिवम, सुंदरम् आणि भाग्य या चार नर पिल्लांचा समावेश करण्यात आला. त्यातील भाग्य या नर मांजराचा गेल्यावर्षी मृत्यू झाला. उरलेल्या मांजरांची वंशावळ सारखीच असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रजनन होणे शक्य नव्हते. त्यासाठी बाहेरून मांजर आणण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले. त्याअंतर्गत डिसेंबर महिन्यात पुण्यातून आईपासून दुरावलेल्या वाघाटीच्या तीन पिल्लांना आणण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पाला चालना मिळेल असे वाटत असतानाच मंगळवारी सुंदरम् या ११ वर्षांच्या नराचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानातील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता या प्रजनन प्रकल्पामध्ये ३ नर आणि ३ मादी मांजरांचे अस्तिव राहिले आहे. त्यातील तीन मांजर या पौढावस्थेत असून तीन पिल्ले आहेत.

 
 

मांजराची वैशिष्टय़े

 

* जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात

* मांसभक्षी असून हा प्राणी निशाचर आहे.

* १४ ते १७ इंच रुंद असून सुमारे दीड किलो वजन

* ७० दिवसांचा प्रजननाचा कालावधी

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0