तमिळनाडूत मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

22 Apr 2019 10:17:28


तिरुचिरापल्ली : तामिळनाडूतील तुरायूरमध्ये एका मंदिरात रविवारी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे सात भाविकांचा मृत्यू झाला. यात आणखी १० भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुथियमपलयम गावातील रूप्पास्वामी मंदिराच्या शिक्क्याचे वितरण करण्यात येत होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

तुरायूर येथील मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिराच्या शिक्क्यांचे वितरण सुरू केले तेव्हा तो मिळविण्यासाठी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यावेळा चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. जखमींचा आकडा १० वर पोहोचला आहे.

मंदिराएका पदाधिकाऱ्याने सांगितले की, 'पूजा सुरू असताना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. गर्दीच्या प्रमाणात तेवढे पोलिसही मंदिरात उपस्थित नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. रूप्पास्वामी मंदिरातील शिक्का मिळाल्यास त्यामुळे घरामध्ये संपन्नता येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे गावातीलच नाहीत तर आजुबाजुच्या जिल्ह्यांतून हजारो लोक हे शिक्के मिळविण्यासाठी येतात. हा शिक्का मिळाल्यास तो घरातील तिजोरीमध्ये ठेवला जातो.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0