खुशखबर : आता क्रेडिट कार्डद्वारे बुक करा रेल्वे तिकीट

18 Apr 2019 12:28:58



मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता क्रेडिट-डेबिट (सीडी) कार्डवरून तिकीट काढणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेने २२ स्थानकांवरील एटीव्हीएम मशिनमध्ये पीओएस तंत्रज्ञान अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रेडिट-डेबिट (सीडी) कार्डधारक लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

 

मुंबई विभागातील २२ स्थानकांवर एकूण ३१ एटीव्हीएममध्ये सीडी कार्ड मशिन कार्यरत करण्यात येणार आहे. यात मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांचा समावेश आहे. त्याशिवाय, पुणे विभागातील पाच स्थानकांवर आठ, सोलापूर विभागातील तीन स्थानकांवर चार, नागपूरमधील पाच स्थानकांवर सहा आणि भुसावळ विभागातील तीन स्थानकांवर तीन एटीव्हीएममध्ये सीडी कार्ड मशिन कार्यन्वित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर एकूण ५१ सीडी कार्ड मशिन कार्यन्वित होणार आहे.

 

रेल्वे सूचना प्रणाली केंद्राअंतर्गत एटीव्हीएममध्ये पीओएस मशिन कार्यरत करून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यानंतर ही यंत्रणा मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सद्यस्थितीत स्थानकातील एटीव्हीएमची देखभाल-दुरुस्ती फोर्ब्स या खासगी कंपनीतर्फे करण्यात येत आहे. सीडी कार्ड मशिन कार्यन्वित झाल्यानंतर त्याची देखभाल-दुरुस्तीही हीच कंपनी करणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 

"रेल्वे स्थानकांवर तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना आणखी एक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. स्थानकातील एटीव्हीएमवर क्रेडिट-डेबिट कार्डवरून लोकल तिकीट आणि पास खरेदी करण्याची चाचणी रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने यशस्वी केली आहे. मध्य रेल्वेकडून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे." असे मध्य रेल्वाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0