पराभवाच्या भीतीने विरोधकांचा रडीचा डाव!

15 Apr 2019 20:56:58


 

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेतच. आता पुन्हा एकदा मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित करून मतदारांच्या मनात भ्रम उत्पन्न करण्याचे उद्योग विरोधकांनी चालविले आहेत. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांबद्दल शंकाकुशंका उपस्थित करून त्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचे विरोधकांनी ठरविले आहे.

 

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी पार पडला. आता दुसर्‍या टप्प्यासाठी येत्या १८ एप्रिलला म्हणजे गुरुवारी मतदान होणार आहे. या दुसर्‍या टप्प्यात १३ राज्यांमधील ९७ जागांसाठी मतदान होणार आहे. तामिळनाडूमधील ३९, कर्नाटक १४, महाराष्ट्रातील १०, उत्तर प्रदेश ८, बिहार ५, आसाम ५, ओडिशा ५, प. बंगाल ३, छत्तीसगढ ३, जम्मू-काश्मीर २, त्रिपुरा १, मणिपूर १, पाँडिचेरी १ अशी ही वर्गवारी आहे. भाजपने प्रचारात घेतलेली आघाडी लक्षात घेता, विरोधकांना आताच धडकी भरली आहे की काय असे वाटू लागले आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेतच. आता पुन्हा एकदा मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित करून मतदारांच्या मनात भ्रम उत्पन्न करण्याचे उद्योग विरोधकांनी चालविले आहेत. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांबद्दल शंकाकुशंका उपस्थित करून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे विरोधकांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे, लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही हे सर्व करीत आहोत, असा साळसूदपणाचा आव विरोधकांनी आणला आहे.

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही यंत्रे सदोष असल्याबद्दल आयोगाकडे तक्रार नोंदवली. चंद्राबाबू नायडू जे शिष्टमंडळ घेऊन गेले होते, त्यामध्ये हरिप्रसाद वेमुरू नावाची एक व्यक्ती अशी होती, जिला २०१० मध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची चोरी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. अशा हरिप्रसादला ‘तज्ज्ञ’ म्हणून चंद्राबाबू नायडू घेऊन गेले होते. हा हरिप्रसाद वेमुरू कोण याची आयोगाकडून चौकशी केली गेली असता त्याचे पितळ उघडे पडले. मात्र, चंद्राबाबू नायडू यांनी हरिप्रसादचा शिष्टमंडळात समावेश करण्याच्या कृतीचे समर्थन केले. त्याच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. आयोगासमवेत चर्चा करताना स्वत:ला ‘तज्ज्ञ’ म्हणविणारा हरिप्रसाद वारंवार तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत होता. त्या व्यक्तीविषयी माहिती घेतली असता, त्याला इव्हीएमची चोरी केल्याप्रकरणी अटक झाली होती, हे आयोगाच्या लक्षात आले. त्याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागितले असता तेलुगू देसमने त्याची पाठराखण केली. हरिप्रसाद वेमुरू याने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, ते मार्गी लावावेत, अशी सूचना त्या पक्षाने केली. ज्या माणसाने इव्हीएमची चोरी केली होती, त्याचा आपल्या शिष्टमंडळात अंतर्भाव करताना चंद्राबाबू यांना जराही लाज वाटली नाही. असे चंद्राबाबू नायडू आयोगास शिकविण्यास निघाले आहेत.

 

चंद्राबाबू नायडू आणि अन्य प्रमुख विरोधी पक्षांनाही इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबद्दल अनेक शंका आहेत. त्याबद्दल दाद मागण्यासाठी विरोधकांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. इव्हीएम यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल विरोधकांकडून गेल्या काही वर्षांपासून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. ही यंत्रे पूर्णपणे निर्दोष असल्याचे आणि त्यामध्ये काहीही गडबड करणे अशक्य असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले असतानाही विरोधक त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. २१ विरोधी पक्षांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. ५० टक्के मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) पडताळणी करायला हवी, अशी विरोधकांची मागणी आहे. नेहमीप्रमाणे, निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपला अनुकूल असे आयोगाचे वागणे आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

 

दुसरीकडे, निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तरी विरोधक एकत्र आल्याचे दिसत नाही. कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे, याबद्दल त्यांच्यात एकवाक्यता दिसत नाही. ‘महागठबंधन’ प्रत्यक्षात आल्याचेही दिसत नाही. त्यामुळे हताश झालेले विरोधक आपला पराभव होणार, हे गृहीत धरून त्याचे खापर इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांवर फोडण्यास निघाले आहेत. नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध विरोधकांकडून तेच तेच आरोप उगाळले जात आहेत. ते आरोप ऐकून मतदाराचे कानही किटून गेले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला देशापासून फुटून निघण्याची भाषा करीत आहेत. पण, त्याबद्दल विरोधक चकार शब्द काढायला तयार नाहीत. कोणाही विरोधी नेत्याने या नेत्यांच्या भाषणाचा साधा निषेधही केला नाही. मेहबूबा मुफ्ती यांनी अलीकडे भारत सर्वधर्मीयांचा असल्याकडे लक्ष वेधले आणि भाजप देशात फूट पाडत असल्याचा आरोप केला. पण, ज्यावेळी काश्मीरमधील हजारो हिंदूंना आपल्या मायभूमीतून परागंदा व्हावे लागले, त्यावेळी ही नेतेमंडळी कोठे गेली होती? तेथील काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ते का उभे राहिले नव्हते? याची उत्तरे देण्यास त्यांना तोंड आहे का? फुटीरतेची भाषा बोलणार्‍या या नेत्यांवर पंतप्रधान मोदी यांनी जोरदार प्रहार केला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवाराने काश्मीरच्या तीन पिढ्या बरबाद केल्या असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

सर्वच विरोधकांची अवस्था सैरभैर झाल्यासारखी झाली आहे. सरकारच्या चांगल्या कामांची दखल घेतली तर त्याचा लाभ भाजपला होईल, हे लक्षात घेऊन त्याबद्दल ते तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत. पाच वर्षांत भाजप सरकारने काहीच चांगले काम केले नाही? कोणी तरी यावर विश्वास ठेवेल का? देशात महागाई नाही याकडे लक्ष वेधून हेच आमच्या सरकारचे यश असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले. शरद पवार समर्थक वृत्तपत्रात मोदी यांची जी प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, त्यात त्यांनी या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या दरांचा मुद्दा या आधी अनेक निवडणुकांमधून उपस्थित केला गेला आहे. पण आता महागाई हा विषय विरोधक उपस्थित करीत नाहीत, यातच सर्व काही आले.

 

ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्या वेगवेगळे मुद्दे उपस्थित करू लागल्या आहेत. प. बंगालमध्ये रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे. असे कार्यक्रम म्हणजे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आपणास राजकारणातील खूप काही कळते, असा आव आणून भाजपवर टीका केली आहे. केवळ सत्ता भोगणार्‍या भाजपचा पराभव करा, असे आवाहन प्रियांका यांनी केले आहे. ज्यांनी कित्येक वर्षे सत्ता उपभोगली, देशातील जनतेला वार्‍यावर सोडले, गरिबी दूर करण्याऐवजी स्वत:ची घरे भरली अशा पक्षाची नेता झालेली प्रियांका गांधी भाजपवर सत्ता भोगत असल्याचा आरोप करीत आहे म्हणजे फारच झाले. राज्यघटना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लिहून दिलेली भाषणे केली म्हणजे राज्यघटना आपल्याला कळली, असा त्याचा अर्थ होत नाही हे कोणी तरी त्यांना सांगायला हवे! मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यास दोन दिवस उरले आहेत. अपप्रचार करण्यापलीकडे विरोधकांच्या हाती काहीच उरले नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या पुढील काळात अपप्रचाराचा आणखी धुरळा उडवला तरी भाजपच्या झंझावातापुढे त्याचा टिकाव लागणार नाही, असेच दिसून येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0