मरोळमधून बिबट्याची सुखरुप सुटका

01 Apr 2019 19:45:25



मुंबई : अंधेरीच्या मरोळ येथील वुडलॅण्ड गृहसंकुलात बिबट्या शिरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव बचाव पथकाने या बिबट्याला बचावले. हा बिबट्या साधारण दीड ते दोन वर्षांचा नर आहे. त्यामुळे आईपासून भरकटल्यामुळे तो लोकवस्तीत शिरल्याची शक्यता संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

ठाण्याच्या सत्कार रेसिन्डसी हॉटेलमधून बिबट्या बचावाची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी मरोळ येथील वुडलॅण्ड गृहसंकुलातील रहिवाशांना बिबट्याचे दर्शन घडले. वुडलॅण्ड अॅवेन्यु इमारतीमधील एका रहिवाशाला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या गाडीखाली झोपलेल्या अवस्थेत दिसला. रहिवाशाने कुत्रा समजून त्याला हुसकावल्याने बिबट्याने शेजारीच असलेल्या वुडलॅण्ड क्रेस्ट टॉवर इमारतीत पलायन केले. त्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाशांनी वन विभागाशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली.

 

घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाने तीन तासांच्या मेहनतीनंतर सुखरुपरीत्या या बिबट्याला बचावले. तळमज्यावरील जिण्यांखालील जागेत हा बिबट्या दडून बसला होता. बिबट्याने पळून जाऊ नये म्हणून इमारतीभोवती जाळ्या लावण्यात आल्या. बिबट्यापर्यंत पोहचण्यासाठी पहिल्या मजल्यावरील खिडकी तोडून आम्ही आत प्रवेश केल्याची माहिती बचाव पथकाचे प्रमुख संजय वाघमोडे यांनी दिली. त्यानंतर तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पेठे यांनी बिबट्याचा वेध घेत डाट गन व्दारे भुलेचे इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याची रवानगी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव केंद्रात करण्यात आली. पकडलेला बिबट्या साधारण २ वर्षांचा नर असल्याची माहिती डॉ. पेठे यांनी दिली. त्याची वैद्यकीय आणि रक्तचाचणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी गेल्यावर्षी जून महिन्यात ७२ तासांच्या प्रयत्नांनंतर एका बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले होते.

 

आईपासून भरकटला ?

 

मादी बिबट्यांसोबत त्यांची पिल्ले साधारण वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यत राहतात. मरोळमधून पकडण्यात आलेला बिबट्या हा साधारण दीड ते दोन वर्षांचा आहे. त्यामुळे तो आईपासून दुरावल्याने भरकटल्यामुळे याठिकाणी पोहचल्याची शक्यता वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी अंधेरीतील शेर-ए-पंजाब वसाहतीत शिरलेला बिबट्याही लहान होता. तो देखील भरकटलेल्या अवस्थेत लोकवस्तीपर्यंत पोहचल्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.

 

मरोळ येथून बचाविण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून त्याला सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

- डॉ.जितेंद्र रामगावकर, उप-वनसंरक्षक, ठाणे वन विभाग

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0