स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी!!

07 Mar 2019 21:36:15

 

 
 
 
आज ८ मार्च... जागतिक महिला दिवस...म्हणजे महिलांचा महिला म्हणून सन्मान करण्याचा दिवस. पण, जेव्हा ‘जागतिक महिला दिन’ असे म्हटले जाते, तेव्हा मुळात प्रश्न निर्माण होते, तो जगातील सगळ्या महिलांच्या अधिकारांचा. आशियाई, पाश्चिमात्त्य देशांमध्ये महिलांना निदान नावापुरता आदर मिळत असला तरी, कमनशिबी अशा आखाती देशांमध्ये परिस्थिती मात्र अतिशय बिकट. म्हणजे आधीच अठराविश्वे दारिद्य्राच्या छायेत असलेल्या या देशांमध्ये महिलांच्या अधिकारांना चक्क केराची टोपली दाखवली जाते. असेच गेली ५० वर्षं एकमेकांशी धुमसणारे दोन देश म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल. त्यांच्यातील कट्टर शत्रुत्त्वाचे पडसाद आजतागायत या दोन्ही देशांतील नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यातून महिलांची तर गोष्टच सोडा!!
 

मुळात प्रांतवादापासून सुरुवात झालेल्या या संघर्षाने हळूहळू युद्धाचे स्वरूप धारण केले आणि त्याची झळ पॅलेस्टाईनमधल्या महिलांनाही बसली. एकीकडे जागतिक महिला दिनाकरिता महिला पुरस्कृत कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात, तर तिकडे पॅलेस्टिनी महिलांनी ‘महिला दिनी’च स्वत:च्या अधिकारांसाठी लढायचे ठरविले आहे. पण, अभिव्यक्त होण्याएवढेही स्वातंत्र्य या महिलांना नाही. पॅलेस्टिनी महिला इस्रायलविरोधात रॅली काढणार, हे कळताच ‘महिला दिना’च्या पूर्वसंध्येलाच आपल्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी आलेल्या महिलांवर इस्रायलच्या जवानांनी गोळीबार केला, ज्यात सहा महिलांचा मृत्यू झाला, तर जवळजवळ ५० महिलांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्यापैकी ३० महिला या गर्भवती असल्याचा दावा पॅलेस्टिनी वृत्तपत्रांनी केला आहे. त्यामुळे ‘महिला दिना’चा गाजावाजा करणाऱ्या आणि आपल्याला अभिव्यक्त कसे होता येत नाही, हे चारचौघात सांगणाऱ्या महिला एकीकडे असताना, दुसरीकडे अभिव्यक्त होण्यासाठीचा विश्वास एकवटून, आपली मतं मांडण्याआधीच पॅलेस्टिनी महिलांना त्यांच्या विचारांसहितच कैद करण्यात आले.

 

जर आपण पॅलेस्टाईनमधील महिलांच्या समस्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली, तर या परिस्थितीला नक्की कोण कारणीभूत आहे, याचाच शोध आधी घ्यावा लागेल. कारण, एकूण पॅलेस्टिनींपैकी साधारण ४० टक्के लोक वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये राहतात आणि उरलेले पॅलेस्टिनी स्वत:च्याच देशात विखुरलेल्या निर्वासित छावण्यांमध्ये राहतात. मुळात या वादाला सुरुवात झाली, ती दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनचा नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या छळछावणीतून निसटलेल्या ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमध्ये राहण्यास सुरुवात केली तेव्हा. त्यामुळे ज्यूंनी आश्रयदात्या पॅलेस्टिनींना त्यांच्या देशात निर्वासित बनवलं आणि हा संघर्ष मग पुढे आणखीन चिघळत गेला. १९४८ साली ज्यूंचा इस्रायल हा स्वतंत्र देश जगाच्या पाठीवर उभा राहिला आणि इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन हा वाद मग पुढे पेटतच गेला. १९४८ ते १९६८ च्या काळात हजारो पॅलेस्टिनी महिलांना आपला देश सोडावा लागला, शेकडो महिला विधवा झाल्या आणि यादरम्यान महिलांवर झालेल्या बलात्काराचे आकडे मोजण्याची हिम्मत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागालाही झाली नाही. २००३ साली पॅलेस्टाईनमधील महिलांनी महिलांसाठीच एक समिती नेमली. मात्र, आजही परिस्थिती ‘जैसे थे’च!

 

दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी आणि पॅलेस्टिनींचा वंश वाढू नये म्हणून पॅलेस्टाईनमधील पुरुषांना कैद केले जाते. मात्र, यामुळेही पॅलेस्टाईनमधील महिला खचल्या नाहीत. त्यांनी आपला वंश वाढावा म्हणून ‘शुक्राणू तस्करी’ नावाचा प्रकार सुरू केला. विद्युत करंट किंवा सुटका झालेल्या कैद्याच्या माध्यमातून तुरुंगातील कैद्यांच्या शुक्राणूंची तस्करी केली जाते. म्हणजे मातृत्वाचं साधं सुखही इथल्या महिलांच्या नशिबात नाही. एवढे सगळं असूनही, या महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी रॅलीचे आयोजन केले, हेच खरे तर कौतुकास्पद म्हणावे लागेल. पॅलेस्टिनी महिलांचा हा आत्मविश्वास खरंतर इस्रायलचा पराभव आहे. कारण शेवटी,

 

सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे,

स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी!!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0