अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांचा लोटला जनसागर

04 Mar 2019 18:39:51


 


ठाणे : अंबरनाथ शहरात तब्बल ९५८ वर्ष जुन्या असलेल्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीसाठी आज पहाटेपासून शंकराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर लोटला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला गर्दी करतात. प्रथेप्रमाणे मंदिर विश्वस्त व ग्रामस्थांनी पहाटेच्या सुमारस काकड आरती करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी ३ दिवस जत्रेचे स्वरूप पाहवयास मिळते. मात्र, देशभरात हाय अलर्ट घोषित केल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरातील गाभाऱ्यात भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

 

अंबरनाथ शहरातील तब्बल ९५८ वर्षे जुन्या असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला ४ लाखांपेक्षा जास्त भाविक भेट देतात. या शिवमंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. या गाभाऱ्यात जाण्यासाठी २० पायऱ्या खाली उतरावे लागते. मात्र, यंदा शिवमंदिर हे दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याने या गर्दीत घातपात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच मंदिर आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शिवमंदिर परिसरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.

 

श्री शंकराचे दर्शन मिळावे म्हणून रात्रीपासूनच भाविकांची मंदिराबाहेर लांबच लांब रांग लागली होती. रासपचे महादेव जानकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, प्रदीप पाटील, सदाशिव पाटील, कुणाल भोईर यांच्यासह असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमिताने होणाऱ्या यात्रेमध्ये भाविकांसाठी विविध सामाजिक , राजकीय संघटनांतर्फे फराळ आणि पाणी देण्यात येत होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0