वन्यजीवांचे स्थलांतर रोखण्यासाठी खबरदारी

28 Mar 2019 18:56:26




नॅशनल पार्कमधील विकासकामांना उन्नत स्वरूप


मुंबई (अक्षय मांडवकर) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडील परिक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या रस्ते आणि रेल्वे विकास प्रकल्पांचे बांधकाम उन्नत स्वरुपाचे करण्याच्या सूचना उद्यान प्रशासनाने संबंधित प्राधिकरणांना दिल्या आहेत. विकास प्रकल्पांमुळे वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अशी सूचना देण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या 'बिबट्या गणना अहवाल ०१८' मधून सहा बिबट्यांनी अंतर्गत स्थलांतर केल्याची बाब उघड झाली आहे. यामध्ये 'एल ५९' या सांकेतिक क्रमांक असलेल्या बिबट्याने मालाड ते तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यापर्यंत स्थलांतर केल्याचे उघड झाले आहे. मात्र, या स्थलांतरादरम्यान कामण-भिवंडी मार्गावर रस्ते अपघातात त्याच्या मृत्यू झाला. माळशेज घाट ते राष्ट्रीय उद्यान, असे स्थलांतर केलेल्या 'आजोबा' बिबट्यानंतर 'एल ५९' च्या निमित्ताने बिबट्यांच्या स्थलांतराचा पुरावा वन विभागाच्या हाती लागला आहे. त्यामुळे बिबट्यांच्या स्थलांतराच्या मार्गाला सुरक्षित करण्यासाठी प्रस्तावित विकास प्रकल्पांचे बांधकाम उन्नत स्वरुपाचे करणाच्या सूचना आता उद्यान प्रशासनाने दिल्या आहेत.

 

उद्यानाच्या उत्तरेकडील नागला ब्लॉक आणि तुंगारेश्वर अभयारण्याच्या पट्यामधून कामण-भिवंडी रस्ता आणि दिवा-कामण-वसई रेल्वे मार्ग जातो. याच पट्यामधून आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग आणि विरार-पनवेल रेल्वे मार्गिका प्रस्तावित आहे. त्यामुळे या पट्यांमधून होणाऱ्या वन्यजीवांच्या स्थलांतरणाला धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी या प्रकल्पांचे बांधकाम उन्नत स्वरुपाचे करण्याची मागणी उद्यान प्रशासनाने संबधित प्राधिकरणाकडे केली आहे. याशिवाय प्रकल्प क्षेत्रातील डोंगराळ भागातून वन्यजीवांचे स्थलांतर सुरक्षितरीत्या होण्याकरीता पुलांच्या स्वरुपातील मार्गिका बांधण्यात येणार आहेत.

 
 

बिबट्या गणना अहवालामधून बिबट्यांच्या स्थलांतराचा पुरावा आमच्या हाती लागल्याने उद्यानातील उत्तरेकडील क्षेत्रात प्रस्तावित असणाऱ्या विकास प्रकल्पांचे बांधकाम उन्नत स्वरुपाचे करण्याच्या सूचना आम्ही संबंधित प्राधिकरणांना दिल्या आहेत. या सूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय प्रकल्पांना परवानगी देण्यात येणार नाही.

 - अन्वर अहमद, मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

 



वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 

Powered By Sangraha 9.0