नाणार होणार नाही!

02 Mar 2019 20:34:52

 

 
 
 
 

प्रकल्प अधिसूचनेस मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, सुभाष देसाई यांचा दावा

 

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला बहुचर्चित हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (ग्रीन रिफायनरी) अखेर रद्द करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी सरकारने जारी केलेली अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली.

 

नाणार येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प जाहीर झाल्यापासून तेथील काही स्थानिक गट व शिवसेना पक्षाने या प्रकल्पास जोरदार विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती झाल्यानंतर हा प्रकल्प रद्द होणार, अशी जोरदार चर्चा होती. अखेर, शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना स्थगित करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. यामुळे हा प्रकल्प नाणार येथे होणार नाही, यावर जवळपास अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे.

 

सदर तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्यातील अन्य कोणत्याही जिल्ह्यातील जनतेने आम्हाला हवा असल्याचे सांगितल्यास तिथे हा प्रकल्प होऊ शकेल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाला, विकासाला आमचा विरोध नाही परंतु, नाणारमधील स्थानिक जनतेने या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे रिफायनरी आता तेथे होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, हा एक प्रकल्प रद्द झाल्यामुळे राज्याचे फारसे काही नुकसान होणार नसल्याचा दावाही सुभाष देसाई यांनी यावेळी केला.

 

अद्याप जमिनींचा मोबदलाच नाही

 

नाणार येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे काय, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता सुभाष देसाई म्हणाले की, आम्ही प्रकल्पाची अधिसूचना काढून केवळ सरकारचा हेतू स्पष्ट केला होता. ती प्रक्रियाच आता स्थगित करण्यात आली आहे. येथील जमिनींचा मोबदला दिला गेला नव्हता, जमिनींची मोजणीही झाली नव्हती, अशी महत्वपूर्ण माहितीही देसाई यांनी दिली. तसेच त्यामुळे सदर जमिनींची मालकी ज्यांची होती त्यांचीच राहील व सरकारकडे कोणतीच जमीन मिळालेली नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

 

"नाणारच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. प्रकल्पाच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यामुळे हा प्रकल्प निश्चितपणे रद्द झाला आहे."

 

- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0