काक: कृष्ण: पिक: कृष्ण:

02 Mar 2019 20:53:16

 

 
 
 
आजवर चाललेल्या प्रयत्नांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने पाकिस्तानच्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे, हे मोदींच्या विचारसरणीने शिकविले होते. तरीही टीका सहन करूनही नवाज शरीफ यांच्या भेटीपासून सर्व प्रयोग त्यांनी करून पाहिले व त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याआधारे काही निष्कर्ष काढले. पाकिस्तानबद्दलची जगाची भूमिका बदलली पाहिजे व दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला एकटे पाडले पाहिजे, हा त्यातील पहिला निष्कर्ष. केवळ बचावासाठी नव्हे, तर आक्रमणासाठी सेनादलांना तयार केले पाहिजे व त्यासाठी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे हा दुसरा. त्यासाठी आवश्यक अशी तंत्रज्ञानाची व गुप्तहेरयंत्रणेची तयारी केली पाहिजे हा तिसरा. असे निर्णय घेत असताना धोका पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे, हा चौथा. गेली पाच वर्षे मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या चारही आघाड्यावर काम करीत होते व त्याचे फळ पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मिळाले.
 
 

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेद पिक काकयो।

वसंत समये प्राप्ते, काक: काक: पिक: पिक:॥

 

असे संस्कृतमधील एक सुभाषित आहे. कावळाही काळा असतो व कोकीळही काळा असतो. दिसायला ते दोघेही सारखेच दिसतात. पण जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा कोकीळ कुजन करू लागतो पण, कावळा हा ‘काव काव’ करीतच राहतो. सामान्य वेळी सर्व व्यक्ती सारख्याच वागताना दिसतात, कसोटीच्या वेळी त्यांच्यातील फरक स्पष्ट होतो. नेत्यांबद्दलही असेच असते. एरवी सारे नेते एकाच प्रकारची आश्वासने देत असतात, एकमेकांवर आरोप करीत असतात. आपल्या पक्षाला, आपल्याला निवडून दिले, तर देशासमोरील सर्व प्रकारचे प्रश्न सुटतील याची ग्वाही देत असतात. पण कसोटीचा प्रसंग आल्यावर नेता कसा वागतो व परिस्थितीला कसे वळण देतो यावर त्या नेत्याचा कस ठरत असतो. आज आपला देश त्याचाच अनुभव घेत आहे.

 

वास्तविक पाहता भारताच्या स्वातंत्र्यापासूनच पाकिस्तान ही भारतापुढची मोठी डोकेदुखी बनलेला आहे. भारत व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले व लगेच काश्मीरवरून युद्धाला सुरुवात झाली. ते युद्ध अनिर्णीत अवस्थेत संपले व काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात राहिला. तेव्हापासून काश्मीर हे भारत पाकिस्तानच्या संघर्षाचे कारण बनले. परंतु, अनेक प्रयत्न करूनही पाकिस्तानला काश्मीर घेता आले नाही. त्यामुळे त्याने दहशतवादाचा मार्ग स्वीकारला, याची सर्वांनाच माहिती आहे. परंतु, पाकिस्तानच्या या प्रयत्नांना आजवरच्या नेत्यांनी कसा प्रतिसाद दिला? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पं. नेहरूंनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले व त्याचा फायदा पाकिस्तानला मिळत गेला. काश्मीर समस्या ही घटनात्मकदृष्ट्या भारताची अंतर्गत समस्या असून पाकिस्तान त्यात हस्तक्षेप करीत आहे, या वास्तवाकडे दुर्लक्ष होऊन भारतच पाकिस्तानवर अन्याय करीत आहे, असे चित्र पाकिस्तानने जगापुढे उभे केले व जगानेही त्यावेळी ते स्वीकारले. रशिया वगळता एकही महत्त्वाचा देश त्यावेळी भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा धोका ओळखून तेथे आपल्या गुप्तचर यंत्रणेला कार्यरत केले. पाकिस्तानमधील कहुटा येथील अणुभट्टीत अणुबॉम्ब निर्मितीचे काम सुरू आहे, याची माहिती या संस्थेने पुरविली होती. परवा जसा विमान हल्ला करून जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला तशीच ही अणुभट्टी उद्ध्वस्त करण्याची योजनाही बनली होती. पण त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तिला मान्यता दिली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मितीला कोणतीच अडचण आली नाही. पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र बनल्यामुळे अण्वस्त्र युद्धाच्या मानसिक दबावाखाली भारतीय नेतृत्व आले व त्यातून ते आतापर्यंत बाहेर पडू शकले नव्हते. इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानमधील गुप्तहेर यंत्रणा विसर्जित करून टाकली. मुंबईमध्ये दाऊदचा उपयोग करून बॉम्बस्फोट घडवून आणले तेव्हा प्रतिहल्ला करावा, ही कल्पनाही कोणाला करता आली नसती. याउलट आपण खोटी बातमी देऊन परिस्थिती कशी उत्तम हाताळली यातच शरद पवार खूश होते. कारण, प्रत्यक्ष गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा हिंदूंना फसवणे सोपे होते. २६/११ ला मुंबईवरील हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या दहशतवादी केंद्रावर हल्ला करावा, अशी योजना बनविली जात होती. परंतु, अशा निर्णयासाठी जी हिंमत लागले ती त्यावेळच्या नेतृत्वाकडे नव्हती.

 

अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेण्याकरिता चार प्रमुख घटक एकत्र येण्याची गरज असते. ज्या विचारसरणीत नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला आहे ती कशा प्रकारची आहे? हा पहिला. ती विचारसरणी पेलण्याचे सामर्थ्य त्या नेत्यात आहे की नाही? हा दुसरा घटक. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची कार्यक्षमता त्या नेत्यापाशी आहे की नाही ? हा तिसरा घटक. अखेरचा पण लोकशाहीत महत्त्वाचा म्हणजे त्या नेत्यावर लोकांचा विश्वास आहे का ? व तो नेता लोकांना आपल्याबद्दलचा विश्वास देऊ शकतो का? या चारही मुद्द्यावर मोदी यांचे नेतृत्व यशस्वी झाल्यामुळे आज होत असलेला बदल आपण पाहत आहोत.

 

आजवर चाललेल्या प्रयत्नांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने पाकिस्तानच्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे, हे त्यांच्या विचारसरणीने शिकविले होते. तरीही टीका सहन करूनही नवाज शरीफ यांच्या भेटीपासून सर्व प्रयोग त्यांनी करून पाहिले व त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याआधारे काही निष्कर्ष काढले. पाकिस्तानबद्दलची जगाची भूमिका बदलली पाहिजे व दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला एकटे पाडले पाहिजे, हा त्यातील पहिला निष्कर्ष. केवळ बचावासाठी नव्हे, तर आक्रमणासाठी सेनादलांना तयार केले पाहिजे व त्यासाठी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे हा दुसरा. त्यासाठी आवश्यक अशी तंत्रज्ञानाची व गुप्तहेरयंत्रणेची तयारी केली पाहिजे हा तिसरा. असे निर्णय घेत असताना धोका पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे, हा चौथा. गेली पाच वर्षे मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या चारही आघाड्यावर काम करीत होते व त्याचे फळ पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मिळाले. असे असले तरी, पहिल्या व दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईक नंतरची परिस्थिती हाताळण्यात मात्र जमीन-आस्मानाचा फरक होता. पहिल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने ओरडून जगाला सांगितले की, “हो आम्ही हे केले.” त्यानंतर असेही सांगितले गेले की, यापूर्वीही असे स्ट्राईक केले गेले. पण ते उघडपणे सांगण्याचे राजकीय धैर्य त्यावेळच्या नेतृत्वापुढे नव्हते. आम्ही जे करू ते उघड उघड न लपवता. एका धोरणाचा भाग म्हणून करू, असे या सरकारने सांगितल्याने जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला व भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाकडे गांभीर्याने पाहू लागले. आजवर भारत दहशतवादाविरोधात बोलत होता, पण त्याची धोका पत्करायची तयारी नव्हती. मग भारतातील दहशतवादासाठी जगाने का धोका पत्करावा? त्यामुळे भारताच्या मागणीला आत्मकर्तृत्वाचे वजन नव्हते. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने आपण असा धोका पत्करायला तयार आहोत, असे पहिल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सिद्ध केले व त्याचा परिणाम आता दिसतो आहे.

 

भारत-पाकिस्तान संबंधातील परिस्थिती आता बदलून गेली आहे, याचा अनुभव जग आज घेत आहे. पण अशा गोष्टी एकदम घडत नाहीत, त्या क्रमाक्रमाने घडत असतात व त्याचा एकदम प्रत्यय येतो. तसा प्रत्यय आता येत आहे. त्यासाठी जो एक दृष्टिकोन ठेवून गेली पाच वर्षे जे काम सुरू आहे त्याचे ते एकत्रित फळ आहे. श्रीरामजन्मभूमी चळवळीनंतर समाज मानस बदलत होते. पण त्या बदललेल्या मानसाला संवादी नेता मिळत नव्हता. मोदींना देशभरातून जो उत्स्फूर्त पाठिंबा मिळला. याचे कारण त्यांच्या नेतृत्वात आपल्या आकांक्षेचे प्रतिबिंब लोक पाहत होते. त्याच भूमिकेतून व विश्वासाने लोकांनी त्रास सहन करूनही नोटाबंदीच्या धोरणाला पाठिंबा दिला. त्याचा व्यावहारिक उपयोग किती झाला हा त्यांच्या मूल्यमापनाचा विषय नव्हता. मोदींची त्यामागची भावना ही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. लोकांचा मोदींवरील विश्वास अजूनही टिकून आहे. या घटनेने त्यात भर पडली आहे. आज पुन्हा अनेक जण मोदींना शांततेचे व संयमाचे सल्ले देत आहेत. खरेतर युद्ध हा दोघांच्या मनातील भीतीचा चाललेला खेळ असतो. अण्वस्त्रयुद्धाचे जेवढे भय भारताला आहे त्यापेक्षा अधिक पाकिस्तानला व ते सुरू होऊ नये, याचे जगाला आहे. भारताने पाकिस्तानची सीमा ओलांडून, राजधानीच्या जवळ जाऊन हल्ला करून आपले एकही विमान न गमावता सर्व विमाने परत आणली आहेत. याचा पाकिस्तानी लष्कराला पत्ताही लागू नये, ही मनात भीती उत्पन्न करणारी बाब आहे. युद्धे ही मनाच्या व प्रत्यक्ष अशा दोन्ही रणांगणांवर लढली जातात. या दोन्ही रणांगणांवर मोदी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मोदींना रोखण्यासाठी अनेक विरोधी पक्ष व त्यांचे नेते एकत्र आले आहेत. जो नेता काळाशी संवादी असतो त्याचा अशा रीतीने पराभव करता येत नाही, असे इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे. योग्य काळ आल्यानंतर परिस्थितीच कावळा कोण कोकीळ हे स्पष्ट करीत असते. त्याकरिता कोकीळला प्रचाराला जावे लागत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0