आम्ही शांततेचे दूत...

23 Feb 2019 12:42:03


 


पुरस्कारासाठी देण्यात आलेली १ कोटी, ३० लाखांची रक्कम गंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी त्यांनी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांचे आभार मानत मार्च, २०१९ पर्यंत गंगा स्वच्छ करू, असा निर्धार व्यक्त केला.


दहशतवादाविरोधात केवळ आवाज उठवण्यापेक्षा त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दक्षिण कोरियातील सेऊल पुरस्कार सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. औचित्य होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भारताला मिळालेल्या पहिल्या सेऊल पुरस्काराच्या सोहळ्याचे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि विविध योगदानाची दखल घेत हा पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात आला. स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, आयुष्मान योजना, जीएसटी आदींच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे गरिबी-श्रीमंतीची दरी मिटवण्यासाठीच्या प्रयत्नात झालेल्या योगदानाची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याचे प्रमाण म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सन्मान सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही तर संपूर्ण देशाचा आहे,” असे सांगत भारतीय संस्कृतीच्या उदारवादी विचारसरणीचा पैलू जगासमोर ठेवला. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या संस्कृतीचा हा पुरस्कार आहे, असे मोदी म्हणाले. पुरस्कारासाठी देण्यात आलेली १ कोटी, ३० लाखांची रक्कम गंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी त्यांनी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांचे आभार मानत मार्च, २०१९ पर्यंत गंगा स्वच्छ करू, असा निर्धार व्यक्त केला.

 

पुरस्कार सोहळ्यानिमित्त जगाला दर्शन घडले, ते भारतीय संस्कृतीचे आणि दहशतवादविरोधात खंबीरपणे लढणाऱ्या भारताचे. “महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त भारताला शांतीचा पुरस्कार मिळणे हे गौरवास्पद म्हणावे लागेल,” असा उल्लेख मोदींनी केला. भारतीय संस्कृती जिथे शांततेची शिकवण प्रत्येकाला विद्यार्थीदशेतच मिळते, अशा संस्कृतीचा हा गौरव असल्याचे मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हान ठरलेल्या दहशतवादाचा जागतिक शांततेला सर्वात मोठा धोका असल्याचे सांगत संपूर्ण जगाने यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शांततेसाठी पुरस्कार मिळणे, त्याच वेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अक्षम्य आणि भ्याड पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध होणे, ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करणारी गोष्ट आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान, लष्कर यांच्यासह अन्य नेत्यांनी पाक कसा दहशतवादापासून नामानिराळा आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. भारताने वेळोवेळी युद्ध पुकारले, असाही कांगावा पाकने आहे. भारताने युद्धाचा साधा उल्लेखही केला नसताना असा आरोप हास्यास्पद आणि चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात, हेच दाखवणारा आहे. या सर्व बाबींना तोंड देताना भारताची अर्थव्यवस्था पाच हजार अब्ज डॉलर्सच्या दिशेने येत्या काळात कूच करेल, असा आशावाद जगातील गुंतवणूकदारांसमोर मोदींनी व्यक्त केला. गरीब-श्रीमंत ही दरी मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी घेतलेल्या विविध योजनांचा उल्लेख करताना राबविण्यात आलेल्या स्कील इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत आदी योजनांमुळे सुधारणांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. भारत सरकार राबवत असलेल्या ‘स्वच्छ भारत योजने’द्वारे झालेल्या उपलब्धींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

 

सुरुवात छोट्या गोष्टींपासून करण्याची गरज यातून दिसून आली. भारताचा विकास हा केवळ भारतीयांसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठीच्या विकासात योगदान देणारा असल्याची भावना मोदींनी बोलून दाखवली. वातावरणबदलाविरोधात भारत चांगली कामगिरी करत असल्याचेही त्यांनी म्हटले. शांततेचा पुरस्कार स्वीकारताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेचा संदर्भ देत, “आमची संस्कृती ही आकाश, अंतरिक्ष, भूमी आणि संपूर्ण सृष्टीतील चराचरात शांतता नांदू इच्छिणारी संस्कृती असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारताच्या उदात्त विचारसरणीचे प्रतिबिंब पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दाखवत भारत नेहमीच विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल, असा विश्वास जगाला दाखवून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार मिळणे आणि त्यापेक्षा तो भारताच्या पंतप्रधानांना मिळणे, हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या १३ पुरस्कारांमध्ये २००८ साली पाकिस्तानातील अब्दुल सत्तार ईदी यांचाही सामावेश आहे. आपल्या ईदी फाऊंडेशनच्या मदतीने आत्तापर्यंत २० हजारांहून अधिक अनाथांना आसरा देण्याचे काम त्यांनी केले आहे. याशिवाय नोबेल शांती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मलाला युसूफझई यांच्याही कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मात्र, दहशतवादाला पोसण्याच्या नादात पाकिस्तानची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळत असल्याचे चित्र कायम आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0