हिंगोलीच्या खासदारकीवरून शिवसेना आमदारांमध्ये 'मातोश्री'तच जुंपली

22 Feb 2019 11:16:38


 

उद्धव ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे तूर्तास भांडण शमलं

 
 

मुंबई : भाजप-शिवसेनेची युती झाल्याने शिवसेनेचे खासदारकीसाठीचे इच्छुक निर्धास्त झाले असले तरी आता खासदारकीच्या तिकिटावरून शिवसेनेत घमासान सुरू झाले आहे. गुरुवारी दुपारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून शिवसेनेच्या दोन आमदारांमध्येच तीव्र वाद झाल्याचे समजते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरच ही बाचाबाची घडली. मात्र स्वतः ठाकरेंनीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने पुढील वाद शमल्याचे समजते.

 

मराठवाड्यातील काही लोकसभा मतदारसंघासाठी आज 'मातोश्री'वर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिंगोली या मतदारसंघाचा विषय समोर आला असता वसमतचे आमदार व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी आपण या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्याचवेळी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी व त्यांच्या शिवसैनिकांनी हिंगोलीसाठी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली. सध्या काँग्रेसचे राजीव सातव हे हिंगोलीचे खासदार आहेत. गेल्यावेळी याठिकाणी सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात 'मराठा' उमेदवार निवडून येण्याचा इतिहास आहे. या मुद्द्यावर जोर देत हेमंत पाटलांनी हिंगोलीवर आपला दावा केला. पण मी हिंगोली जिल्ह्यातील जेष्ठ राजकारणी असून माझाच या मतदारसंघावर हक्क आहे, असे जयप्रकाश मुंदडा यांनी म्हणणे मांडल्याचे समजते. मुंदडा हे मारवाडी समाजाचे असून ते मनोहर जोशी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

 

आज 'मातोश्री' घडलेल्या या प्रकारामुळे असे वाद पुढील काळात कसे आवरायचे, यावर शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही कळते. येत्या काही दिवसांत अशी अनेक भांडणे शिवसैनिकांना बघायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेची भाजपबरोबर नुकतीच युती झाल्याने विजयी होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शिवसेनेतील उमेद्वारीची स्पर्धा अजूनच तीव्र झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0