व्यावसायिकता व कार्यकर्तेपणा यांचा सुरेख समन्वय

19 Feb 2019 20:08:57


रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि १९९० पासून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे बराच काळ अध्यक्षपद भूषविणार्‍या बाळकृष्ण पुरुषोत्तम तथा राजाभाऊ जोशी यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.

 

काल रात्री राजाभाऊ जोशी गेल्याची बातमी आली. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयरोगासाठी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यांना कमी दिसू लागले होते. ते पुण्याला असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या. अधूनमधून फोनवर बोलणे होत असे. ‘विवेक’च्या विविध उपक्रमांबद्दल त्यांना उत्सुकता असे. ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था’ ही ‘विवेक’ची मातृसंस्था. १९९० पासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या आधी नाना चिपळूणकर संस्थेचे कार्यवाह होते. तेही एका व्यावसायिक संस्थेतून आले असल्याने ‘विवेक’कडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक होता. मनात ध्येयवाद ठेवून व्यवहारात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. राजाभाऊ जोशी यांनी तीच परंपरा अधिक सुदृढ केली. नाना चिपळूणकर यांनी जे रोप लावले, त्याचीच पुढे मशागत राजाभाऊंनी केली व आज ‘विवेक’चे जे विश्व उभे आहे ते उभे करण्यात या दोघांचा मोठा वाटा आहे.

 

राजाभाऊही ‘व्होल्टाज’मध्ये मोठ्या पदावर काम करीत होते व त्याचबरोबर रा. स्व. संघाचे मुंबई महानगरातील एका भागाचे संघचालक होते. या दोन्ही ठिकाणी त्यांनी समरसून काम केल्याने या दोन्ही क्षेत्रांतील शक्तिकेंद्राची त्यांना कल्पना होती. संघासारख्या संस्थेत काम करीत असताना कार्यकर्त्याची प्रेरणा महत्त्वाची असते. किंबहुना, या प्रेरणांच्या आधारेच अशा संस्थांचे काम चालत असते. केलेले परिश्रम आणि त्याचे परिणाम यांचे गणित अशा प्रकारच्या कामात घालता येत नाही. अपेक्षित परिणाम आले नाहीत तरी, नाउमेद न होता दुप्पट उत्साहाने काम करीत राहायचे असे वातावरणच यातून तयार झालेले असते. परंतु, व्यावसायिक संस्थेत असे नसते. व्यवसायात गुंतवलेल्या प्रत्येक घटकाचा परिणाम काय झाला याचा विचार केला नाही, तर तो व्यवसाय टिकणेच अशक्य असते. वरवर पाहता हे दोन परस्पर विरोधी दृष्टिकोन वाटतात. पण, संघकार्यातील प्रेरणा कायम ठेवून दृष्टिकोन मात्र व्यावसायिक ठेवायचा असे जमू शकते, यावर नानांचा जसा विश्वास होता तसाच राजाभाऊंचा पण.

 

राजाभाऊंच्या कार्यपद्धतीची तीन वैशिष्ट्ये होती. प्रत्यक्ष मैदानावर काम करणार्‍यांना काम करण्यासाठी पूर्ण स्वायत्तता हे त्यांच्या कार्यपद्धतीचे पहिले वैशिष्ट्य. बैठकीत अनेक विषयांची साधकबाधक बरीच चर्चा होई. ‘विवेक’ची परिस्थिती अत्यंत खडतर होती. प्रत्येक प्रश्नावर मात करण्याकरिता अनेक प्रयोग करावे लागत. त्यातील काही यशस्वी होत, तर काही अयशस्वी. असे असतानाही त्यांनी नवे प्रयोग करणार्‍यांना कधी अडवले नाही. एखादा प्रयोग अयशस्वी झाला म्हणून त्यांनी कधी कोणाला धारेवर धरले नाही. प्रयोगांच्या यशापशाच्या कारणांवर चर्चा व्हायची. त्याही वेळी ‘मी असे सांगत होतो‘ असे सांगत, आपला शहाणपणा मिरविला नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची ‘विवेक’ची संस्कृती अधिक डोळस बनत गेली. ‘विवेक’च्या व्यवस्थापनाला स्थैर्य आले. ‘एक उत्तम संच म्हणून काम करणारी संस्था’ असा जो ‘विवेक’ने नावलौकिक मिळविला, ती कार्यपद्धती विकसित करण्यासाठी राजाभाऊंचा सिंहाचा वाटा होता.

 

त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, राजाभाऊंनी कधी मोठी मोठी भाषणे दिली नाहीत. याउलट बैठकीत संवाद साधण्यात त्यांची हातोटी होती. त्यांच्या कार्यकाळातच जिल्ह्या-जिल्ह्यात ‘विवेक’साठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी निर्माण होऊ लागली होती. काम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांवर स्वाभाविकच संघाच्या कार्यपद्धतीचा प्रभाव होता. त्यांच्याशी बैठकीत अनेक उदाहरणे देत ते संवाद साधत व या दोन्ही कामातला फरक स्पष्ट करत. अनेकवेळा भाषणापेक्षा अशा संवादांचा उपयोग अधिक होत असतो. ‘विवेक’च्या प्रतिनिधीचा व्यावसायिक दृष्टिकोन तयार व्हायला याची खूप मदत झाली.


 
 

त्यांचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे ‘विवेक’मध्ये कार्यरत असलेल्या सर्वांना त्यांनी दिलेला व्यावहारिक दृष्टिकोन. ‘विवेक’मध्ये स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची संस्कृती आहे व तेच ‘विवेक’चे खरे बळ आहे. पण, हे करत असताना आपण आपल्यासाठी व आपल्या घरासाठी वेळ दिला पाहिजे, असे ते केवळ आग्रहाने सांगत असत. एवढेच नव्हे, तर वर्षभरात कोणी जर रजा घेतली नाही, तर ती का घेतली नाही याची चौकशी करत. पहिल्यांदा आम्हाला याची अडचण वाटू लागली. कारण, आजाराव्यतिरिक्त कोणी रजा घेत नसे. त्यामुळे प्रत्येकजण वर्षभर असणार, असे गृहीत धरून कामाचे नियोजन केले जाई. पण, राजाभाऊंनी ती पद्धत बदलायला लावली. त्यावेळी ती अडचणीची ठरली तरी, नंतर त्याची दीर्घकालीन उपयुक्तता लक्षात आली.

 

एखादी संस्था घडत जाते, त्यावेळी तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक जणांनी तिला आकार दिलेला असतो. ती सर्वच व्यक्तिमत्त्वे लोकांसमोर येतात असे नाही. खरेतर इतर संस्थांत अध्यक्षपद हे मिरवण्याचे असते. तशी परिस्थिती ‘विवेक’मध्ये कधीच नव्हती. अशा संस्थेत संस्थेचा विकास होण्यासाठी विश्वस्त मंडळाने कशी भूमिका घ्यावी, याचा वस्तुपाठ नाना चिपळूणकर, राजाभाऊ जोशी आदींनी घालून दिला. तो स्मरणीय व आचरणीय आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0