कल्याण : “सरकार किंवा सहकार असो, या सर्व कारभाराला सांभाळण्यासाठी संस्कारांची आवश्यकता आहे. त्यामुळेच मतदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो. महाराष्ट्रात हे काम विश्वसनीय असल्यानेच सहकार क्षेत्राचा वटवृक्ष बहरला आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
दि कल्याण जनता सहकारी बँकेचा ४६वा वर्धापन दिन रविवार, दि २९ डिसेंबर रोजी कल्याण येथील के. सी. गांधी सभागृहात पार पडला, यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रमात ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ या न्यासाच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील स्टील क्षेत्रातील उद्योजक कृष्णलाल धवन, बांधकाम व्यावसायिक महेश अग्रवाल आणि हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर (उपमहाव्यवस्थापक) गिरीधर मोगरे, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मधुसूदन पाटील, संचालक कल्याण जनता सहकारी बँक आदी मान्यवरांची मंचावर विशेष उपस्थिती होती. तसेच बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, उपाध्यक्ष मधुसूदन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर, संचालक समाजसेवा पुरस्कार निधीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, सचिव मोहन आघारकर, कोषाध्यक्ष निशिकांत बुधकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांच्यावतीने भास्कर शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले, “आजचा हा सन्मान केवळ माझा किंवा माझ्यासोबत पुरस्कार मिळालेल्या मित्रांचा नव्हे तर हा आपल्या सर्व समाजाचा आहे,” असे सांगत भास्कर शेट्टी यांनी पुरस्कारात मिळालेला ५० हजारांचा निधी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्यासोबत कृष्णलाल धवन यांनीही पुरस्काराची रक्कम संस्थेला दिली. बँकेचे संचालक मधुसूदन पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. रत्नाकर पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.