सनबर्न फेस्टिवलमध्ये २ पर्यटकांचा मृत्यू

28 Dec 2019 15:54:55


asf_1  H x W: 0


पणजी : 'सनबर्न' फेस्टिवल हा नेहमी चर्चेत असणारा फेस्टिवल आहे. यंदा गोव्यामध्ये २ दिवसीय आयोजित केलेल्या या फेस्टिवल दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मादक द्रव्यांच्या अतिसेवनाने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. गोव्यात वागातोर बीच येथे सनबर्न फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता.

 

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील साईप्रसाद आणि वेंकट नावाचे दोन तरुणांचा या फेस्टिवलदरम्यान घटनास्थळीच मृत्यू झाला. यंदा गोव्यातील वागातोर बीच येथे सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसीय या फेस्टिवलचा शुक्रवारचा पहिला दिवस होता. यावेळी हे दोघे फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी फेस्टिवलस्थळी दाखल झाले. तिकीट बॉक्सवर उभे असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. या दोघांनाही तातडीने मापुसा येथील 'अझिलो' या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

 

अचानक आलेल्या मृत्यूमुळे या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दोघांचाही मृत्यू मादक द्रव्यांच्या अतिसेवनाने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला असू शकतो असा अंदाज गोवा पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूमागीत खरं कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे. परंतु, ३१ डिसेंबरच्या धर्तीवर मादक पदार्थांचे वाढती विक्री आणि पर्यटकांची सुरक्षा याकडे गोवा पोलिसांचे लक्ष असणार आहे.

Powered By Sangraha 9.0