मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट मुंबई प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने जप्त केला आहे. त्यांना कार्यालयाने ऑक्टोबर महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यासंदर्भांत कोणतेही उत्तर न मिळाल्याने संबंधित विभागाने ही कारवाई केली आहे.
मेधा पाटकर यांच्याविरोधात मध्य प्रदेश येथे विविध ९ गुन्हे दाखल होते, याची माहिती त्यांनी पारपत्र कार्यालयाला दिली नव्हती. हा ठपका ठेवत त्यांचा पासपोर्ट का जप्त केला जाऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस त्यांना १८ ऑक्टोबर रोजी बजावण्यात आली होती.पारपत्र कार्यालयाने पाठवलेल्या दोन पानी कारणे दाखवा नोटीसमध्ये पाटकर यांच्याविरोधात दाखल झालेले नऊ एफआयआरविषयीची माहिती नमूद करण्यात आली आहे. पाटकर यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील बडवानी येथे ३, अलीराजपूरमध्ये एक आणि खंडवा जिल्ह्यात ५ तक्रारी दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नोटीशीला प्रतिसाद म्हणून मेधा पाटकर यांनी नोव्हेंबरमध्ये कार्यालयाकडे वेळ मागितला होता. कोर्ट, पोलिसांकडून कागदपत्रे घेण्यास वेळ लागेल असे त्यांचे म्हणणे होते. आठवडाभरापूर्वी त्यांची ही विनंती फेटाळून लावण्यात आली आणि पासपोर्ट जमा करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला.