'त्या' पिल्लाला आईकडे सुपूर्द करण्याच्या प्रयत्नाला पुन्हा अपयश

10 Dec 2019 21:35:32

ak_1  H x W: 0


मुंबई (अक्षय मांडवकर) - येऊरमध्ये गेल्या आठवड्यात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी वनविभागाने सोमवारी रात्री पुन्हा प्रयत्न केला. मात्र, यावेळेसही त्यांचा हाती अपयश आले. येऊरमध्ये सोमवारी मादी बिबट्यासह एक पिल्लू आढळून आल्याने हा प्रयत्न करण्यात आला होता.


ak_1  H x W: 0

येऊर वनपरिक्षेत्रातील वायू दलाच्या उपकेंद्राजवळ गेल्या आठवड्यात बुधवारी पहाटे पादचाऱ्यांना बिबट्याचे एक नवजात पिल्लू आढळून आले होते. वनाधिकाऱ्यांनी पिल्लाला ताब्यात घेऊन त्याला पुन्हा आईकडे सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी बुधवार आणि गुरुवारी रात्री या पिल्लाला ते सापडलेल्या ठिकाणी ठेवून त्याची आई येण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, बुधवारी रात्री पिल्लाची पाहणी करुन गेलेली आई गुरुवारी रात्री परतलीच नाही. यादरम्यान पिल्लाची प्रकृती ढासळत गेली. त्यामुळे शुक्रवारी वनाधिकाऱ्यांनी येऊरमध्ये एखाद्या मादी बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतरच पिल्लाला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. वनकर्मचाऱ्यांना सोमवारी गस्ती दरम्यान एका बिबट्याच्या मादीचा आणि पिल्लाचा आवाज आल्याने आम्ही सापडलेल्या पिल्लाचा मादीजवळ सुपूर्द करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पिल्लाला त्याठिकाणी ठेवले. मात्र मादी आली नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. रात्री थंडीचा तडाखा वाढत असल्याने पिल्लाच्या शारीरिक प्रकृतीचा विचार करून दहा वाजल्यानंतर पिल्लाला पुन्हा ताब्यात घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ak_1  H x W: 0

दरम्यान पिल्लांचे संगोपन 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीअंतर्गत केले जात आहे. साधारण दोन आठवड्याच्या या नर पिल्लाची प्रकृती स्थिर असून त्याला जगवण्यासाठी वनाधिकारी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. सध्या पिल्लाला मांजरांसाठी येणाऱ्या मिल्क रिल्पेसरव्दारे दूध पाजले जात आहे. दूध आणि टाॅनिक्सवर त्याचे पालनपोषण करण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0