बलरामाचे शस्त्र म्हणजे नांगर! युद्धाचे नीतिनियम भीमाने पाळले नाहीत म्हणून तो आपला अजस्त्र नांगर घेऊन भीमावरती धावून आला.
कृष्णाचे हे वक्तव्य ऐकून बलराम थोडा शांत झाला खरा, पण त्याला कृष्णाचे म्हणणे पटले नाही. कृष्ण पुढे म्हणला, “बलरामा, कलियुगाला सुरुवात झाली आहे. या गोष्टीची तू आठवण ठेव. आता निष्कलंक व सदाचारी असे कोणीच सापडणार नाही. युद्धाच्या दहाव्या दिवसापासून युद्धाचे रूपच बदलून गेले. अधर्म दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा काळाचा प्रभाव आहे. तू नियतीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. ती आपल्या मार्गानेच जाणार! कित्येक वेळी ती सदाचरणाचाही त्याग करते आणि नाना तर्हांनी आपला स्वार्थ साधते. मला तर असे वाटते की, यश मिळवणं हेच महत्त्वाचे! यश मिळवणारे कोणतेही साधन समर्थनीच असते.”
बलराम म्हणाले, “कृष्णा, मधाळ वाणीत मांडलेला तुझा विचार मला अजिबात पटत नाही. भीमाने गदायुद्धाचे नियम डावलून दुर्योधनाला ठार केले आहे. त्यामुळे युद्धाचे नियम धुडकवणारा योद्धा अशीच त्याची अपकीर्ती होणार! दुर्योधनाचा मला अभिमान वाटतो. त्याला स्वर्गप्रवेश मिळेल. तो तिथे शाश्वत काळ राहील. हे गदायुद्ध दुर्योधनाला शाश्वत गौरव आणि भीमाला शाश्वत लज्जा मिळवून देईल.” इतके बोलून बलराम निघून गेला. भीमाची परिस्थिती मात्र खूप केविलवाणी होती, म्हणून कृष्ण भीमाजवळ आला. त्याने प्रेमाने भीमाचा हात आपल्या हाती घेतला आणि तो म्हणाला, “भीमा, मला तुझा अभिमान वाटतो. तू तुझी प्रतिज्ञा खरी करून दाखवलीस. इतकी वर्षे तू जे करायचे ठरविले होते, ते करून दाखवलेस. अशी कर्तृत्ववान माणसं मिळत नाहीत.” त्याचे हे बोलणे ऐकून भीम थोडा सावरला. त्याने आपला ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराच्या पायांवर डोके ठेवले. युधिष्ठिरानेही त्याला दृढ अलिंगन देऊन त्याचे कौतुक केले. सर्व पांडवांनी आनंदाने जयघोष केला.
दुर्योधनाचा आत्मा त्याच्या मृत देहाभोवती घोटाळत होता. कृष्ण म्हणाला, “दुर्योधन, हा या पृथ्वीतलावरचा सर्वात मोठा पापी माणूस होता. त्याने अनेकांना वाईट मार्गाला नेले. खरं म्हणजे खूप जणांनी त्याला त्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला. पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. महात्मा विदुरांनी पण त्याला उपदेश केला, पण तोही त्याने धुडकावून लावला. तो केवळ शकुनीचे ऐकत होता. शकुनीमुळे तो पांडवांशी खूप दुष्टपणे वागला. म्हणूनच असा मांड्या फोडलेला त्याचा देह आता इथे भूमीवर पडून आहे. तो आता एखाद्या लाकडाच्या ओंडक्याहून वेगळा नाही.” दुर्योधनाचा आत्मा कृष्णाचे हे सर्व बोलणे ऐकत होता. त्या आत्म्याने कृष्णाला प्रत्युत्तर दिले, जे फक्त श्रीकृष्णच ऐकू शकत होता. दुर्योधनाचा आत्मा म्हणाला, “कृष्णा, तू फक्त कंसाचा एक गुलाम होतास, त्यापेक्षा अधिक तुझी लायकीच नाही. तुला लाज शरम काहीच कशी नाही! अरे गदायुद्धाचे नीतिनियम झुगारून मला भीमाने मारले. तरीही, तू माझ्या मरणावर आनंद व्यक्त करत आहेस? किंबहुना भीमाने जे केले ते तुझ्याच सांगण्यावरून त्याला जबाबदार तूच आहेस. मी भीमाला दोषी धरत नाही. तो तर गदायुद्ध काटेकोर नियमांनुसार करत होता. शूर आणि निपुण आहे तो. युद्धाचे नीतिनियम धुडकावण्याची सूचना तूच त्याला दिली. तू मुद्दामून अर्जुनाशी मोठ्या आवाजात बोलत होता. जेणेकरून भीमाला हे सारे ऐकू जावे, अर्जुनाला तूच सांगितले की, मांड्या थोपटून तू भीमाला प्रतिज्ञेची आठवण करून दे. तू अशा कपटाने अनेक राजांना ठार केले, हे मला माहिती आहे आणि तू मला पापी म्हणतोस? मला तुझी सारी काळी कृत्यं माहिती आहे. या महायुद्धाला कारणीभूत तूच आहेस. तूच आमच्या आजोबांसमोर त्या शिखंडीला उभे केले. त्याच्या मागे उभे राहून अर्जुनाने त्यांना ठार केले. ‘अश्वत्थामा’ नावाच्या हत्तीला तूच ठार केले आणि द्रोणगुरूंना असे भासवले की, त्यांचा पुत्र मारला गेला आहे! दु:खाच्या आवेगाने गुरू द्रोण यांनी शस्त्रत्याग केला. त्याचक्षणी तूच धृष्टद्युमनाला उद्युक्त करून द्रोणांचा वध करवला. नि:शस्त्र द्रोणावर त्याने हल्ला केला. तुझ्या सांगण्यावरून त्या घटोत्कचाला तूच राधेयच्या समोर उभे केले. तूच त्याला ते दुर्दम्य वासवी शक्तीचे अस्त्र वापरायला लावलेस! हे सगळे मला माहिती आहे, मी पाहत होतो. अरे राधेयच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असताना तूच अर्जुनाला त्याला ठार करायला सांगितले. त्यामुळे तूच अधर्मी आणि पापी आहेस!”
हे ऐकून श्रीकृष्ण संतापला, तो त्या आत्म्याला म्हणाला, “दुर्योधना, तू मारला गेलास. कारण, तू अधर्म केलास. तू सदाचार सोडलास म्हणून! इतकंच काय, भीष्म, द्रोण, राधेय हे सारे चांगले लोक फक्त तुझ्यासारख्या अधर्माने वागणार्या माणसाच्या बाजूने लढले म्हणून मारले गेले. खरेतर भीष्मांनी तुझी बाजू घ्यायलाच नको होती. हे युद्ध टाळ म्हणून मीच तुला हस्तिनापुरी येऊन विनवले ते तू विसरलास? अनेक वीरांच्या मृत्यूला तूच कारणीभूत आहेस. लहानपणापासून तू दुष्टपणेच या पांडवांशी वागला. तुझा पिता धृतराष्ट्र आणि मामा शकुनी यांनी तुझ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घातले. त्याच विषवृक्षाची फळे तू चाखतो आहेस. खरेतर अभिमन्यूला ज्या रितीने तुम्ही ठार केले त्याकरिता तुझा पुन्हा पुन्हा वध केला पाहिजे. तू सहानुभूतीच्या लायकीचाच नाहीस. मला तुझ्याप्रति काहीच वाटत नाही.”
दुर्योधनाचा आत्मा मृतदेह सोडून स्वर्गाकडे निघाला, तशी देवांनी आकाशातून त्यावर पुष्पवृष्टी केली. हे पाहून सारे पांडव खाली माना घालून शोक करू लागले. त्यामुळे श्रीकृष्ण अधिक संतापला. त्याने पांडवांना द्रौपदीच्या अश्रूंची-अपमानाची आठवण करून दिली. दरबारात झालेले तिचे वस्त्रहरण आठवा, म्हणून सांगितले. त्यावेळी भीष्म, द्रोण इतर कोणीही पांडवांना व द्रौपदीला साहाय्य केले नाही. कुणीच दुर्योधनाला विरोध केला नाही. म्हणून तो म्हणाला, “मला असं वाटतं की, तुम्ही नीतीनियम पाळून युद्ध कधीच जिंकू शकला नसता आणि तुम्हाला असं वाटत असेल की, दुर्योधनाचावध नीतिनियम धुडकावून पाप घडले आहे, तर ते पाप माझ्या माथी ठेवा. मी त्या पापाचा धनी म्हणून स्वीकार करतो. चला आता आपण इथून जाऊ या.” सामंतपंचक ठिकाणाहून सारे निघाले. दुर्योधनाचा निष्प्राण देह तिथे पडून होता.