दिव्यांगांचा आदर्श

17 Nov 2019 21:09:25



पालघर (कुंदन पाटील) : दिव्यांग असल्याने अनेक व्यक्तींचे आयुष्य दुसऱ्यांवर अवलंबून असते. मात्र, पालघर येथील दिव्यांग प्रकाश यांनी एक नवा आदर्श सर्वांसाठी निर्माण केला आहे. दिव्यांग असूनही प्रकाश यांनी क्रीडा आणि चित्रकलेत आपले नाव मोठे केले आहे. प्रकाश विनायक राऊत केळवे गावचे रहिवासी आहेत. प्रकाश यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून ते जन्मतः मूकबधिर आहे. परंतु, आपल्या व्यंगावर मात करीत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाने क्रीडा क्षेत्रातील अनेकानेक मानांकने प्राप्त केली आहेत. त्यांचे शिक्षण पहिली ते पाचवीपर्यंत मूकबधिरांच्या विजया शिक्षण संस्था दादर, मुंबई येथे झाले.

 

पुढील शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केळवे येथे तर दहावीपर्यंत बॉम्बे कॅड फॉर दि डिफ, वांद्रे येथे झाले. प्रकाश १९८५ साली प्रथमतः राष्ट्रीय उंच उडीत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. तेव्हापासून आपला क्रीडा क्षेत्रातील एक-एक टप्पा पार करीत धावणे, उंच उडी, भालाफेक, मॅरेथॉन शर्यत, जलतरण स्पर्धेत तब्बल ६७ सुवर्ण, ५४ रौप्य व ५० कांस्य अशा १७१ पदकांचा तो मानकरी ठरला आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना किंवा कोणाचेही मार्गदर्शन नसताना एकलव्याप्रमाणे साधना करत प्रकाश यांनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. प्रकाश यांनी केळवा दादरपाडा ते दांडाखाडी असा मार्ग धावण्याच्या सरावासाठी निवडला तर पोहण्यासाठी कोणाचेही मार्गदर्शन नसताना गावातल्या विहिरीत आपला पोहण्याचा सराव सुरू ठेवला. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत धावणे, उंच उडी, भालाफेक याचा अविरत सराव प्रकाश यांनी केला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदकांची लयलूट केली.

 

अष्टपैलू खेळाडू असलेले प्रकाश

 

एक उत्कृष्ट चित्रकारदेखील आहेत. प्रकाश यांनी अनेक चित्रे साकारली आहेत. हाच त्यांचा चित्रकलेचा छंद त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. साड्यांवरील विविध डिझाईन्स मार्गदर्शनाविना आपल्या कल्पनेप्रमाणे तयार करून ते आपले घर चालवितात. अशा या अष्टपैलू व गुणी प्रकाश यांचा केळवे ग्रामपंचायतीने नुकताच सत्कार केला. दि. १० नोव्हेंबर रोजी ‘केळवे बीच फेस्टिवल’ मध्येही त्यांचा सत्कार करण्यात आला. "कुठलीही राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही मी देशाची केलेली सर्वांत मोठी सेवा आहे, असे समजून मी माझ्या खेळाने महाराष्ट्र व भारत देशाचे नाव उज्ज्वल करीत राहीन," असे प्रकाश आत्मविश्वासाने सांगतात. त्यांच्या या आत्मविश्वास आणि चिकाटीमुळे सर्व नागरिकांसाठी ते आदर्श ठरले आहेत.


Powered By Sangraha 9.0