व्याघ्र बचावात (रेस्क्यू) आमूलाग्र बदल गरजेचे ; वाघाने घडविला इतिहास

13 Nov 2019 12:24:37




महाराष्ट्रातील व्याघ्र बचावाच्या पद्धतीमध्ये (रेस्क्यू ऑपरेशन) आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ’व्याघ्र गणने’च्या चौथ्या अंदाजपत्रकानुसार राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. असे असताना गेल्या काही महिन्यांमध्ये आपण क्षुल्लक कारणांमुळे आणि वेळीच लक्ष न दिल्याने प्रजननक्षम व वयात येणार्‍या वाघांना गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. याला सर्वस्वी वन विभाग जबाबदार आहे, असे म्हणणे उचित ठरणार नाही. ’मानव-व्याघ्र’ संघर्षामधूनही काही वाघांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विजेच्या धक्क्याने आणि मानवाने केलेल्या विषबाधेमुळे काही वाघांचा मृत्यू ओढावला आहे. ’राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’च्या ’टायगर नेट’ या संकेतस्थळानुसार गेल्या ११ महिन्यांमध्ये राज्यात १७ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील सहा वाघांचा मृत्यू शिकारींच्या विविध कारणांमुळे झाल्याचे नमूद केले आहे. सध्या वन विभागासमोर शिकारीच्या घटना रोखण्याबरोबरच अडचणीच्या परिस्थितीत अडकलेल्या वाघांचे बचाव कार्य सुरळीत पार पाडण्याचे आवाहन आहे. कारण, बचाव कार्य सुरळीतरित्या पार न पडल्यामुळे चंद्रपूरमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामधील जुना कुनाडा गावातील शिवना नदी पात्रातील दगडांच्या कपारीत एक वाघ अडकला होता. दीर्घकाळ कपारीत अडकल्याने त्याला शरीराच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला चालताही येत नव्हते. अशा परिस्थितीत वन विभागाने वाघाच्या बचावासाठी क्रेनच्या साहाय्याने नदीत पिंजरा सोडला. मात्र, वाघ पिंजर्यात येण्यापूर्वीच दरवाजा बंद झाल्याने त्याच्या पंजाला दुखापत झाली. त्यादिवशी अंधार झाल्याने वन विभागाने बचाव कार्य थांबविले. परंतु, दुसर्‍या दिवशी बचाव कार्य सुरू होण्यापूर्वीच नदी पात्रात वाघ मृतावस्थेत आढळला. अशा परिस्थितीत वन विभागाने वाघाच्या बचावासाठी प्रयत्न केलेच नाहीत, असे नाही. मात्र, हे बचाव कार्य वेळेत आणि अधिक सक्षमपणे पार पाडले असते, तर प्रजननक्षम वाघाला वाचविण्यात आपण यशस्वी झालो असतो. त्यामुळे व्याघ्र बचावाच्या पद्धतीमध्ये वेळेची आमूलाग्र बदल करून त्यात कार्यतत्परता आणणे गरजेचे झाले आहे.

 
 

वाघाने घडविला इतिहास

एकीकडे राज्यात व्याघ्र संवर्धन आणि बचावाच्या योजनांमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे असतानाच महाराष्ट्रातील एका वाघाने इतिहास घडवला आहे. गेल्या वर्षी टिपेश्वर अभयारण्यात जन्मास आलेल्या ’सी-वन’ या वाघाने १,१६० किलोमीटरचे स्थलांतर केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशात आजवर नोंदवलेल्या वाघांच्या स्थलांतरामधील हे सर्वात मोठ्या लांबीचे स्थलांतर ठरले आहे. टिपेश्वर अभयारण्यात फेब्रुवारी महिन्यात या वाघाच्या गळ्यात रेडिओ ट्रान्समीटर बसविण्यात आली होती. नुकताच वयात आल्याने आईची साथ सोडलेला हा वाघ जून महिन्यात टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडला. त्यानंतर ’भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्ल्यूआयआय) वन्यजीव संशोधक वाघाच्या गळ्यातील रेडिओ ट्रान्समीटरच्या सिग्नलच्या आधारे त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. टिपेश्वर सोडल्यावर हा वाघ पैनगंगा वन्यजीव अभयारण्यातून तेलंगण राज्यातील कवाल व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. या ठिकाणहून महाराष्ट्रात पुन्हा परतून त्याने इसापूर पक्षी अभयारण्य, पुसाड, हिंगोली, वाशिम असा प्रवास केला. यादरम्यान ३ नोव्हेंबर रोजी त्याने हिंगोलीतील सुकळी गावात पाच शेतकर्‍यांवर हल्ला केला. अजूनही या वाघाची हद्द तयार न झाल्याने त्याचे स्थलांतर सुरू आहे. तो सध्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या स्थलांतराची दिशा पाहता तो अकोल्यापासून ७० किमी दूर असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जाणार असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यातील या संपूर्ण प्रवासात त्याने आजतागायत १,१६० किलोमीटरची पायपीट केल्याची नोंद रेडियो ट्रान्समीटरमध्ये झाली आहे. दरम्यानच्या कालवधीत त्याने एक राज्य आणि सहा जिल्ह्यांमधून आपला प्रवास पूर्ण केला आहे. व्याघ्र स्थलांतराचा हा प्रवास रंजक असला, तरी वाघांच्या स्थलांतराच्या अभ्यासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. कारण, यामुळे व्याघ्र स्थलांतराचे पट्टे, त्याच्या प्रवासाची दिशा यासंबंधीची माहिती मिळण्यास उपयोग होणार आहे. शिवाय हे स्थलांतराचे पट्टे सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनेदेखील सरकारी पातळील विविध उपाययोजना राबविण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

Powered By Sangraha 9.0