सरदार पटेलांनी मिळवून दिली भारतातील विविधतेला एकतेची ओळख - पंतप्रधान

31 Oct 2019 12:09:58


 


भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असे नेहेमीच म्हटले जाते. मात्र या विविधतेतील एकतेला देशाच्या नकाशावर ओळख मिळवून देणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती आज देशभर साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विविधतेत एकता हीच आपली ओळख असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया इथं उभारण्यात आलेल्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

 

सरदार पटेल यांच्या विचारांमधील शक्ती, प्रेरणा आजही अनुभवता येईल त्यामुळे त्यांच्या श्रद्धास्थानी आल्यावर मनाला शांती मिळते आणि मनाला उभारी देखील येते असा अनुभव यावेळी मोदी यांनी उपस्थितांना सांगितला. देशातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी सरदार पटेल हे एक आधारस्तंभ होते आणि म्हणूनच त्यांची प्रतिमा भारताच्या विविधतेत एकटा असलेल्या देशासाठी एक प्रतीक बनली आहे. आज हीच प्रतिमा भारतीयांनाच नाही तर सकाळ विश्वाला आकर्षित करत आहे. त्यामुळे आज या प्रतिमेला पुष्पार्पण करताना संपूर्ण भारताला अभिमान वाटत असे गौरवोद्गार मोदी यांनी यावेळी काढले.

जगातील भिन्न देश, भिन्न पंथ, भिन्न विचारधारा, भाषा आणि रंग यावर आधारित समाज हे देशांचे वैशिष्ट्य होते. परंतु भारताचे वैशिष्ट्य म्हणजे या विविधतेतील एकता हे आहे आणि हीच भारताची ओळख सर्व जगाला आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करून सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

 

दरम्यान सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र `एकता दिवस` म्हणून साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त मुंबईत आयोजित 'एकता दौडला' राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. तसेच राज्यात अन्य ठिकाणी देखील पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0