अंबरनाथ : अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदार संघात उल्हासनगर पूर्व विभागातील कॅम्प क्र. ४ आणि ५ मधील काही भागांचा समावेश आहे. गेली दहा वर्षे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसर्यांदा खासदार म्हणून मतदारांनी लोकसभेत पाठवले आहे. याशिवाय नगरपालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे.
या निर्णयानंतर भाजपदेखील शिवसेनेच्या डॉ. किणीकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. अंबरनाथमध्ये नगरपालिका, आमदार आणि खासदार या तीनही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शहरात कामे केली, नागरिकांनी शिवसेनेला पुन्हा सत्ता दिली आणि म्हणून राज्य आणि केंद्र शासनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अंबरनाथने पटकावले. शहरात खराब रस्त्यांच्या प्रकरणावरून विरोधकांनी आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. काही रस्ते झाले आहेत, काही प्रगतिपथावर आहेत तर काही तांत्रिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, याला सरकारी कार्यालयांतील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले. त्याचबरोबर केलेल्या कामांची माहितीही शिवसेनेच्या वतीने देण्यात आली होती.
यंदा शिवसेना-भाजप युती असल्याने तशा प्रकारचे कोणतेही आव्हान त्यांच्यासमोर नाही. मात्र, शहर शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी ही त्यांच्यापुढे डोकेदुखी होती. शिवसेना-भाजप युती झाल्याने ऐनवेळी भाजपचे इच्छुक उमेदवार सुमेध भवार यांनी मनसेचे तिकीट घेऊन निवडणूक लढवली. शहरातील युवा पिढी पाठीशी आहे, असा भवार यांचा दावा होता. अंबरनाथमध्ये काँग्रेसचेही चांगले अस्तित्त्व आहे. शहरात काँग्रेसचे आठ नगरसेवक आहेत. काँग्रेसने राहुल साळवे यांना अंबरनाथमधून उमेदवारी दिली. सहा महिन्यांनंतर पुढील वर्षी अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यात थेट नगराध्यक्ष निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून काँग्रेस या निवडणुकीकडे पाहत असल्याचे दिसून आले.
सुमेध भवार आणि राहुल साळवे या दोन उमेदवारांमुळे विरोधी मतांची विभागणी होणार आहे. तसे झाले तर ती विभागणी पथ्यावर पडून डॉ. किणीकर यांना हॅट्ट्रिक साधणे सोपे जाईल. अर्थात या गुरुवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाआघाडी यांच्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे धनंजय सुर्वे निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. सोमवारी झालेल्या निवडणुकीत ४२.३२ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी आहे.
"यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर हेच बाजी मारतील.
शिवसेना पक्षाची जडणघडण हे त्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण.
शिवसेनेत बांधिलकी मोलाची समजली जाते. शिवाय या
पक्षाचे ग्रास रूटवर मजबूत संघटन आहे. निष्ठा आणि संघटना दोन्ही आघाड्यांवर शिवसेना हा पक्ष
इतर पक्षांच्या तुलनेत सरस आहे. त्यात लवकरच अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका
येऊ घातलेल्या आहेत. ज्या वॉर्डातून लीड मिळणार नाही तिथून पुढच्या
निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, अशी ताकीद शिवसेनेच्या पदाधिकार्यांना देण्यात आली होती. तेव्हा निदान स्वतःच्या तिकिटासाठी तरी प्रत्येकाने कसून मेहनत घेतली असणार,
यात शंकाच नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा डॉ. बालाजी किणीकर यांच्या तोडीचे उमेदवार दुसरे पक्ष
देऊ शकले नाहीत. दोन वेळा आमदार राहिल्याने त्यांचे निदान नाव
तरी मतदारांना माहीत होते. इतर उमेदवार त्यांच्या त्यांच्या पक्षात उत्तम असले तरी सर्वसामान्य मतदारांना
त्यांची नावेसुद्धा उमेदवारी घोषित झाल्यानंतरच समजली. अंबरनाथमध्ये
गेल्या वर्षभरात विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्याचाही लाभ डॉ. बालाजी किणीकर यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
- प्रशांत असलेकर, लेखक, अंबरनाथ.
पुन्हा फडणवीस हेच
सीएम व्हावेत यासाठी प्रयत्न
ज्याप्रमाणे केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होऊन महायुतीचे सरकार यावे, यासाठी अंबरनाथ विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारात भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हिरीरीने सहभागी झाले होते. दोन वेळा शिवसेनेचा आमदार अंबरनाथ मतदार संघातून निवडून जात आहे, त्यामुळे यावेळी तरी निदान अंबरनाथची जागा भाजपला सोडावी आणि शिवसेना- भाजप देईल त्या उमेदवाराचे प्रचाराचे काम करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती.
- पूर्णिमा कबरे,
- श्रीकांत खाडे